Home महाराष्ट्र जागतिक कीर्तीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश दिवस बनला विद्यार्थी दिवस!!!

जागतिक कीर्तीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश दिवस बनला विद्यार्थी दिवस!!!

66

मानव प्रगत होत असतांना त्याला अधिक अधिक ज्ञानाची भूक लागायला लागली. अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण याबरोबर औपचारिक शिक्षणाची गरज त्याला भासू लागली. जगात ज्ञानाची विविध साधने उपलब्ध होऊ लागली. मानवाने त्याच्या बुद्धीच्या जोरावर सखोल ज्ञान मिळविले. भारतातही ज्ञानाची असंख्य दालने खुली झालेली होती. सिंधू संस्कृतीत त्या ज्ञानाचे पडसाद उमटलेले दिसतात. चार मोठी विद्यापीठे या भारतात होती. अशा विद्यापीठाची पुस्तके सांस्कृतिक आक्रमणे बाहेरुन आलेल्या शत्रुंनी जाळली.हे खूप मोठे नुकसान भारताचे किंबहुना जगाचे झाले. यानंतर भारतामध्ये आधुनिक युगात एक हुशार विद्यार्थी जन्माला आला. त्याच्या जन्माने साऱ्या जगाला अभिमान वाटावा असा अनुभव घेता आला. असा हा विद्वान व्यक्ती कोण असेल? ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर.. ह्या भिमाचा जन्म सुभेदार रामजी सकपाळ व भिमाबाई सकपाळ यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ ला मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.

भीमरावाला प्रेमाने भिवा म्हणत असत. महू येथून सुभेदार रामजी सकपाळ यांची बदली सातारा येथे ब्रिटिश आर्मीमध्ये झाली. भिवा लहान होता. भिमाचे शिक्षण घेण्याचे वय झाले होते. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व भिमाईचे भिवा हे चौदावे अपत्य होते. मायेची छत्र लहानपणी हरपले. त्यानंतर सुभेदार रामजी सकपाळ यांनी दुसरे लग्न करुन मुलांची होणारी आबाळ थांबवली. भिवाला लहानपणापासून संत कबीर पंथांच्या सत्संगाचा लाभ झाला. कबीराच्या दोहयामधुन जीवनाचा खरा सार समजला होता. सुभेदार रामजी सकपाळ हे भीमाला सत्संगासाठी तसेच अध्यात्मिक चर्चेसाठी मंदिरात घेऊन जात असत. भीमाला चांगल्या प्रकारे समज आल्यावर भीमाला साताऱ्याच्या प्रताप सिंग हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० ला पहिलीच्या वर्गात दाखल करण्यात आले. ही शाळा सरकारी इंग्रजी शाळा होती. त्यावेळी कुणाला विश्वास वाटला नसेल कि जगातला विद्वान असणारा विद्यार्थी प्रतापसिंग हायस्कूल मध्ये शिकला असेल? सुभेदार अभ्यासू गृहस्थ होते.

त्यांना मिलिटरीची शिस्त अंगी होती. शिक्षणाचे महत्व माहीत होते. शिक्षणाशिवाय समाज पुढे येणार नाही याची जाण होती. त्यामुळे सुभेदार रामजी सकपाळ भीमाला सर्व प्रकारचे ज्ञानवर्धक ‌ पुस्तके आणून देत असत. धन्य ती शाळा घ्या शाळेत जगाने ज्याची पुस्तके ,विचार डोक्यात भरवावी इतका हुशार, प्रगल्भ, विवेकी, सृजनशील , सर्जनशील विद्यार्थी भारताला दिला. कमी आयुष्यात इतके ज्ञान आत्मसात करणे सहसा शक्य होत नाही. डॉक्टर बाबासाहेब अशी विद्यार्थी बनले की त्यांचा शाळा प्रवेश हा विद्यार्थी दिन म्हणून भारतात साजरा होऊ लागला. विद्यार्थी दिनाची सुरुवात २७ ऑक्टोबर २०१७ ला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले तसेच विनोद तावडे हे शिक्षण मंत्री असताना त्यांनी हा दिवस विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देण्यासाठी विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला. सुभेदार रामजी सपकाळ हे मिलिटरी ट्रेनिंग मध्ये इतर मिलिटरी सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असत. त्यावेळी महात्मा फुले या महापुरुषाची ओळख झाली. महात्मा फुले यांना ब्रिटिश अधिकारी मिलिटरीतील सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवित असत. त्यातून पुरोगामी विचाराची ओळख सुभेदार रामजी सकपाळ यांना झाली.

