✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.17नोव्हेंबर):- राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावतीजींनी आज, रविवारी (ता.१७) पुण्यात वडगाव शेरीचे उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांच्यासह राज्यातील बसप उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहिर ‘महासभा’ घेतली. सभेदरम्यान त्यांनी बसप सत्तेत शामिल होईल असे थेट भाष्य केले. स्वबळावर सरकार आणण्याचा प्रयत्न बसपचा आहे, पंरतु, योग्य संख्याबळ आले नाही तर ‘बॅलेसिंग पॉवर’ म्हणून सरकार बनवणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असे आश्वासन यावेळी उपस्थितांना मायावतींनी दिले.
मतं ‘ट्रान्सफर’ होत नसल्यामुळे इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवण्यावर विश्वास नसल्याचे मायावती म्हणाल्या. यापूर्वी जेव्हाजेव्हा इतर पक्षांसोबत मिळून बसपने निवडणूक लढवली तेव्हा तेव्हा दलितांचे मत सोबत असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला गेली. पंरतु जातीवादी मानसिकतेमुळे त्यांच्या पक्षाचे बहुतांश मत आम्हच्या पक्षाला मिळत नाही. त्यांची मत अंतर्गत रित्या दुसऱ्या उमेदवाराला जातात. अनेक जागांवर बसपचे उमेदवार त्यामुळे निवडून येत नाही. पक्षाच्या मतांची टक्केवारी देखील कमी होते. म्हणून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे मायावती म्हणाल्या.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदेशात जावून आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्याचे भाष्य केले होते. गांधींच्या वक्तव्याचा देखील मायावतींनी महासभेतून समाचार घेतला. राहुल यांचे वक्तव्य चिंताजनक असून कॉंग्रेसची जातीयवादी मानसिकता दाखवणारी असल्याचे मायावती म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत कॉंग्रेस, भाजप तसेच इतर पक्षांचे ‘गठबंधन’ सरकार राहीले आहे. मात्र, जातीवादी, भांडवलशाही विचारांमुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, मुस्लिम तसेच ओबीसींच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. बेरोजगार, शेतकरी, मजूरांची स्थिती हलाखीची आहे. म्हणून या पक्षांना मतदान करून अपमानित होवू नका. डॉ.बाबासाहेबांनी या वर्गांच्या उन्नतीसाठी संविधानात कायदेशीर अधिकार दिले असल्याचे मायावती म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणातील वर्गीकरण आणि क्रिमिलेयर संबंधीच्या निकालाशी बसपा सहमत नाही. केंद्रातील भाजप सरकारला न्यायालयाचा निकाल निष्प्रभावी करण्यासाठी संशोधित विधेयक आणण्याची मागणी केली होती. पंरतु, भाजप तसेच इतर विरोधी पक्ष या मुद्दयावर गप्प असल्याचे मायावती म्हणाल्या. अनेक राज्य सरकारांनी आरक्षणातील वर्गीकरणाचा निर्णय लागू करण्यास सुरूवात केली आहे. राज्य सरकार त्यांच्या फायद्यासाठी जातीजातींमध्ये ‘फुट पाडा आणि राज्य करा’ या धोरणाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे. दलित, आदिवासी, ओबीसींच्या उन्नतीसाठी डॉ.बाबासाहेबांनी संविधानात कायदेशीर अधिकार देण्यात आले आहे. पंरतु, उपेक्षितांना दिलेल्या अधिकारांना विविध प्रयत्न करीत सर्वपक्षांनी संपवण्याचा घाट घालत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांना एकत्रित येवून बसपाला पुर्णपणे मजबूत करीत राज्य आणि केंद्रात सत्तेवर आणावे लागेल, असे आवाहन यावेळी मायावतींनी केले.
बसपामुळे देशातील इतर मागासवर्गीयांना मंडल आयोगाच्या शिफारसीनूसार आरक्षण मिळाले.तत्कालीन केंद्रातील कॉंग्रेस सरकारवर बसपच्या दबावामुळे हे शक्य झाले. पंरतु, आतापर्यंत जातीयवादी पक्षांमुळे ओबीसींना संपूर्ण न्याय मिळालेला नाही. केंद्र-राज्यातील जातीवादी मानसिकतेमुळे दलित,आदिवासी, ओबीसींचे शोषण करणाऱ्या शक्तींचे मानसिक बळ वाढले असल्याच्या मायावती म्हणाल्या.
