गडचिरोली, ता. ३० : प्रकाश पर्व दीपावलीच्या पहिल्या दिवसाची अर्थात वसुबारसेची सांज गडचिरोली शहरात सुमधुर सुरांचा नजराणा घेऊनअवतरली. अजब-गजब विचार मंचाची मागील ११ वर्षांची परंपरा असलेल्या या दीपावली सांध्य मैफलीत सप्तसुरांचे लख्ख चांदणेच अवतरले. या सूरचांदण्यात नाहताना गडचिरोलीकर रसिकांनी या सूरमयी मैफलीला भरभरून प्रतिसाद दिला.
आपल्या विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या अजब-गजब विचार मंचाच्या वतीने यंदाही दीपावलीनिमित्त सप्तसुरांची मेजवानी देण्यात आली. एक संध्याकाळी व एक पहाटे अशा दोन स्वरमैफलींची मेजवानी यंदाही रसिकांना मिळाली. सप्तसुरांचा हा डबल धमाका अवघी गडचिरोली नगरीच सूरमयी करणारा ठरला. यंदाच्या संगीत महोत्सव – २०२४अंतर्गत पहिल्या सांध्य मैफलीत ६०, ७०, ८० च्या द शकातील अवीट गोडीच्या हिंदी गीतांचा नजराणा पेश करण्यात आला. तसेच मराठी भागगीत, धुंद अशी युगल गीतेही सादर करण्यात आली. स्थानिक विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित या मैफलीचा प्रारंभ प्रथम तुला वंदितो या सुमधुर गणेशगीताने झाला. त्यानंतर बाजे मुरलीया, जानेमन जानेमन तेरे दो नयन, पिया रे पिया रे थारे बिना लागे नाही म्हारा जिया रे, मै रमता जोगी, गुलाबी आॅंखे जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया, ऐ मेरी जोहरा जबी तू अभी तक है हसी, दिवाना हुआ बादल सावन की घटा छायी, ऐसी दिवानगी देखी नही कही, ही गुलाबी हवा वेड लावी जिवा, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छिपा रहे हो, और इस दिल में क्या रखा है, अश्विनी ये ना प्रिय जगू कसा तुझ्याविना मी राणी ग, ये राते ये मोसम ये नदी का किनारा, दमा दम मस्त कलंदर, नीले नीले अंबर पे चाॅंद जब आये, लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, अशी विविध सुमधुर गितांनी गायक, वादकांनी मैफलीवर सुरांचे स्वप्नील गारूड निर्माण केले. या मैफलीत संगीत क्षेत्रात प्रसिद्ध इंडियन आयडाॅल कार्यक्रमाचा प्रथम विजेता सागर म्हात्रे, अंकिता टकले, सारेगमप फेम गीता पुराणिक, सूर नवा ध्यास नवा या संगीत कार्यक्रमात गाजलेला प्रणय पवार यांनी सुरचांदण्यांची मुक्त उधळण केली. या मैफलीला प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य डाॅ. वंदना मुनघाटे, सौरभ मुनघाटे, शमशेर खान पठाण, प्राचार्य लीना हकीम, डाॅ. मिलिंद नरोटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, अरविंद कात्रटवार, संतोष तंगडपल्लीवार, राजू बोमनवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.या मैफलीसाठी अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, सतीश विधाते, नंदकिशोर काथवटे, विश्राम होकम, सुभाष धंदरे, मिलिंद उमरे, सूरज खोब्रागडे, प्रवीण खडसे, दत्तू सूत्रपवार, डॉ. प्रशांत चलाख, तन्मय त्रिनगरीवार प्रतीक बारशिंगे, तौफिक सय्यद तसेच विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बालगोपालही थिरकले…
मै निकला गड्डी लेके हे सनी देओल अभिनित गदर चित्रपटातील अतिशय गाजलेले गीत सादर करताना गायकांनी प्रेक्षकांमधील चिमुकल्यांनाही मंचावर नाचायला आमंत्रित केले. मग गायकांच्या सुरांच्या साथीने या बालगोपालांनीही गदर चित्रपटातील ठसकेबाज गितावर ठेका धरला. सर्वांनीच नृत्यमग्न बालगोपालांचे कौतुक केले.