विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उजवेडावे हात समजणारे नेते दादासाहेब गायकवाड, एड.बी सी कांबळे यांनी १९५७ पासून कॉँग्रेस बरोबर युती आघाडीचा करण्याची सुरुवात केली. त्यावेळी त्यांची एक म्हण प्रसिद्ध होती. “गाजरांची पुंगी वाजले तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.” सर्व बहुसंख्य मागासवर्गीय ओबीसी,गरीब मराठा, आदिवाशी भटक्या, विमुकत्यासह अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या मतदारांना सोबत घेऊन स्वताची शक्ति सिद्ध करून दाखविण्याची ठोस हिंमत त्यांनी दाखविली नाही. मान्यवर कांशीराम यांनी उत्तर भारतात ज्या प्रमाणे बहुजन समाज संघटित करून चार वेळ सत्ता मिळविली. तशी कामगिरी महाराष्ट्रात कोणी केली नाही. ती आज प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काही प्रमाणात दिसत आहे.
आंबेडकरी चळवळीतल्या आजवरच्या नेत्यांनी आजवर बहूजनांसाठी कुठलीही ठोस भुमिका घेतली नाही,फक्त आंदोलन मोर्चापुरता कार्यकर्त्यांचा फक्त वापरच केला,कार्यकर्त्यांना सामाजिक व आर्थिक सक्षम करायचे सोडून स्वार्थापलिकडे कुठलेही राजकीय संरक्षण दिले नाही तथा सत्तेत सहभागी केले नाही,उलट कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा एक कलमी कार्यक्रम आखून चळवळीबरोबर तमाम कार्यकर्त्यांचे आयुष्य उध्वस्तच केलेले पहायला मिळाले, याचाच परिणाम म्हणून रिपब्लिकन पक्षाचे अनेक गटतट तयार होऊन त्या गटाचे हे स्वार्थी नेते गटाधिपती झाले, आज ना उद्या काहीतरी हाती लागेल या आशेने चळवळीतले काही कार्यकर्ते नेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले,bपरंतू आतल्या आत तीळतीळ जळतही राहीले, आणि आजमितीला तेच कार्यकर्ते उध्वस्त होतांना दिसत आहे,महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचे व खासदार नितिन गडकरी यांनी बाबासाहेबांनच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्या नंतर बाबासाहेबांचा जयघोष करण्या ऐवजी कार्यकर्त्यांनी समर्थकांनी श्रीरामाचा जयघोष केला.
अभिवादन? करण्यासाठी ही गर्दी करण्यात आली होती की अपमान करण्यासाठी हा प्रश्न उभा राहतो. भाजप कार्यकर्त्यांचा उन्मात इतका, होता की संविधान चौकातील बागीचाचे रेलिंग तोडल्या गेले. संविधान चौक नागपूर येथे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर अमानवीय कृत्य फडणवीसांच्या नामांकन अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांकडून माल्यार्पण करतेवेळी घडले. त्यावेळी नितिन गडकरी, प्रा.जोगेंद्र कवाडेसह सुलेखाताई कुंभारें, जयदीप कवाडे, माजी आमदार मिलिंद माने यांची विशेष उपस्थिती होती. डॉ.बाबासाहेबांचा पुतळ्याच्या आजूबाजूचे पंचशील ध्वजही वाकवल्या गेले. लाचार दलित नेता म्हणवणाऱ्यांच्या उपस्थितीत हे कृत्य घडले. नेत्यानी मौन धारण केले. मात्र समाजात सर्वत्र तीव्र निषेध करून असंतोष दिसत आहे. तो खरा की खोटा हे २३ नोव्हेंबरला दिसला पाहिजे. म्हणूनच लिहतो चला तर विधान सभा निवडणुकीत नवा इतिहास घडवू या.
स्वार्थी नेत्यांनी लढवय्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालून तर विविध सोशल इंजिनिअरींगचे प्रयोग करून फक्त लढतच ठेवलं अन् झुलतच ठेवलं, काहीचे आयुष्य आजही कारागृहात तर काहीचे आयुष्य न्यायालयाच्या पाय-या झिजविण्यात उध्वस्त झाले,भावनिक जन आंदोलनात भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांना त्याची शिक्षा आज ही भोगावी लागत आहे. त्यामुळेच आज ही प्रत्येक आंदोलनात मागील जन आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावे ही मांगणी असते. म्हणूनच स्वार्था पलिकडे लक्ष नसलेल्या कुठल्याच नेत्यांना कार्यकर्त्यांच्या वेदनेची जाणिव झाली नाही. कार्यकर्त्यांनी बेंबीच्या देठातून ओरडत नेत्यांचा जयघोष करायचा अन् नेत्यांना नेतृत्वाच्या नि आर्थिक यशाच्या उच्च शिखरावर नेऊन बसवायचं आणि स्वत:मात्र डोळ्यातून घळाघळा गळणा-या वेदनेचे अश्रू गिळत नौटंकी करत समाधानी असल्याचा अभास निर्माण करत समाजात उधारीवरच्या कडक कपड्यात मिरवायचं, नागपूरच्या झीरो पॉइंट वरील संविधान चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना झालेल्या घटनेने कवाडे सरातील ज्वालामुखी बाहेर फुटला पाहिजे होता.
