_भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम ८ ऑक्टोबरपर्यंत साजरा होत राहणार आहे. तर विश्व प्राणी दिवस दरवर्षी ४ ऑक्टोबर साजरा केला जातो. त्याचे ध्येय प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार थांबवणे, त्यांचे कल्याण व हक्क याबद्दल लोकांना जागरूक करणे, हे आहे. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर ज्ञानवर्धक व मार्गदर्शक लेख… संपादक._
वर्ल्ड एनिमल डे- जागतिक प्राणी दिवस दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, त्याचे ध्येय प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार थांबवणे आणि प्राण्यांचे कल्याण आणि हक्क याबद्दल लोकांना जागरुक करणे आहे. सन २०२३साली जागतिक प्राणी दिन बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी महान किंवा लहान, सर्वांवर प्रेम करा या थीमसह साजरा करण्यात येत आहे. हा एक दिवस आहे ज्यामध्ये जगभरातील देश प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि हक्कांसाठी काम करतात. प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार रोखण्यासाठी आणि प्राण्यांच्या कल्याणाची व अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी ४ ऑक्टोबरला जागतिक प्राणी कल्याण दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.
जागतिक प्राणी दिन प्रथम ४ ऑक्टोबर १९२९ रोजी साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात जर्मन लेखक आणि प्रकाशक हेनरिक झिमरमन यांनी प्राणी कल्याणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी केली. दि.२४ मार्च १९२५रोजी जागतिक प्राणी दिनाचे आयोजन हेनरिक झिमरमन (१८८७-१९४२) नावाच्या जर्मनने केले होते. ते केवळ लेखकच नव्हते, तर त्यांनी मेन्श अंड हुंड- माणूस आणि कुत्रा नावाचे द्वैमासिक देखील प्रकाशित केले, या मासिकाचा उपयोग प्राणी कल्याणाविषयीच्या त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी एक माध्यम म्हणून केला आणि जागतिक प्राणी दिन समितीची स्थापना करण्यासाठी त्याचा वापर केला. दि.२४ मार्च १९२५ रोजी त्यांच्या समितीने जागतिक प्राणी कल्याण दिनाचे आयोजन केले होते, त्यांनी बर्लिन, जर्मनी येथील स्पोर्ट्स पॅलेस येथे त्यावेळच्या प्राणी कल्याणाच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याचे आयोजन केले होते. या पहिल्या कार्यक्रमात सुमारे पाच हजार लोक उपस्थित होते आणि हा कार्यक्रम असिसीच्या सेंट फ्रान्सिसच्या मेजवानीच्या दिवसाशी संरेखित होता, जो की ४ऑक्टोबर होता. शेवटी ४ ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव मे १९३१मध्ये फ्लोरेन्स इटलीतील आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण काँग्रेसने स्वीकारला. त्यानंतर आज जगभरात प्राण्यांच्या कल्याणासाठी जागतिक प्राणी दिन साजरा केला जातो.
या दिवसाच्या समर्थनार्थ म्हणून समजा ना, राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह भारतभर दरवर्षी दि.२ ते ८ ऑक्टोबर दरम्यान भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. दि.२ ते ८ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह- नॅशनल वाइल्डलाईफ वीक साजरा केला जातो. यंदा सन २०२३मध्ये आपण ६९वा वन्यजीव सप्ताह साजरा करत आहोत. वन्यजीव सप्ताहाचा इतिहास- भारतीय वन्यजीव मंडळाची स्थापना करण्यात आली आणि भारताच्या वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सन १९५२मध्ये वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडण्यात आली. सुरुवातीला वन्यजीव दिन सन १९५५मध्ये साजरा करण्यात आला, जो नंतर सन १९५७मध्ये वन्यजीव सप्ताह म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आला. पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही आणि येतो तेव्हा दोन्ही बाजूंना फारसा आनंददायक नसतो ! ही परस्थिती बदलण्याचे प्रयत्न या सप्ताहाच्या निमित्ताने होत आहेत.
मूळ संकल्पना व सुरुवात- भारतात १९५२ वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. आता या मूळ हेतूचा काळानुसार विस्तार झाला आहे. वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहेत. खरे तर कोणताही वन्यजीव स्वत:हून माणसांवर हल्ला करत नाही. परंतु त्यांच्या राहण्याच्या क्षेत्रावर- अधिवासावर शेती, रस्ते वा बांधकामाच्या रूपाने होणारे मानवी आक्रमण मर्यादेपलीकडे गेले की ते जंगलाच्या सीमेवरील खेड्यांत घुसून मुख्यत: पोटासाठी गाई गुरे मारतात व त्यातून मानव- वन्यजीव असा संघर्ष उद्भवतो. भारतासहित जगातील इतरही पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही. ही जागृती रुजवण्यासाठी भारत सरकारने इंडियन बोर्ड ऑफ वाईल्डलाईफची स्थापना पूर्वीच केली आहे. जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा; ज्यामुळे त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतील. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमी विरोध दर्शवावा.
वन्यजीव सप्ताहानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रमांना सोमवारपासून सुरवात झाली आहे. रत्नागिरीतील वन्यजीव प्रेमींसाठी लेन्स आर्ट व सह्याद्री संकल्प सोसायटीने एक अनोखा उपक्रम राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित करत आहे. या उपक्रमातून निसर्ग सोबती या नेचर क्लबची स्थापना व लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. उपक्रमात वन्यजीव व जैवविविधतेचे संवर्धन या विषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन २ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वा. गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झाले. याच दिवशी जिल्ह्यातील जैवविविधता, विविध प्रजाती, त्यांचे अधिवास व संवर्धन याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सृष्टीसंवर्धन फाउंडेशनचे विशाल भावे व सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे व निसर्ग मित्रमंडळ संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरीत अशा स्वरूपाचा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, दऱ्याखोऱ्यात काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन तयार झालेला हा पहिलावहिला उपक्रम असल्याचे निसर्ग सोबतीच्या प्रमुख निखिता शिंदे यांनी सांगितले. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून ६-८ ऑक्टोबरला रत्नागिरीतील जैवविविधता आणि वन्यजीव या विषयावर लेन्स आर्टतर्फे निवडक २५० फोटोंचे प्रदर्शन पटवर्धन हायस्कूल येथे भरवण्यात आले. या कालावधीत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेचर ट्रेलचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि सर्व निसर्गप्रेमी घेत आहेत. कोटनिसर्ग सोबती क्लबच्या उपक्रमात पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरे आणि कीटक अशा वन्यजीवांचे चार विभाग दर्शविले आहेत. नानाविध प्रजातींची ओळख, त्यांचे राहणीमान, त्यांना आवश्यक व पोषक असे विशिष्ट वातावरण आणि त्यांचे संवर्धन याची माहिती तरुण पिढीला निश्चितच होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे, ती आज अत्यावश्यकच!
!! भारतीय वन्यजीव सप्ताहाच्या समस्त बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
– एक प्राणीप्रेमी –
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर, गडचिरोली.
फक्त भ्रमणध्वनी- 7775041086.