सुभेदार रामजी सकपाळ हे सुरुवातीला धार्मिक ग्रंथ वाचणारे निवेदक होते. त्यांच्या घरात विविध धार्मिक ग्रंथ वाचले जात असत. काही वर्षांनी सुभेदार रामजी सकपाळ यांची कबीर पंथाच्या लोकांशी गाठ पडली. गावात होणाऱ्या सत्संगाला कबीर पंथी लोकांनी सुभेदार रामजी सकपाळ यांना सत्संगाची गोडी लावली. सुभेदार रामजी सकपाळ हे सत्यवादी गृहस्थ होते. ते कर्मकांडातील फापट पसारा समजू लागले. मिलिटरीत असतांना महात्मा फुलेंची झालेली ओळख त्यांना ‌ पुरोगामी वृत्तीकडे घेऊन आली. जगातील नामांकित पदव्या घेणारा मुलगा भारताला सुभेदार रामजी सकपाळ यांनी सुपूर्द केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहावी पास झाल्यानंतर त्यांना सत्कारासाठी बोलवण्यात आले. हा सत्कार करणारे गुरुजी होते कृष्णाजी अर्जुन केळुस्कर.. कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेबांना भीमरावाला गौतम बुद्धाचे स्वलिखित पुस्तक सप्रेम भेट म्हणून दिले. बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचे जीवन अभ्यासले. जगाला सत्याची धरायला भाग पाडणारा विद्वान म्हणजे गौतम बुद्ध अशी धारणा त्यांच्या मनात पुस्तक वाचल्यावर रुजली.आंबेडकर पदवीधर पर्यंतचे शिक्षण मुंबईमध्ये केले. कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींनी भीमाला बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी शिफारस केली.

या शिफारसीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विदेशातून उच्च प्रतीच्या पदव्या घेता आल्या. जातिभेदाच्या या काळात राजाने हे का अस्पृश्य समाजातील मुलासाठी शिष्यवृत्ती देणे हे धाडसाचे काम होते. सनातनी व्यवस्थेच्या अगदी विरोधात हे काम होते. त्याकाळी सनातनी लोक चातुर्वर्ण्य व्यवस्था मानीत. त्यांनी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांना सुद्धा अस्पृश्य म्हणून वेदातील मंत्र नाकारले होते. डॉक्टर बाबासाहेबांनी जातीय व्यवस्था जवळून अभ्यासली होती. जातीयतेचे चटके सहन केलेले होते. जगाला मानवतेची शिकवण देण्यासाठी जगातील सर्वोत्तम विचार देणारा तथागत गौतम बुद्ध याचा धम्म म्हणजे विचार सर्वांनी स्वीकारून परमोच्च आनंदाची प्राप्ती करावी असे सुचविले. धर्मनिरपेक्षता मानणारा एकमेव हा विचार विवेकशील जगण्याचे सुचित करतो. यात कुणी ही उच्च नीच नसून सर्व एक आहेत. सर्वांना मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य निसर्गाने बहाल केलेले आहे. कोणीही कुणावर मक्तेदारी दाखवु शकणार नाही. असा सुंदर विचार देणाऱ्या तथागताचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्वानाने स्वीकारून त्याचप्रमाणे जगून उत्तम जीवन जे शीलाला महत्व देते असे जीवन प्रत्यक्ष जगून दाखवले. आज अशा प्रगल्भ विचार असणाऱ्या विद्वानाची महती जगाला झालेली आहे.

उत्तम विचार हाच खऱ्या जीवनाचा पाया आहे. असे उच्च कोटीचे विचार असलेला विद्वान आपल्या भूमीत होऊन गेला त्याच्या सन्मानार्थ विद्यार्थी दिन हा साजरा केला जातो. जगाकडे बघण्याची निरामय दृष्टी ह्या विद्वानाकडे होती. झाले असतील अनेक विचारवंत परंतु मानवतेचा विचार देणारा एकमेव आधुनिक तत्ववेता बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगात अजरामर आहे. जो जगला केवळ जगासाठी असा विद्वान पुन्हा होणार नाही. त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन घोषित करणे हे बाबासाहेबांचे आजीवन विद्यार्थी म्हणून जगण्याला केलेला सलाम आहे. बाबासाहेब खऱ्या अर्थाने विद्यार्थी होते. त्यांनी शेवटचा श्वास सोडेपर्यंत पुस्तकाचे साथ सोडली नाही. हा जन्म त्यांनी विद्यार्थी म्हणून जगाला समर्पित केला. बाबासाहेब केवळ पदव्या घेऊन बसले नाहीत तर त्या पदव्यांचा जगाच्या कल्याणासाठी उपयोग केला. जगामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सन्मान करावा असा जागतिक दर्जाचा विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांकडे पाहिले जाते. खिशात पैसा नसतांना , पोट भुकेले असतांना, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी होत असतांना ह्या महापुरुषाने जगाचा विचार केला. भारताला गुलामी मुक्त जगण्याचा ध्यास दिला. माणसाने जगामध्ये विद्यार्थी म्हणून जगावे तसेच ज्ञानाची असंख्य दालने उघडावी हा अप्रतिम संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यांच्या सन्मानार्थ दिलेल्या विद्यार्थी दिनानिमित्त मांडलेला हा छोटेखानी प्रपंच!!!!

✒️एस.एच.भवरे(उपसंपादक’ लेखनमंच’ साप्ताहिक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here