तो कुठे ही दिसला नाही. स्वतचे कोणतेही अस्तित्व नसणारे नेते समाजाला लाचार गुलाम बनविण्यासाठी भाजपाच्या महायुती सर्कस मधील पाळीव प्राणी झाले आहेत.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ट नेते आणि कार्यकर्ते म्हणजे एकापेक्षा एक सरस कामगिरी करणारे आहेत, असे त्याच्या बोलण्यातून भाषणातून नेहमीच जाणवते. माझे नावी समाजाचे प्रकाश चव्हाण एक कार्यकर्ते त्यांची तुलना करतांना मला सांगतात. आंबेडकरी विचारांचा लढाऊ कार्यकर्ता म्हणजे “लाखो की बाते करोडो की भुल चोपडी निकाली तो मुद्दल गुल” हे तपाण्यासाठी निवडणूकीत एकूण आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मतदार संघातील मिळालेली मते त्यांची एकूण मतदार संघातील संख्या व मिळालेली मते त्यांची वजा बाकी बेरीज केली तर गुणाकार होत नाही तर भागाकार होतो.
म्हणूनच जून्या ज्येष्ट नेते, कार्यकर्त्यांना या जुन्या खोडांना पाणी घालून पालवी फोडण्याचा किती केविलवाणा प्रयत्न करणार आहोत हा प्रश्न तरुणांसमोर उभा राहिला पाहिजे. आणि भावनिक होवून खोटारडे चेहरे किती दिवस पुजत बसणार रोजचं आमचा असंघटीत कष्टकरी कामगार पोटाला चिमटा देऊन जगतो, तरी कुणाला न दाखवता उधारी करून का होईना परंतू बड्या बड्या बाता करीत पोलीस अधिकाऱ्यां समोर तहसील कचेरीच्या दारोदारी ताटमाने आपली व आपल्या समाजाची समस्या ठाम पणे मांडतो. काही मिळेल याच आशेवर, रात्री झोपतांना मात्र उद्याचे स्वप्न पाहतो. कारण सत्त्ते शिवाय परीवर्तन त्यांच्या बुद्ध फुले आंबेडकर यांनी करून दाखविले. हेचं तो विसरत नाही.
म्हणूनच संघर्ष करण्यासाठी सैदव्य तयार असतो.कधी तरी नवीन पर्यायांना वाव देऊ दिल पाहिजे, जो स्वत:स्वत:च्या सत्तेची वाट बंद करून बहूजनातील तरूणाईसाठी सत्तेची वाट खुली करून देतो,अशा पर्याय देणाऱ्या एड प्रकाश आंबेडकर यांना साथ देण्यास पुढाकार न घेता. त्यांच्यावरच अविश्वास निर्माण करण्याचे काम काही बुद्धिजीवी विचारवंत, प्राध्यापक, साहित्यिक, संपादक करतांना दिसत आहेत. आजच्या निवडणुकीच्या काळात जात दांडगे, धन दांडगे राजकीय घरानेशाहीच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी किती मतदान खाईल यांची भीती वाटत आहे. कदाचित हा प्रयोग यशस्वी होणार नाही. पण स्वताचे अस्तित्व निर्माण करून वंचित बहुजन समाजाला ताटमानेने जगण्यास प्रेरणा देईल. हे मात्र नक्की सांगता येईल.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पक्षाच्या उद्देश पत्रिकेत नमूद केलेल्या तत्वांच्या पुर्तीसाठी अर्थात,अनुसुचित जाती जमाती व अन्य मागासल्या वर्गांना, शेतमजूर, भुमिपुत्र, कारखान्यातील मजूर व इतर हात मजूर,यांना संघटीत करून,स्वतंत्र मजूर पक्ष हा अस्पृश्यांचा पहिला राजकीय पक्ष होता.यात सर्व अस्पृश्य, शेतकरी, शेतमजूर व कामगार सामील होणे गरजेचे होते; परंतु तसे आज पर्यन्त झाले नाही. “पूर्वाश्रमीच्या महार समाजाने या पक्षाला सहकार्य केले त्याप्रमाणे अस्पृश्यांमधील चांभार व मातंग,या समाजाने फारसे सहकार्य केले नाही. आणि विविध जातिधर्मातील शेतकरी-शेतमजूर व कामगारवर्ग जातीच्या व धर्माच्या नावाखाली विभागला गेल्यामुळे या सर्वांचे फारसे सहकार्य लाभले नाही. त्यामुळे हा पक्ष शक्तीशाली होऊ शकला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दलित, शोषित, कष्टकरी समाजाला एका निश्चित मार्गावर आणून सोडले. त्यांना अनेक निष्ठावान कार्यकर्ते मिळाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या निष्ठा समर्पित करून एकाच ध्येयाने व त्यागाने आंबेडकरी आंदोलनाची ताकद उभी केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला लाखोंच्या संख्येने दलित, कष्टकरी समाजाने उपस्थिती दर्शविली. कोणत्याही तथाकथित भारतीय नेत्याला मिळाले नसतील तेवढे