कॉग्रेस जळत घर आहे तिचे चार आण्याचे मेंबर होऊ नका! असे कधी काळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे तरी म्हटले होते. त्याच बाबासाहेबांनी ज्या लोकांना खेड्यातून शहरात आणले त्यांना शिक्षणाची सुवर्ण संधी दिली, त्यामुळे त्यांना नोकरी मिळाली, नोकरीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिति बदलली. ते लोक गवताच्या प्लास्टिकच्या झोपडीतून सिमेंट कॉनक्रेटच्या पक्क्या इमारतीत राहण्यास गेले. आणि आपले पूर्वीचे दिवस विसरले. नोकरी करत असतांना त्यांनी आपल्या मुलामुलीचे शिक्षण करून त्यांना ही नोकरी मिळवून दिली. आता ते सेवानिवृत झाले तरी त्यांना बाबासाहेबांनी सोडले नाही. सेवानिवृती नंतर ही त्यांना जगण्यासाठी पेन्शन बाबासाहेबांनीच दिली.
हेच शिक्षण, नोकरी, सेवानिवृतीतील सर्व सवलती घेत असतांना त्यांना बाबासाहेबांचे योगदान मान्य नाही. ते सांगतात बाबासाहेबांना मानणारा समाज, त्यांचे नेते-कार्यकर्ते आणि पक्ष गरीब आहे त्यांना मतदान करून आपली शक्ति वाया जाईल. ते निवडून येणार नाहीत म्हणून कॉग्रेस महाविकास आघाडीला मतदान करा. कारण कॉग्रेस नाही वंचित जलते घर आहे तिला मतदान करू नका? हे लिहतांना मला प्रचंड चीड येतं आहे. वंचित बहुजन आघाडीचे समर्थन करणारे लेख मी लिहले. त्यामुळे अनेक सुरक्षित नोकरी करणाऱ्या व सेवानिवृत गद्धार महारांनी मला अनफड, अज्ञानी मूर्ख ठरविले. तर काही समाजाचे वृतपत्र काढणारे संपादक ही मी हे चुकीचे लिहतो असा शिक्का मारून मोकळे झाले. त्यांना ही प्रकाश आंबेडकर यांची एकूण स्वाभिमानी वाटचाल चुकीची वाटते. जे उघड्या डोळ्याने स्पष्ट दिसते त्याचे विश्लेषण निर्भीड, निपक्ष निर्भय पणे करण्या येवजी मागील चुका लक्षात ठेवून चुका शोधत बसण्याला ते खूप हुशार बुद्धिजीवी स्वताला म्हणत आहेत. त्यांचा हा संदेश आहे. कॉग्रेस जळत घर नाही तर वंचित जळते घर आहे तिला मतदान करू नका असा आहे.
तथागत गौतम बुद्ध यांच्या काळात राजा प्रसेनजित म्हणून राजा होऊन गेला. या राजाचा आवडता हत्ती अचानक एका पायाने लंगडू लागला. त्यामुळे राजा प्रसेनजित फार दुःखी झाला, कष्टी झाला. ही गोष्ट ज्यावेळेस तथागत गौतम बुद्धांना कळाली. ते स्वतः होऊन राजवाड्यावर गेले. हत्तीचा पाय पाहिला तर कोठेही कोणत्याही प्रकारची जखम नाही. तदनंतर त्यांनी त्या हत्तीच्या माहुताला बोलावले. त्याच्या हातात दोरी दिली. माहुत पुढे आणि त्याच्या पाठीमागे हत्ती लंगडत चालत होता. काही वेळानंतर गौतम बुद्धांनी त्या माहुताच्या हातातील दोरी आपल्या हाती घेतली. तथागत गौतम बुद्ध पुढे आणि पाठीमागून लंगडत चाललेला हत्ती अचानक सरळ चालू लागला. हे दृष्य पाहिल्यानंतर राजा प्रसेनजित आनंदीत झाला. हर्षित झाला. आनंदाच्या भरात त्यांनी तथागत बुद्धांच्या पायावर लोळण घेतली. त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचा अद्भुत चमत्कार घडवून आणलेला नसून या हत्तीचा माहूत एका पायाने लंगडा होता. त्यामुळे हत्ती त्याचे अनुकरण करत होता. बंधूंनो, ज्या समाजाचा नेता माहुत हा विचाराने लंगडा आणि कर्माने विकृत असेल तर त्याचा समाज सुद्धा त्याचेच अनुकरण करत असतो.
