✒️चोपडा(पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि. 6नोव्हेंबर):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे ‘विद्यापीठस्तरीय युवारंग २०२४’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.
‘युवारंग २०२४’ स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाच्या उपविजेत्या संघाचा ‘गुणगौरव सोहळा’ महाविद्यालयाच्या स्मार्ट क्लास मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे व समन्वयक डॉ. शैलेश वाघ, रजिस्ट्रार डी. एम. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
‘युवारंग २०२४’ या स्पर्धेत चोपडा महाविद्यालयातील संघाने कोलाज -कांस्य पदक, व्यंगचित्र -रजत पदक, समूह गीत (पाश्चिमात्य)- सुवर्ण पदक, शास्त्रीय सुरवाद्य -सुवर्ण पदक, लोकसंगीत -रजत पदक, भारतीय सुगम गायन -रजत पदक, शास्त्रीय तालवाद्य -सुवर्ण पदक, मूकनाट्य – सुवर्ण पदक, समूह लोकनृत्य -सुवर्ण पदक, भारतीय सुगम गीत -कांस्य पदक, स्थळ चित्र -सुवर्ण पदक, इन्स्टोलेशन -रजत पदक
अशा एकूण १३ कला प्रकारात पारितोषिके प्राप्त करीत घवघवीत यश संपादन केले तसेच ‘युवारंग २०२४’ स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले. यावेळी या स्पर्धेतील विजेत्या सर्व स्पर्धकांचा, मार्गदर्शक तसेच दिग्दर्शक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘कोणत्याही कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले पाहिजे तरच यशाचे शिखर गाठता येते.
म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्यातील जिद्द, चिकाटीच्या जोरावर सतत प्रयत्नशील रहायला हवे’. कमी कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाविष्कारांचे कौतुक करून त्यांनी विद्यार्थ्यांना पेढे भरवून अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. सूर्यवंशी यांनी यशस्वी संघांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ यांनी केले तर प्रास्ताविक संघप्रमुख डॉ. हरेश चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी युवारंग स्पर्धेतील विजेते स्पर्धक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू- भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.