Home महाराष्ट्र पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमात जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम संपन्न

पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमात जॉय ऑफ गिव्हिंगचा दिवाळी भेट उपक्रम संपन्न

91

 

मुंबई – परिसरात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी पनवेल जवळील वनवासी कल्याण आश्रमाच्या वस्तीगृहातील निराधार आदिवासी मुलांसाठी दिवाळी भेट उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जॉय संस्थेचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील, हॅप्पी रायडर गजानन पाटील, सभासद भूषण मुळ्ये, मीना भूतकर, डॉ सुभाष घोलप, डॉ बालाजी सुकणे, डॉ राहुल होगाडे, मंगेश देवकर तसेच नेरुळ युथ कौंसिलचे सुभाष हांडे देशमुख, रमेश सुर्वे, अशोकराव महाजन, दत्ताराम आंब्रे, रवींद्र कांबळे इत्यादी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. वसतीगृहाचे केंद्र प्रमुख संदीप शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वनवासी कल्याण संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले. जॉय संस्था विविध भागात विविध घटकांसाठी करत असलेल्या कार्याची माहिती देत त्यांनी संस्थेच्या सदर उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानले. जॉय चे अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या मार्गदर्शन व अथक प्रयत्नाने जॉयची वाटचाल अनेक सदस्य जोडणारी व त्या माध्यमातून हजारो गरजूंपर्यंत पोहोचणारी ठरत आहे असे विषद करत त्यांनी उपस्थित सर्व सभासदांचा अल्पपरिचय करून दिला. भविष्यातील शिक्षण अनेक आव्हानांचा सामना करायला लावणारे असून आपले करिअर सुकर करण्यासाठी मुलांनी अभ्यासात झोकून द्यावे व स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर आपल्याला कठीण परिस्थितीत शिक्षण देणाऱ्या वनवासी आश्रम वस्तीगृहाच्या वाटचालीस हातभार लावावा असे आवाहन पाटील यांनी उपस्थित मुलांना केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा तसेच केंद्रप्रमुखांचा यावेळी वाचनीय पुस्तक तसेच दिवाळी फराळ भेट देऊन जॉयच्या वतीने सन्मान करण्यात आला. युथ कौंसिलचे सुभाष हांडे देशमुख यांनी आपल्या मनोगतात जॉयच्या कार्याचे कौतुक करत असेच कार्य पुढे अधिक जोमाने सुरू ठेवून जास्तीत जास्त गरजू लोकांच्या कामी येण्याचा सल्ला देत सदस्यांचा हुरूप वाढवला. पनवेल वनवासी आश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मुलांना सर्वतोपरी मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या देशमुख यांनी यावेळी मुलांना अनेक महत्वपूर्ण टिप्स दिल्या. जॉयच्या उपक्रमात नेरुळ युथ कौंसिलला सहभागी होण्याची संधी म्हणजे दुग्धशर्करा योग असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात ह्या दोन संस्था अधिकाधिक गरजूंच्या कमी येतील अशी आशा व्यक्त करत त्यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहीती दिली. यावेळी डॉ सुभाष घोलप, डॉ बालाजी सुकणे यांनीदेखील आपल्या मनोगतातुन अशा स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने खूप समाधान व आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी मुलांना दिवाळी फराळ, जीवनावश्यक वस्तूंचे किट, पेन, बिस्कीट, चोकोलेट्स, केक इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ सुकणे यांनी शासनाच्या १०८ रुग्णवाहिका हया महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत माहिती देत ह्या रुग्णवाहिकेचे कार्य कसे चालते याचे प्रत्यक्ष रुग्णवाहीकेद्वारे सादरीकरण केले. वसतिगृहातील मुलांनीदेखील यावेळी गीते, कविता उपस्थितांसमोर सादर केल्या. पनवेलजवळील निसर्गरम्य अशा चिंचवली गावाच्या हद्दीत वनवासी कल्याण आश्रमाचे गरीब, गरजू, अनाथ मुलांसाठी वस्तीगृह गेल्या जवळपास ४० वर्षांपासून चालवण्यात येत आहे ज्यात जवळपासच्या तीन चार तालुक्यातील मुले ज्यांना कुठलाही कौटुंबिक, पालकत्वाचा आधार नाही असे मुलांचे संगोपन, शिक्षण, संस्कार व कौशल्य विकास करण्याचा स्तुत्य उपक्रम अविरतपणे सुरू आहे. खरेतर सध्याच्या स्वार्थी व मतलबी जगात कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या अशा संस्थांचे कौतुकच व्हायला हवे असे मत सर्वच मान्यवरांनी मांडले. जॉय ऑफ गिव्हिंग संस्थेमार्फत गरीब, गरजूंसाठी सातत्याने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम मुंबई, ठाणे व पालघर परिसरात सुरू आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून दिवाळीच्या अगोदर फराळ व दिवाळीसाठी उपयुक्त किराणा सामान वाटपाद्वारे वस्तीगृहातील मुलांची दिवाळी गोड करण्याचा आदर्शवत उपक्रम जॉय संस्थेचे सभासद वर्गणीद्वारे राबवत आहेत यासाठी सर्व स्तरांतून जॉय संस्थेचे कौतुक होत आहे. तसेच जॉयचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी जॉयच्या सदस्यांनी जमा केलेली मात्र त्यांनी नाकारलेली आर्थिक मदत या उपक्रमासाठी देत सामाजीक कार्यात एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. ह्या आश्रमाचे संपूर्ण कार्य समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था व आश्रमातील माजी विद्यार्थ्यांच्या देणगीवरच चालत असल्याने यासाठी अधिकाधिक घटकांनी सढळ योगदान देण्याची आवश्यकता आहे तसेच समाजात वाढत चाललेली गरीब श्रीमंत दरी कमी करण्याचे व असंख्य गरीब, गरजू, निराधार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रत्यक्षात काम वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्थांमार्फत करण्यात येत असल्याने त्यांना समाजातून यथाशक्ति सर्वतोपरी पाठबळ मिळण्याची गरज आहे असे मत यावेळी जॉयचे समन्वयक वैभव पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here