Home महाराष्ट्र पत्रप्रकर्ष:संवादाची उजेडलीपी

पत्रप्रकर्ष:संवादाची उजेडलीपी

28

आदरणीय डॉ. युवराज सोनटक्के सर

मल्लत्तहल्ली,बेंगळुरू
आपणास सस्नेह जयभीम..!!

आपण पाठवलेला पत्रप्रकर्ष हा पत्रलेखाचा मौलिक ग्रंथ वाचला अत्यंत प्रभावी ,चिंतनक्षम, संवेदनात्मक वास्तवदर्शी, अंतर्मनातील अनुकंपनाचे आलेख प्रस्तुत करणारा ऊर्जादायी पत्रसंवाद आहे .याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो व धन्यवाद देतो.

आपली कधीही भेट झाली नाही .मी तुमच्या अग्निशाळा या कवितासंग्रहावर समीक्षा लिहली होती अग्निशाळेतील काव्यात्मक मर्मबंध व वेदनांचे आक्रंदनाने मला प्रभावित केले होते. त्यामुळे त्यावर समीक्षा आपली भेट न होता, ओळख न होता मी करू शकलो. कारण ज्या कवितेत मानवी दृष्टिकोन असतो ,मानवीय मूल्य असतात ती कलाकृती मला स्वस्थ बसू देत नव्हती.

एकदा आपला अचानक फोन आला आणि आपण खूप वेळपर्यंत संवाददाचे आदानप्रदान करत आलो. आपली साहित्य अभिरुची व मानवतावादी जन्मजाणिवांची ओळख मला त्या संवादानातून दिसून आली. आपण प्रश्नांची मातृभाषा हा कवितासंग्रह अगत्यपूर्व पाठवला. त्यावर मी समीक्षा केली. या समीक्षेवर अनेकांनी आपले मते नोंदवलेले आहेत. प्रश्नांची मातृभाषा या समीक्षेतील नव्या शब्दांचा उपयोगाने ते अत्यंत प्रभावी झालेली आहे असे काहीचे म्हणणे होते. प्रश्नांची मातृभाषा हा कवितासंग्रह उस्मानिया विद्यापीठात लागू झाला ही अत्यंत क्रांतिकारी घटना आहे .आपल्या कवितेतील सेंद्रियत्व नव्या पिढीला, विद्यार्थ्याला अत्यंत उपयुक्त ठरतील. या अनुषंगाने मी आपले अभिनंदन करतो..

वर्तमानाचा परिप्रेक्ष बदलून गेला आहे. समाज गतिशील झाला आहे. आंबेडकरी जाणीव हीच फक्त मानवतावाद जपणारी आहे .बाकी सारे भांडवलदारी व्यवस्थेच्या चंगळवादात मशगुल आहेत. हा देश धर्मवादाच्या चक्रव्यूहात फसत आहे.मानवी मेंदू गुलाम करण्याचे वर्कशॉप जोरदारपणे सुरू झाले आहेत. एका रंगात रंगवण्याचे त्यांचे कार्य अत्यंत जोरदारपणे व सुनियोजितपणे सुरू आहे. विज्ञानाच्या संस्थेतही अवैज्ञानिक विचारांची सरमिसळ होत आहे. इस्रोचे अध्यक्ष ऋग्वेद हेच खरे ज्ञानाचे स्तोत्र आहे अशी भूमिका मांडतात .त्यामुळे भारत देशातील वैचारिकता कुठे चालली. हे आता समजून घेतले पाहिजेत .के .सिवान यांनी सुद्धा बालाजीला चंद्रयान 2 ची प्रतिकृती अर्पण केली .ही मानवीय भावना असेलही पण विज्ञानाच्या कार्यकारणभाव न समजता अशी कृती करणे म्हणजे विज्ञानालाच मातीत गाढणे होय. म्हणून पूर्वग्रह दृष्टिकोनाच्या प्रभावाने आजचे विज्ञान चालत राहिले तर वर्तमान विज्ञान दृष्टिकोन मागे पडेल असे मला वाटते. हा विषयांतराचा भाग आहे पण यावर आपण बोललो पाहिजेत असे मला वाटते. आपण विज्ञानाचे विद्यार्थी असल्या कारणामुळे आपल्या भूमिका जडवादी व वास्तववादी असायला हवी असे मला वाटते.

