Home महाराष्ट्र आचारसंहिता कालावधीत अवैध दारूसंदर्भात 300 गुन्हे दाखल- राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

आचारसंहिता कालावधीत अवैध दारूसंदर्भात 300 गुन्हे दाखल- राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

117

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.12नोव्हेंबर):- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निवडणूक कालावधीत रोकड, दारु जप्ती, चेक पोस्टवर वाहनांची कडक तपासणी आदींबाबत सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 300 गुन्हे नोंदविले असून यात 15770 लिटर दारूसह 29 वाहने जप्त केली आहेत.

जिल्ह्यात मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाभरात सहा विशेष पथके तयार केली असून या पथकात एक निरिक्षक, तीन दुय्यम निरिक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांकडून सहाही विधानसभा मतदारसंघात रात्रंदिवस अवैध दारूविरुद्ध पाळत ठेवून कारवाई करण्यात येत आहे. आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 300 गुन्ह्यात 280 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून या संपूर्ण कारवाईत 826 हातभट्टी दारू, 11930 लिटर मोहा सडवा, 2538 लिटर देशी दारू, 240 लिटर विदेशी दारू, 88 लिटर बियर, 142 लिटर ताडी, पाच लिटर परराज्यातील विदेशी दारू अशी एकूण 15770 लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे.

यादरम्यान दारुची अवैधरीत्या वाहतूक करणारी 29 वाहनेही विभागाने जप्त केली असून एकूण मुद्देमालाची किंमत 40 लाख 61 हजार 105 रुपये आहे. याव्यतिरिक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तेलंगणा राज्याच्या सीमेवर परसोडा (ता. कोरपना) व लक्कडकोट (ता.राजुरा) या ठिकाणी सीमा तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच वर्धा व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरही अवैध वाहतुकीवर पाळत ठेवण्यात येत आहे.

*नागरिकांना आवाहन :* कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here