हात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले. त्यावेळी स्वतंत्र मजूर पक्षासारखा सुसंघटित व नियमबद्ध असा एकही पक्ष नव्हता. हा भारतातील पहिलाच राजकीय पक्ष असा होता की जो संपूर्ण समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्यासाठी सारखा धडपडत होता. या पक्षाची स्थापना वर्गीय जाणिवेतून झाली असल्याने सर्व कष्टक-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक समजले होते. तो दलित असो, श्रमिक असो, शेतमजूर असो अथवा लहान शेतकरी असो. या वर्गाच्या हितासाठी सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी या पक्षाचा लढा होता. म्हणूनच हा पक्ष अल्पावधितच मुंबई प्रांतातील शहरांपासून ते खेड्यांमधील कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यापर्यंत जाऊन पोहचला. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष चार वर्षात सर्वांना दखल घेण्यासाठी पात्र ठरविला. अनेक प्रस्थापिक पक्षाचे नेते शेवटच्या क्षणी वंचित चे तिकीट घेण्यासाठी येतात. हे कशाचे लक्षण आहे.
भारतीयांच्या नैतीक व अध्यात्मिक विकासासाठी दुर्लक्षित,शोषित वर्गावर अत्याचारीत समुहासाठी ठोस असे काम व्हायला हवे होते,परंतू तसे झाले नाही, काही मुठभर लोकांनी प्रस्थापीतांना हाताशी धरून स्वत:ची घरं भरली, आता त्यांनाच शोषीत पिडीत तथा दुर्लक्षीत असलेल्या समाज बांधवांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.जो तो राजकीय स्वयंघोषीत राष्ट्रीय नेता व कार्यकर्ता उठतो अन् मीच बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष संघटन चालवित आहे असे दाखवतो, परंतू वस्तुस्थिती फार वेगळी आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेला याच स्वयंघोषीत पुढा-यांनी गुळगुळीत केले आहे, म्हणुन लिहासे वाटते, दर पाच वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका यंदाही येत आहेत. निवडणुका आल्या की अंगात एक वेगळीच उर्जा कार्यकर्त्यांच्या अंगात संचारते, आणि दिवसेंदिवस ही निवडणुक एक नवी प्रेरणा घेऊन येते अन् दिशाहिन करून जाते.असे असले तरी त्या दिशेने माझा आंबेडकरी बांधव जातो का? हा एक संशोधनाचा अन् चिंतनाचा विषय बनला आहे.
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी जीव ओतणारे आम्ही, असंघटीत कष्टकरी कामगार, शेतमजुर अर्थातच जीवाचीही पर्वा न करणारे आम्ही आज ६८ वर्ष उलटून गेली तरी, बाबासाहेबांना अपेक्षीत असे लक्षवेधी प्रेरणादायी काम कुठेही झालेले का दिसत नाही. मग पुन्हा पुन्हा तोच प्रश्न डोळ्यासमोर आ वासून उभा राहतो, की भीमा कोरेगाव, महाड चवदार तळे,येवले क्रांती भूमी आणि चैत्यभूमी,दीक्षा भुमी,येथे मिळणारी उर्जा अन् त्यातून मिळणारी प्रेरणा जाते कुठे?. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत का नाही? बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग तरी आम्हाला समजलाय का? आमच्या आंबेडकरी बांधवांना राजकारण, समाजकारण,धम्मकारण,याची तरी स्पष्टता आलीय का? याची मनात सारखी घुसळण होत असते, मनाला प्रचंड वेदना होतात की, महामानवाने तुमच्या आमच्यासाठीच नव्हे तर तमाम भारतीयांच्या कल्याणासाठी जीवाचे रान केले, आपलं संपुर्ण कुटूंब मातीत गाडल्या गेले तरी त्या वेदना उराशी दाबून माझ्या शोषीत पिडीत दुर्लक्षीत समाजबांधवांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी उभं आयुष्य वेचलं, आज त्याच महामानवाला अभिवादन तथा मानवंदना देतांना आपण लाखोंच्या संख्येने येऊन कोणतं अभिवादन करतोय किंवा मानवंदना देतोय,की नुसताच दिखावा करतोय याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
भीमा कोरेगाव,महाड चवदार तळे, येवले क्रांतीभूमी आणि चैत्यभूमी, दीक्षा भुमीवर लाखोंची गर्दी मतदान करतांना कोणत्याही मतदार संघात का दिसत नाही.