प्रथम पत्रप्रकर्ष या पत्रसंवादरुपी ग्रंथातात मराठीत 93 हिंदीत 22 व 11 इंग्रजीत पत्र लिहिलेले आहेत. उजेडाच्या डोंगराची गोष्ट ते साकीत युवराज पर्यंतचे पत्रप्रपंच अत्यंत भावुक व मनोवेधक चिंतनाचा मूल्य जागर आहे. अनेकांनी आपल्या समग्र साहित्य चळवळीवर भाष्य केलेले आहे. सावनेर -नागपूर आणि बंगलोर येथील आपल्या कार्यायावर अनेक लोकांनी चिंतन मांडलेले आहे. आपण आपल्या तरुण काळामध्ये व आताही शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक चळवळ मध्ये हिरीहिरीने भाग घेत असता. ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तुमच्या साहित्यावर अनेक पत्रामधून कामाचे विश्लेषण केलेले आहे. तुम्ही कामाचा जो जिवंत डोंगर तयार करून ठेवला तो सोपा नाही. तो सहज निर्माण करता येत नाही .वाड्मयातील निष्ठेचं एक आगळेवेगळे उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. ही कार्यसमीक्षा अत्यंत प्रभावी आहे. तसेच डॉ.मा.प थोरात यांनी मेलुहहा सिंधू सभ्यतेमध्ये विवाहातील सूक्ष्म अवलोकनाचे पाठवलेले पत्र वाचकाला अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहे. साकित युवराज ने लिहिलेले पत्र तुमच्या लेखनाच्या प्रभावाचे प्रकर्षत्वाचे अनुबंध पडलेले दिसते.

आज सारे जग मोह,माया व सःहित यामध्ये गुंतून असताना आपण आंबेडकरवादी वैचारिक विज्ञानतेला धरून आपले जीवन घालवत आहात. ही गोष्टच दुर्मिळ आहे. कारण वर्तमानाच्या वास्तवात आज कोणीही लिहायला, बोलायला तयार नाहीत. साठोत्तरी साहित्यातील अग्नीज्वाला आज मागे पडल्यागत वाटत आहे. अनेक कवी व लेखक चिंतनात्मक लेखनावर भर देत नाहीत. कारण अनेक कवी व लेखक हौशीगवशे तयार झालेले आहेत.

पण आंबेडकरवादी साहित्य हेच क्रांतीत्वाचे साहित्य आहे . डॉ.यशवंत मनोहर, डॉ.सोनटक्के सर व इतर साहित्यकाच्या मार्गदर्शनाखाली नवी पिढी आपले लेखन करत आहेत. प्रभावी कलाकृतीतून निर्माण करून समाजाला दिशादर्शक देत आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

आपण जे कार्य करत आहात हा तुमचा इतिहास आहे. कलाकृतीतून तुम्ही बुद्ध, फुले, शाहू व आंबेडकरांच्या मानवी दृष्टीकोनाचा प्रवाह सदोदित वाहत ठेवत आहात. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या सेवानिवृत्ती जीवनाला मंगलकामना चिंतितो…!! आपल्या घरातील सर्व मंडळींना माझ्याकडून क्रांतिकारी जयभीम..!!

आपण सदैव अग्नीज्वालेच्या प्रकाशाने समाजातील अंधाराला उजेडाचे दान देत राहावे. व प्रश्नांच्या मातृभाषेतून माय मराठीचे महत्त्व पटवून देत राहावे हीच आशा करतो, थांबतो..!!!

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-9637357400

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here