सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी मो. 8605592830
चंद्रपूर, दि.9 : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून यासाठी सर्वांनी जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
जिल्हा प्रशासन चंद्रपूरद्वारे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती सायकल रॅली- राईड फॉर व्होटचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज (दि. 9) रोजी करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्याचप्रमाणे विविध सायकलिंग क्लबचे सायकल स्वार, जिल्हा परिषद, महानगरपालिका शिक्षक तसेच मोठ्या संख्येने नागरिक मतदानाचे आवाहन करणारे टी शर्ट व कॅप परिधान करून सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून जटपूरा गेट- गिरणार चौक- गांधी चौक या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप महानगरपालिका येथील पार्कींग मध्ये करण्यात आला. सहभागी सर्व सायकल स्वारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्नॅक्सचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, गटविकास अधिकारी धनंजय साळवे,गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रम प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुद्धा मतदार जनजागृतीसाठी उपस्थित सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सायकल रॅली व समारोपीय कार्यक्रमाचे संचालन अविनाश जुमडे यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी मानले.