Home लेख धरू विज्ञानाची कांस, करू आपला विकास! (10 नोव्हेंबर- विश्व विज्ञान दिन...

धरू विज्ञानाची कांस, करू आपला विकास! (10 नोव्हेंबर- विश्व विज्ञान दिन सप्ताह विशेष)

60

 

_सद्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. त्यामुळे विज्ञानाच्या मदतीने दररोज नवनवे शोध लागत असतात. या शोधांचे महत्त्व आणि त्याचा उपयोग जगातील प्रत्येक व्यक्तीला कळावे, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शौक्षणिक संघटनेने १० नोव्हेंबर हा दिवस जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.सि.व्ही.रमन यांनी आपले शोध सन १९२८ साली जगापुढे मांडले. म्हणून त्या निमित्ताने २८ फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. जगात अनेक ठिकाणी या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. सन १९९९ साली आंतराष्ट्रीय स्तरावर हंगेरिच्या बुडापेस्ट शहरात सर्व प्रथम संयुक्त राष्ट्रसंघाकडून वैज्ञानिक दिन आयोजित करण्यात आला. यानंतर व्यापक स्वरुपात जागतिक स्तरावर सन २००१पासून वैज्ञानिक दिवस साजरा करायला सुरवात झाली. श्रीकृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा मार्गदर्शक संकलित लेख अभ्यासुया…. संपादक._

भारतरत्न सी.व्ही.रमन प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि देशाचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ.वसंत गोवारीकर यांनी विज्ञान जनजागृतीपर अनेक योजना सुरु केल्या. तसेच वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नोबेल पुरस्कार विजेते भारतातील एकमेव व्यक्ती सी.व्ही रामन यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवसाला सुरवात झाली. जागतिक स्तरावर विज्ञान दिवस सुरू होण्याआधी भारतात राष्ट्रीय स्तरावर याची सुरूवात झाली होती हे महत्वाचे. शांती व विकासासाठी विज्ञानाचे महत्त्व हा सगळ्या मागचा हेतू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? तर कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणता येईल. अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल किंवा असेही म्हणता येईल, की जेवढा पुरावा उपलब्ध आहे, तेवढाच विश्वास ठेवणे. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे- १) जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले आणि दुष्ट शक्तिमुळे वाईट घडते, असे अजिबात होत नाही. जे काही घडते, त्यामागे निश्चितच कारण असते आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते. २) चमत्काराचा दावा, हे लोकांना मूर्खात काढण्याचे प्रभावी साधन आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. चमत्कार करणारे बदमाश, त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात. चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असतेच. ३) वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रंथप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलंय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे नाकरतो. ४) आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ विज्ञानाच्या आधारे झालेली आहे. विज्ञान नेहमीच नम्र असते, ते नवनवीन बदलांना आत्मसात करते. धर्माप्रमाने ते अंतिम सत्याचा दावा अजिबात करत नाही. ५) मानवाचा आजवरचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे. विज्ञानामुळे झालेले बदल धर्माला काळाच्या ओघात स्वीकारावे लागले आहेत. आजवर धर्माने एकही मानवी प्रगतीसाठी नविन शोध लावलेला नाही. ६) आज समाजात अनेक गोष्टी यामागे विज्ञान आहे, असे सांगून जनसामान्यांच्या माथी थोपवल्या जातात. त्या गोष्टीत नक्की विज्ञान आहे का? हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे तपासता येते. विज्ञानाला आज सगळ्या गोष्टींची कारणे माहित नाहीत, पण ती कारणे वैज्ञानिक दृष्टिकोनांच्या आधारेच समजू शकतात. ७) आपल्या जीवनात आज जे जे काही घडते, त्यामागे पूर्व संचित आहे, नियती आहे, नशीब आहे, पूर्वजन्मीचे पाप आहे. असं समजणे हा पळपुटेपणा आहे. कष्टाला पर्याय नाही, हेच वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. ८) वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छद्म विज्ञानापासून सावध राहिले पाहिजे. छद्म विज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वास्तू शास्त्र, जोतिष शास्त्र आदी होत. ९) धर्माशिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते, असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. १०) आत्मा-परमात्मा, जन्म-मृत्यु, प्रारब्ध-संचित, नशीब-मोक्ष यांची मांडणी अनेक धर्मानी, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. व्यक्तिपरत्वे हा गोंधळ बदलू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन तो सारा फसवेपणा नाकारतो. जो विज्ञानाच्या कसोटीवर टिकतो, तो तो खरा… असे वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करते. पंडित नेहरू वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व सांगताना लोकसभेत म्हणाले होते- “सायंटिफिक टेंपरॅमेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ ॲक्शन, सर्च ऑफ ट्रुथ, वे ऑफ लाईफ, स्पिरीट ऑफ फ्री मॅन.”
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता, वैज्ञानिक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. याचाच हेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटू लागला. रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३०मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.वसंतराव गोवारीकर हे सन १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या, त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण व दृष्टी निर्मितीसाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होऊ लागला. डॉ.वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले, की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ.सी.व्ही.रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर तीच तारीख निघाली. राष्ट्रीय आणि इतर विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमी, शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था यासारख्या सर्व विज्ञान संस्थांमध्ये या दिवशी विविध वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये भाषणे, निबंध, शास्त्रज्ञांचे लेखन, विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन आणि परिसंवाद इत्यादींचा समावेश होतो. विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदानासाठी राष्ट्रीय आणि इतर पुरस्कारही जाहीर केले जातात. विज्ञानाची लोकप्रियता वाढवण्यासाठी विशेष पुरस्कारही ठेवण्यात येतात.
विज्ञान दिनाची उद्दिष्टे- लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी विज्ञान दिन दरवर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे. सर्व विषयांवर चर्चा करणे आणि विज्ञान क्षेत्रात विकास साधणे यांसाठी, नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते. जगातील व देशांदेशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे. लोकांना प्रोत्साहित करणे, विज्ञानाची दृष्टी बहाल करणे, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणे आदी सांगता येतील. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे, त्यांना प्रेरित करणे, विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणे हा आहे. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही. विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे कार्यक्रम वैज्ञानिक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात. विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन साजरे केले जातात, हे ध्यानी घ्यावे.
!! विश्व विज्ञान दिनाच्या सर्वांना सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
रामनगर, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here