देशात बहुजन समाजाचे नेतृत्व मान्यवर कांशीराम यांनी केले तेव्हा त्यांनी तसा कॅडर बेस कार्यकर्त्या तयार केला. त्या कॅडर बेस कार्यकर्त्यांनी तसा न बिकणारा समाज तयार केला. २०१२ नंतर चा समाज कार्यकर्त्या व नेतृत्व आपण जाणता. महाराष्ट्रात अँड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्ते व समाज पाहतो. तडजोड करून स्वाभिमान गहाण ठेऊन काम करण्यास तयार नाही. दुसरीकडे आंबेडकरी चळवळीतील रिपाई, दलित पँथरचे ज्येष्ट नेते कार्यकर्ते समाज स्वाभिमान गहाण ठेवून गुलामा, सालदारा सारखा लाचार बनुन महायुती, महा विकास आघाडीचे काम करतांना दिसतात. तो ही म्हणतो आणि समजतो, कॉग्रेस नाही वंचित जळते घर आहे तिला मतदान करू नका?.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर चैत्यभूमी दादर मुंबई, १ जानेवारी शौर्य दिन भिमा कोरेगांव, विजया दशमी नागपूर आणि महाड चवदार तळे येथे येणारी गर्दी त्यांचे लाखो लोकांचे नेतृत्व कोण करते?.. हत्ती सारखा अवाढव्य असलेला हा समाज कोणत्या माहुताच्या मागे लंगडत जात आहे. याचा विचारा कधी करणार?१९७२ दलित पँथरचा काळ होता. दलितांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायाची सीमा नव्हती कुठे नां कुठे बलात्कार, सामूहिक बलात्कार, सामुदायिक हल्ले अन्याय अत्याचार नियमित पणे होत होते. मुंबईत राहणारे नेते पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवून ईशारा, धमक्या देत होते. पण काही लोक पँथरचे छावे असे होते कि रात्री दोन वाजता गावात जाऊन तोडफोड करून धडा शिकवत होते. त्यांचे नांवे शेवट पर्यंत कुठे प्रसिद्ध झाले नव्हते. त्यातच त्यांची सुरक्षित नोकरी गेली. म्हणूनच तेव्हा पँथरची एक घोषणा होती. “कल करे आज, आज करे सो अभी” म्हणजेच शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा!. एक दिवस पँथर, वाघ सिंह बनून जागा. आता आजची परिस्थितीती काय आहे. एक ना धड भारा भर चिंद्या. सर्वच वाघ शेळ्या बनून मनुवाद्याचा मासाहार बनत नाही काय ?. मराठवाडा विद्यापीठ नमांतरासाठी १६ वर्ष कॉँग्रेस विरोधात जन आंदोलन करून नेते झालेल जहाल नेते त्यांचे चिलेपिळे आजकुठे आहेत? २०० बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक, संपादक, पत्रकार, लेखक, सेवानिवृत अधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीत जी भूमिका घेतली तीच आज ही कायम आहे. त्यांना कॉग्रेस जळत घर वाटत नाही, तर वंचित जळते घर आहे तिला मतदान करू नका असा त्यांचा संदेश आहे.
