नागभीड:
१४ मार्च २०२४ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत झाडीबोली साहित्य व झाडीच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी स्वतंत्र दालन सुरु करण्या बाबत अधिसभा सदस्य सौ. किरण संजय गजपुरे यांनी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव हा सर्वांनुमते मंजूर करण्यात आलेला असून कुलगुरू डॅा. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात या दालनासाठी सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे..!!
‘झाडीपट्टी’ म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्व-विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांचा प्रदेश. पूर्वी विदर्भ म्हणजे वऱ्हाड आणि वऱ्हाड म्हणजे वऱ्हाडी असे समीकरण होते. पण वऱ्हाडी ही काही संपूर्ण विदर्भाची भाषा नव्हे. वर्धा ते बुलढाणा हे वऱ्हाडीचे क्षेत्र. नव्वदीच्या दशकात डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोलीचे रणशिंग फुंकले. झाडीपट्टीची भाषा झाडीबोली. ही झाडीबोली, वऱ्हाडी आणि नागपुरी बोलीपेक्षा पूर्ण वेगळी आहे, यावर बोरकरानी पुस्तके लिहिली. एवढेच नव्हे तर झाडीबोली साहित्याची चळवळच उभारली. तर नागभीडचे साहित्यीक प्रा. राजन जयस्वाल यांनी चारोळी च्या माध्यमातुन झाडीबोली ला पुन्हा रसिकांच्या ओठावर आणले . नवरगावचे प्राचार्य सदानंद बोरकर यांनी नाटकांच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात झाडीबोली नाटक प्रसिध्द केले. गेल्या चार दशकांपासून झाडीपट्टीत अनेक लेखक झाडीबोलीत विविध प्रकारात साहित्य निर्मिती करीत आहेत. त्यावर संशोधन करीत आहेत. झाडीबोली साहित्याचे स्वतंत्र साहित्य संमेलने होत आहेत…!!
अजुनही राजाश्रय नसलेल्या अश्या या झाडीबोली साहित्याचे जतन होण्यासाठी व संस्कृती जपण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करून विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांसाठी याची माहिती करण्यात यावी, तसेच विद्यार्थी व येणाऱ्या पुढील पिढीच्या अभ्यासक्रमासाठी हा झाडीबोली साहित्याचा व संस्कृतीचा ठेवा स्वतंत्रपणे जतन करण्यासाठी विद्यापीठ परिसरात स्वतंत्र दालन सुरु करावे असा प्रस्ताव गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी अधिसभा बैठकीत मांडला होता व त्याला सर्वानुमते मान्यताही देण्यात आली. आगामी काळात तयार होणाऱ्या विद्यापीठाच्या नवीन परिसरात या दालनाच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न करण्याबाबत सभाध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी त्यावेळी सभागृहाला आश्वस्त केले.. झाडीबोली भाषा व संस्कृती ही अतिशय महत्वाची असून त्याची योग्य दखल घेत कुलगुरू महोदय यांनी या झाडीबोली दालनासाठी नुकतीच सल्लागार समिती गठीत केली असून लवकरच या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत झाडीबोली साहित्य, भाषा, व संस्कृतीच्या जतनासाठी धोरण आखले जाणार आहे..
या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॅा. श्रीराम कावळे यांची निवड करण्यात आली आहे.. समितीच्या सदस्य पदी गुरूदास कामडी व्यवस्थापण समिती सदस्य, सौ.किरण गजपुरे प्रस्तावक तथा अधिसभा सदस्य, सदानंद बोरकर नाट्यलेखक, डॉ.नरेश मडावी सहा.प्राध्यापक गोंडवाना विद्यापीठ, डॉ.सुजाता मडावी बालविकास अधिकारी गोंदिया, प्रा, डॉ.राजन जयस्वाल ज्येष्ठ साहित्यिक, प्रा.धनराज खानोरकर प्रसिद्ध कवी, डॉ. श्रीकांत नाकाडे झाडीबोली कलावंत अर्जुनी मोरगाव, झाडीबोली साहित्य मंडळच्या महिला अध्यक्षा प्रा. सौ. रत्नमाला बोरकर यांची निवड करण्यात आली असुन समितीचे सचिव म्हणून डॉ. हेमराज नाकाडे सहा. प्राध्यापक गोंडवाना विद्यापीठ यांची निवड करण्यात आली आहे..!!
आधुनिक युगात कॉन्व्हेंट संस्कृतीने आपला पाय घट्ट रोवला असून विद्यार्थी अगदी बालपणा पासून इंग्रजीतून शिक्षण घेत असल्याने मराठी भाषेसोबतच अनेक बोली भाषा सुद्धा बोलणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. अश्या वेळी गोंडवाना विद्यापिठाच्या सिनेट सदस्य सौ.किरण संजय गजपूरे यांनी गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या चारही जिल्ह्याची संस्कृती असलेल्या झाडीबोली संस्कृतीच्या जतना साठी स्वतंत्र दालनाची मागणी केली व तो प्रस्ताव मंजूर करून विद्यापिठात दालन सुरु केले यासाठी चारही जिह्यातून झाडी साहित्यावर प्रेम करणारे रसिक, लेखक, नाट्य निर्माते, कलावंत व विद्यार्थी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..!!!