Home यवतमाळ उमरखेडमध्ये भरदिवसा उच्चभ्रू वसाहतीत धाडसी चोरी (नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्याचे घर...

उमरखेडमध्ये भरदिवसा उच्चभ्रू वसाहतीत धाडसी चोरी (नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्याचे घर फोडले ; लाखोंचा मुद्देमाल चोरी; पोलिसांपुढे चोरटे पकडण्याचे आव्हान)

199

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड:- (दिनांक ४ ऑक्टोंबर) तब्बल तीन आजी, माजी आमदारांच्या उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रख्यात असलेल्या नाथनगरातील एका घरामध्ये चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी केली. घराची रेकी करून या चोरट्यांनी आज गुरुवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी आलमारी तोडून त्यातील लाखोंचा मुद्देमाल चोरी केला.

नवरात्रीच्या घटस्थापनेची धामधूम असतानाच शुभमुहूर्तावर चोरट्यांनीही धाडसी चोरी केल्याने आता पोलिसांपुढे चोरटे पकडण्याचे जबर आव्हान उभे झाले.

श्रीकांत जनार्दन मामिडवार रा. नाथनगर असे शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे नाव आहे. चोरट्यांनी आज घटस्थापनेच्या दिवशी भरदिवसा त्यांचे घर फोडून पोलिसांनाच आव्हान दिले आहे. त्यांच्या घरावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी घरात कुणी नसताना संधी साधून घराच्या मुख्य दारातून प्रवेश न करता, बाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या दिशेकडून आत प्रवेश केला. आरी-पत्याच्या साहाय्याने दरवाजाची कडी कापली. घरात शिरून चोरट्यांनी बेडमधील लोखंडी अलमारी तोडून त्यातून लाखो रुपयांच्या रोख रकमेसह काही इतर मुद्देमाल चोरून नेला. त्यांनतर चोरटे दुसऱ्या बेडरूममध्ये शिरले. तेथून सोन्या-चांदीच्या दागिने ठेवलेली अलमारी फोडली. त्यातील लाखोंचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. भरदिवसा धाडसी चोरी करून या चोरट्यांनी पोबारा केला.

विशेष म्हणजे या उच्चभू वसाहतीमध्ये शहरातील दोन माजी तसेच वर्तमान असे तीन आजी-माजी आमदार राहतात. भाजपाचे जिल्हा समन्वयक, अनेक राजकीय पदाधिकारी, अधिकारी व व्यापारी अशी उच्चभू व्यक्ती राहत असलेल्या वस्तीमध्ये, भरदिवसा चोरी करून चोरट्यांनी, पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे.

घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी चोरांनी गुन्ह्याचा घट बसवून, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे चर्चिले जात आहे. वृत्त लिहिपर्यंत पोलीस तपास सुरू होता, कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.

चौकट:- ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण उच्चभ्रू वसाहतीत भर दिवसा घडलेल्या चोरीच्या प्रकाराने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार संजय सोळंके, एपीआय कैलास भगत यांच्यासह एलसीबी व पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला होता.

चोरीचा प्रकार उघड करण्यासाठी तांत्रिक मदत म्हणून ठसे तज्ज्ञ व श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here