बाबासाहेबांनी सांगितले होते खेडे सोडा, शहर गाठा. गांवात राहिल्यास पाटलांच्या मर्जीने काम करून मजुरी घ्यावी लागेल. आणि शहरात गेल्यावर तुमची मजुरी तुम्ही ठरवणार. म्हणूनच आज शहराचा सिमेंट कॉन्कॅरेट चा विकास सर्वांना दिसतो. पण तो बनविणारा असंघटीत कष्टकरी मजूर, कामगार कोणाला दिसत नाही. बाबासाहेबाचा जय जय कार करणारा हा समाज मजूर,कामगार म्हणून संघटीत होतांना दिसत नाही. म्हणूनच बाबासाहेब सांगत होते तुम्ही केवळ तुमच्या समाजाला शहाणे आणि जागृत करण्याचे काम करा. त्यांच्या आर्थिक शोषणाचे रूपांतर नंतर लाचारीत होणार नाही ते शहरात कोणते ही काम करून स्वाभिमानी बनून जगतील.असे त्यांना अपेक्षित असलेले बदल कुठे ही दिसत नाही. गावातील लाचार मजूर आज शहरात झोपडपट्टीत राहत आहे. तो आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण तो कामगार म्हणूनच पुन्हा लाचार झालेला दिसत आहे. त्यांच्या खांद्यावर निळा कमी आणि लाल, हिरवा, भगवा जास्त दिसत आहे. तो नाक्यावर श्रम विकतो आणि नगरात इमान विकण्याचे काम करतो. आणि खातो तो घास घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे म्हणायला विसरत नाही. २० नोव्हेबर २०२४ ला तो कोणाला मतदान करतो ते २३ नोव्हेबरला समजेलच. पण ज्यांनी महायुती, महाविकास आघाडीला मतदान केले तर त्यांनी चैत्यभूमी दादर मुंबईला येऊन गर्दी करून संख्या दाखवू नये. आणि बाबासाहेबांची फसवणूक करू नये.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक संस्कृती धार्मिक, आणि विशेष कामगार चळवळ, राजकीय चळवळ मध्ये लक्षवेधी कार्य करून ठेवले आहे. ते पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी समाजाने एकसंघ बनले पाहिजे. निवडणुक ही एक तुमची संख्या दाखविण्यासाठी दर पाच वर्षांनी होणारी प्रक्रिया आहे. त्यातुनच समाजाचे लोक प्रतिनिधी निवडून जातात. जे बहुमताने निवडून जातात ते सत्ताधारी होतात. जे कमी संख्येने निवडून जातात ते विरोधी पक्षनेते बनतात. जे निवडूण जात नाही, दुसऱ्या तिसऱ्या नंबरची मतदान संख्या घेतात ते ही जन आंदोलन करण्याचे कायम विरोधी पक्षाचे काम करत असतात. त्यांना साथ देणारे अन्याय अत्याचार गस्त लोक असतात. त्यावेळी त्यांना मतदानाची किंमत समजते. आपण निवडून दिलेला उमेदवार त्यांचा पक्ष कुठे ही दिसत नाही.
एक बाजूला शिक्षणात कोंडी करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) ८६१ विध्यार्थांना फेलोशिप देण्तासाठी २० फेबुर्वारी २०२३ पासून आझाद मैदानांत बेमुदत धरणे आंदोलन कोणी केले. तर दुसरीकडे कान गावात बौद्धांना गाव सोडून जाण्याची पाळी आली. तेव्हा महायुती आणि महाविकास आघाडी चे समर्थक बुद्धिजीवी विचारवंत, साहित्यिक, संपादक, लेखक, पत्रकार कुठे होते?. म्हणजेच सामाजिक न्याय आमच्या वाट्याला येताना किती अडथळे अजून शिलक आहेत याचा अंदाज आला पाहिजे. ज्यांना महायुती, महाविकास आघाडीला मतदान करण्यात धन्यता वाटत असेल तर,त्यांनी बिनधास्त करावे. भविष्याची कोणती ही चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी पूर्वीच्या दिवसाचे हार्दिक स्वागत करावे.
✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप, मुंबई)मो:-९९२०४०३८५९