एकीकडे देशावर संविधान बदलाचे मोठे संकट उभे आहे,आणि दुसरीकडे आम्ही आपल्याच समाज बांधवांच्या उरावर बसून कुरघोड्यांचं राजकारण,समाजकारण किंवा धम्मकारण करत आहोत, प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण घुसवलं आहे, आम्ही ना राजकीय, सामाजिक, धम्म चळवळ यशस्वीपणे पुर्ण क्षमतेनं उभी करू शकलो नाही. प्रत्येक गोष्टीत स्वार्थ अन मीपणा आडवा आला,आम्ही सातत्याने हवेतच उडत राहतो. एकमेकांच्या उरावर बसत कुरघोड्या करण्यातच आमच्या समाजातल्या पुढा-यांचा व कार्यकर्त्यांचा वेळ गेला.स्वयंघोषीत पुढा-यांचे व उध्दवस्त कार्यकर्त्यांचे संपत चाललेले आयुष्य तरी नवनेतृत्वाला पुढे येऊच दिले जात नाही. अशावेळी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्ष संघटनेत जाऊन हाती काही लागेल यासाठी आसरा घेतला.आणि इथला निराश कार्यकर्ता तिथेही हताश असतो, परंतू आंबेडकरी चळवळीकडे काही आशावाद दिसत नाही,म्हणून नाईलाजाने लाचारी पत्करतो, एवढं सगळं असूनही आंबेडकरी चळवळीची कुस बदलायला कुणीच तयार नाही. कुणालाच चळवळीच्या भवितव्याचं गांभीर्य उरलेलं दिसत नाही, दिखाव्यात जगणारे सगळे पुढारी व कार्यकर्ते कसे हवेत आहेत, म्हणून म्हणावसं वाटतं, कुणाला काय करायचे ते करू द्या,आता आपणच स्वत:पासून परिवर्तनाला सुरूवात करू या, दोषारोप करत बसण्यापेक्षा विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने दिलेला पर्याय वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत स्वीकारून एक दमदार सत्ताधारी नसला तरी विरोध करणारा समर्थ विरोधी पक्ष म्हणून स्वताची ओळख निर्माण करूया.
मग चला तर विधान सभा निवडणुकीत नवा इतिहास घडवू या.कारण भविष्यात येणारे सरकार कोणाचे ही असले तरी आपल्यावरील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शोषण करणारे अन्याय अत्याचार थांबणार नाहीत. त्याविरोधात लढण्यासाठी समर्थशाली पक्ष,संघटना त्यांचे नेतृत्व समाजासाठी हवे आहे. बाबासाहेबांनच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्या नंतर बाबासाहेबांचा जयघोष करण्या ऐवजी कार्यकर्त्यांनी समर्थकांनी श्रीरामाचा जयघोष केला. त्याचा निषेध न करणारी राजकीय नेते भविष्यात कोणाच्या बाजूने उभे राहून जन आंदोलन करतील?.लोकसभा निवडणुकीत बुद्धिजीवी विचारवंत, प्राध्यापक, साहित्यिक संपादक महाविकास आघाडीला मतदान करण्यास सांगितले होते. आता ही ते त्यांनाच मतदान करण्यास सांगत आहेत. नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिति, नगर पालिका, नगर पंचायत, महानगरपालिका निवडणुकीत आंबेडकरी विचारांचा पक्ष, संघटना, समाज कुठे असेल? यांचा गांभीर्याने विचार करून आता विधानसभा निवडणुकीत मतदान करा. म्हणूनच लिहतो चला तर विधान सभा निवडणुकीत नवा इतिहास घडवू या.
✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप,मुंबई.अध्यक्ष-सत्यशोधक कामगार संघटना,संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन)मो:-९९२०४०३८५९