Home लेख हॅप्पी बर्थडे किंग कोहली !

हॅप्पी बर्थडे किंग कोहली !

33

 

क्रिकेटचा किंग, चेस मास्टर, विक्रमवीर, रन मशिन यासारखी अनेक बिरुदावली ज्याच्या नावापुढे लागली आहेत तो भारताचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फलंदाज, भारताचा कोहिनूर विराट कोहलीचा आज ३६ वा वाढदिवस. किंग कोहलीला वाढदिवसाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा! क्रिकेट या खेळाने जगाला अनेक महान खेळाडू दिले. सचिन तेंडुलकर हा त्यापैकीच एक महान खेळाडू. क्रिकेटमधील दैदिप्यमान कामगिरीने तो क्रिकेटचा देव बनला. जवळपास दोन तप त्याने क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. भारताला अनेक अविश्वसनीय विजय त्याने मिळवून दिले. २०१३ साली त्याने निवृत्ती स्वीकारली. निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी त्याने विक्रमांचे एव्हरेस्ट गाठले. तो निवृत्त झाल्यावर त्याच्या इतक्या क्षमतेचा खेळाडू पुन्हा भारताला मिळेल का ? असाच प्रश्न संपूर्ण क्रिकेट विश्वाला पडला होता. ज्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते त्या प्रश्नाचे उत्तर खुद्द सचिनकडे होते. सचिनला जेंव्हा प्रश्न विचारण्यात आले की तुझा विश्वविक्रम कोणता खेळाडू मोडेल असे तुला वाटते तेंव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले ‘विराट कोहली’ सर्वांना त्यावेळी ही अतिशोक्ती वाटली पण सचिनने विराटची गुणवत्ता हेरली होती. निवृत्त होण्यापूर्वी चार पाच वर्ष तो आणि विराट एकत्र खेळले होते त्यामुळे विराट कोणत्या क्षमतेचा खेळाडू आहे आणि तो काय करू शकतो हे सचिनला माहीत होते त्यामुळेच सचिनने आपला वारसदार म्हणून विराटची निवड केली होती. विराटने सचिनचे म्हणणे अवघ्या दहा वर्षात खरे करून दाखवले आणि सचिनचा विश्वास सार्थ ठरविला. आज विराट देखील सचिन प्रमाणे विक्रमांचे इमले चढत आहेत इतकेच नाही तर सचिनचे अनेक विक्रम त्याच्या दृष्टिक्षेपात आले आहेत. सचिनच्या एकदिवसीय शतकांचा विक्रम त्याने नुकताच मोडला असून त्याच्या नावावर आता ५० एकदिवसीय शतक आहेत. त्याने त्याच्या कारकीर्दीत एकूण ८० शतक झळकावले आहेत. एकदिवसीय क्रिकेट प्रमाणेच विराट सचिनच्या एकूण १०० शतकांचा विक्रमही लवकरच आपल्या नावे करेल यात शंका नाही कारण आज त्याच्या नावे ८० शतके आहेत. कसोटीत त्याने २९ शतके झळकावली आहेत तर एकदिवसीय सामन्यात ५० शतके त्याच्या नावावर आहेत. टी २० सामन्यातही त्याचे एक शतक आहे. आज तो ३६ वर्षाचा होत आहे. त्याचा फिटनेस जबरदस्त आहे. वीस वर्षाचा खेळाडू देखील त्याच्यासमोर फिका पडेल असा त्याचा फिटनेस आहे त्यामुळे तो आणखी तीन -चार – वर्ष सहज खेळू शकतो. त्यामुळे तो हा विक्रम सहज मोडेल. विशेष म्हणजे त्याच्या जवळपास जगातील दुसरा कोणताच खेळाडू नाही. विराट केवळ विक्रमवीर नाही तर तो आज जगातला महान फलंदाज बनला आहे. उत्तम खेळाडू ते महान खेळाडू बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अचंबित करणारा आहे. अवघ्या दहा बारा वर्षात तो आज जगातला महान खेळाडू बनला आहे. त्याने धावांची टांकसाळ उभारली आहे. प्रत्येक सामन्यात तो खोऱ्याने धावा काढत आहे. त्याची बॅट म्हणजे जणू धावांची मशिन, त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत आहे म्हणूनच आकाश चोप्रा त्याला विराट द रन मशिन कोहली असे म्हणतो. त्याने काढलेल्या शतकांपैकी ९५ टक्के शतके भारताच्या विजयास कारणीभूत ठरली आहेत यावरून त्याच्या शतकांचे मोल लक्षात येते. धावांचा पाठलाग करताना तर त्याने सर्वाधिक शतके झळकावली आहेत म्हणूनच त्याला चेस मास्टर असेही म्हंटले जाते. विराटने शतक झळकावले म्हणजे भारत विजयी झाला असेच समीकरण बनले आहे. केवळ शतकच नव्हे तर त्याच्या अनेक छोट्या मोठ्या खेळी भारताला विजय मिळवून देणाऱ्या ठरल्या. भारताला अनेक अविश्वसनीय विजय त्याने मिळवून दिले आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा सामना आठवा. आपण तो सामना केवळ विराटमुळे जिंकू शकलो. हातातून गेलेला सामना त्याने ज्याप्रकारे खेचून आणला ते पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. तशी खेळी फक्त आणि फक्त विराटच खेळू शकतो. मागील वर्षी भारताने जिंकलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ७० धावा काढून भारताला विश्व विजयी केले होते. या दोन खेळी फक्त एक उदाहरण आहे. तशा प्रकारच्या अनेक खेळी करून त्याने भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. कठीण समय येता विराट कामी येई…. असे उगीच क्रिकेटप्रेमी म्हणत नाहीत. टी २० विश्वचषकात भारताला विजय मिळवून देऊन त्याने क्रिकेट प्रेमिंचे एक स्वप्न पूर्ण केले आहे आता यावर्षी होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ( WTC ) आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने भारताला अजिंक्यपद मिळवून द्यावे अशी क्रिकेटप्रेमींची त्याच्याकडून अपेक्षा आहे. सध्या तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीये मात्र तो असा खेळाडू आहे जो कधीही फॉर्मात येऊ शकतो. तो लवकरच त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतेल आणि भारताला कसोटी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून देईल यात शंका नाही. विराटला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy birthday king Kohli!!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here