कृष्णकुमार निकोडे, (विशेष प्रतिनिधी, मो. 94237 14883)
गडचिरोली:( 29 ऑक्टोबर )- स्थानिक शहरातील पाॅवर हाऊसच्या कंपाऊण्ड वाॅलच्या मागील भागाला लागून सीमेंट-काॅन्क्रेटचा वीस फुटाचा रस्ता आहे. पाॅवर हाऊसच्या आवारातील झाडेझुडपे, वेलींनी रस्त्यावरील विद्युतखांब, तारा व पथदिवे यांना वेढले आहे, अक्षरशः ते सर्व बोकाळले आहेत. सदर रस्ता रामनगर वाॅर्ड क्र.20, येथील एकताचौक जवळील आहे. स्थानिक रहिवाश्यांनी पुढील धोका ओळखून वीज वितरण व नगर परिषदेच्या कार्यालयांना दोन-दोनदा लेखी विनंती अर्ज सादर केले, मात्र परस्परांनी एकमेकांकडे बोटे दाखवत आपले काम नसल्याचे सांगून अर्जांना केराची टोपली दाखविली. दोन्हीकडून याकडे दुर्लक्षच केले जात आहे. दिवाळीच्या अगदी तोंडावर तरी साफ-सफाई होऊन रस्त्यावर उजेड पडेल, अशी अपेक्षा याद्वारे केली जात आहे.
या परिसरात वहाबखाॅ पठाण, टेकाम पोलिस, शब्बीर बारी, अनवर खान, दुर्वांकुर निकोडे, कृष्णकुमार निकोडे, रफिक शेख, शरीफ शेख, ईस्माइल शेख आणि जुनेद शेख आदींचे कुटुंब वास्तव्यास आहेत. रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्याने रात्री अपरात्री कामानिमित्तही हिंडण्या-फिरण्यास फार भीती वाटत असते. लहान मुलेबाळे खेळताना पाने तोडणे, वेल ओढणे, झोपाळा झुलणे आदी बालसुलभ कृती करू लागल्यास त्यांच्या जीवाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता वाटते. प्रसंगी जीवित हानी झाली, तर याला जबाबदार कोण? असा प्रतिप्रश्नही यातून केला जात आहे.