बसपा हा भांडवलदारांच्या नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आर्थिक मदतीवर चालणारा देशातील एकमेवर राजकीय पक्ष आहे. बसप सत्तेत आल्यावर भांडवलदारांचा दबाव राहणार नाही.गरीब आणि शेती करण्यासाठी ज्याच्याकडे साधन नव्हते, त्यांना ‘जो जमीन सरकारी है , वो जमीन हमारी है’ या घोषणेनूसार बसपने यूपीत जमिनी उपलब्ध करवून दिल्या. यातील एक इंच जमिनही आपल्या लोकांना वाटली नाही. राजकीय पक्ष गोरगरिबांना पक्के घर देण्याचे आश्वासन देत आहेत. पंरतु, याची सुरूवात बसप सत्तेत असतांना उत्तर प्रदेशातून करण्यात आली होती. महाराष्ट्र असो वा इतर राज्यातील जातीयवादी राजकीय मानसिकतेमुळे दलितांच्या वस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. पंरतु, बसपाने त्यांच्या कार्यकाळात सम्रग विकासानूसार दलित वस्ती सुधारणेचा कार्यक्रम हाती घेतला होता, असे मायावती म्हणाल्या.
यूपीत बसपाच्या सत्ताकाळात सर्वसमाजाच्या लोकांना सोबत घेवून सद्धभावना निर्माण करण्यात आली. आता महारष्ट्रातील समस्यामुक्तीसाठी उत्तर प्रदेशप्रमाणे बसपाच्या ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ विचारधारेच्या मागे उभं राहण्याचे आवाहन मायावतींनी केले. संपूर्ण निवडणूकीपर्यंत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या साम-दंड-भेद नितीपासून दूर राहवे. सर्व विरोधी पक्षांनी बसपाला सत्तेत येण्यापासून रोखण्याकरिता दलित मत विभाजनासाठी षडयंत्र आखले असल्याचे मायावती म्हणाल्या. डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीला कमकुवत करण्यासाठी त्यांच्या हयातीत त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने बाबू जगजजीवन राम यांना मोठ्या मोठ्या पदावर संधी दिल्याचे मायावती म्हणाल्या.
प्रसिद्धीमाध्यमे, ओपिनियन पोल, विविध सव्र्हे, सोशल मीडियांच्या माध्यमातून मत प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाईल. यापासून सावध राहण्याचे आवाहन मायावती यांनी केले. महाराष्ट्राच्या हितासाठी बसपाला सत्तेत आणणे आवश्यक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे महत्वाचे कार्य आपण सर्वांना मिळून करायचे आहे. डॉ. आंबेडकरांची महान चळवळ पुढे नेण्याचे कार्य मान्यवर कांशीराम यांनी महाराष्ट्रातूनच सुरू केले होते. बाबासाहेबांप्रमाणे कांशीराम यांची देखील ही कर्मभूमी राहीली आहे. अशात बसपा उमेदवारा समोरील पक्ष चिन्हाचे हत्ती बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे तसेच पक्षाचे एकही मत सुटणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी मायावती यांनी केले.
महासभेत मा.बहन मायावती यांच्या सह पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद, राज्यसभा खासदार आणि केंद्रीय समन्वयक रामजी गौतम, केंद्रीय समन्वयक, महाराष्ट्र प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव काळुराम चौधरी, प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे व पुणे जिल्हा प्रभारी मोहम्मद शफी प्रामुख्याने उपस्थित होते.
🔺कुठल्याही वर्गावर आता अन्याय होणार नाही-आकाश आनंद
राज्यातील सर्व कार्यकर्ते बसप उमेदवाराला विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत. आता सुश्री बहनजींनी ज्याप्रमाणे अन्यायमुक्त समाज उभारला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही आता कुणावर अन्याय होणार नाही, असे प्रतिपादन बसपचे राष्ट्रीय समन्वय आकाश आनंद यांनी यावेळी व्यक्त केले. दलित-आदिवासी तसेच इतर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी महान संत गुरू, महापुरूष फुले- शाहू- नारायण गुरू-आंबेडकर आणि कांशिराम साहेबांनी कष्ट घेतले. त्यांच्याच कष्टामुळे मायावतीजींनी देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवून उपेक्षितांना बळ दिले. त्या मुख्यमंत्री असतांना समाजातील कुठल्याही वर्गावर त्यांनी अन्याय होवू दिला नाही. आता असेच कार्य महाराष्ट्रातही बघायला मिळेल. त्यामुळे बसपचे हत्ती निवडणूक चिन्ह दाबून पक्षाच्या उमेदवरांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन यावेळी आकाश आनंद यांनी केले.