प्रविण बागडे, नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना बाबासाहेब आंबेडकरांचा उजवा हात म्हटले जात असे. ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक वारसदार होते. राजाभाऊ खोब्रागडे खंबीरपणे बाबासाहेबांच्या विचारांच्या सोबत असायचे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर चळवळ व राजकारणाच्या सर्व क्षेत्रात बॅरिस्टर साहेबांचे योगदान लक्षणीय होते ! श्रीमंत घराण्यात जन्म घेऊनही बहिस्कृत अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी व कल्याणासाठी त्यांनी स्वतःचे सर्व आयुष्य अर्पित केले.
बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाइसरॉय कौन्सिलमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी एक योजना मांडली होती. या संदर्भात चंद्रपूरचे धनाढय देवाजीबापू आणि इंदिराबाई या आंबेडकरी बाण्याच्या पोटी भाऊराव (राजाभाऊ) यांचा 25 सप्टेंबर 1925 रोजी जन्म झाला. देवाजीबापू हे 1945 ला राजाभाऊ यांना घेऊन बाबासाहेबांना भेटले. त्यांना बाबासाहेब म्हणाले, “मी परदेशी शिष्यवृत्तीने 15 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवित आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या मुलाला (राजाभाऊला) परदेशी पाठविले, तर मी त्याऐवजी एक गरीब मुलाला आणखी पाठवू शकतो.” बाबासाहेबांचे हे म्हणणे देवाजीबापू यांनी मान्य केले. त्यानंतर देवाजीबापूंनी स्वखर्चाने राजाभाऊ यांना बॅरिस्टर ही पदवी घेण्यासाठी लंडनला पाठविले.
राजाभाऊंच्या घरचे वातावरण हे राजघराण्यासारखे होते व राजाभाऊ हे नावाप्रमाणेच राजा होते. ते अत्यंत दयाळू, उदार दानी, कर्तव्यदक्ष व न्यायी होते. बॅरि. राजाभाऊंनी चंद्रपुरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय सुरु केला. बाबासाहेब आंबेडकरांशी झालेल्या भेटीत देवाजीबापूंनी राजाभाऊला समाजाच्या सेवेसाठी अर्पण करावे अशी इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केली. त्यामुळे बाबासाहेबांचा हा आदेश स्वीकारून राजाभाऊंना समाजसेवेकरिता देवाजीबापूंनी समर्पित केले व राजाभाऊंनी दलितांच्या उत्थानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वप्रणाली नुसार स्वतःला वाहून घेतले.
बॅरि. राजाभाऊ यांच्या संघटन चातुर्य, दलितनिष्ठा, कर्तृत्व व चळवळीप्रती इमानदारी याची ओळख बाबासाहेबांना झाली. बाबासाहेबांनी बॅरिस्टर मधील नेतृत्व क्षमता ओळखली. डॉ. बाबासाहेबांनी 1955 मध्ये बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांना अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या ‘महासचिव’ पदी नियुक्ती केली. नवीन उमेदीच्या तरुणांना नेतृत्व देणे व पुढे करणे ही काळाची गरज आहे, हे त्यावेळी बाबासाहेबांनी हेरले होते. 1 जानेवारी 1957 ला अहमदनगर येथे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक झाली. यात सर्वानुमते बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व राजकीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यासाठी ‘प्रेसिडियम’ स्थापन करण्यात आले, याचे अध्यक्ष म्हणून राजाभाऊ खोब्रागडे यांची निवड करण्यात आली.
1957 च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समिती व शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन यांनी एकत्रित निवडणूक लढवली. राजाभाऊ खोब्रागडे व दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा झंझावात निर्माण झाला. निकालानंतर शे.का. फे. ला भरघोस यश मिळाले. यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेडरेशनचे 17 आमदार निवडून आले. पंजाब मधून 5, कर्नाटक मधून 2, आंध्रमधून 1, गुजरात मधून 2 व मद्रास मधून 2 असे एकूण 29 आमदार निवडून आले. हे सर्व यश बॅरि. राजाभाऊ अध्यक्ष असतांना घडून आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची संघटना, त्याकाळी भारतातील इतर कोणत्याही पक्षाच्या संघटनेपेक्षा अधिक सरस, अधिक सकस, अधिक सक्षम व समर्थ होती. या पक्षाचे अनुयायी, इतर कोणत्याही पक्षाच्या अनुयायांपेक्षा अधिक निष्ठावान व अधिक त्यागशील होते. बॅरिस्टर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते निर्णय घेऊन 3 ऑक्टोबर 1957 ला नागपूरमध्ये 7 लक्ष लोकांच्या उपस्थितीत ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ ची स्थापना करण्यात आली. एन. शिवराज यांना आर.पी.आय. चे प्रथम अध्यक्ष करण्यात आले होते.
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हे 1958 ते 1964, 1966 ते 1972 व 1978 ते 1984 या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. यात डिसेंबर 1969 ते 1972 मध्ये बॅरिस्टर हे राज्यसभेचे उपसभापती पण होते. रिपाई ला राज्यसभेत उपसभापती चा बहुमान मिळाला. बौद्धांच्या सवलती, मागासवर्गीयांना बढतीत राखीव जागा, लक्ष्मी बँक प्रकरण, काश्मिरचे विलीनीकरण, अन्नधान्य धोरण, निवडणूक योजना, भाषावार प्रांतरचना, जमीनधारणा कमाल मर्यादा, पंचवार्षिक योजना, शिक्षणासाठी आर्थिक तरतूद, अनुसूचित जाती-जमाती अहवाल, राष्ट्रीय एकात्मता इत्यादी विषयावर बॅरि. राजाभाऊ यांनी संशोधनात्मक अभ्यासपूर्ण आणि वकृत्वशैलीयुक्त अशी भाषणे राज्यसभेत देऊन आपल्या वैचारिकतेचा परिचय घडविलेला होता. आंबेडकरी तत्वप्रणालीनुसार करण्यात आलेली तर्कनिष्ठ, कालसंगत आणि कल्याणकारी असे विश्लेषण आहे. अशा अनेक शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयीसारखे मातब्बर पुढारी त्यांच्या नेतृत्वात सदस्य होते. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील उपसभापती पद विरोधी पक्षाला द्यायची प्रथा आता रूढ झालेली आहे. राज्यसभेत ही प्रथा बॅरिस्टरांच्या निवडीपासून सुरू झाली. त्याकाळी सर्वश्री. भूपेश गुप्ता, राजनारायण, नानासाहेब गोरे, निरेन घोष, चॅटर्जी यासारखे रथी-महारथी सदस्य होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्ही.व्ही. गिरी यांच्यानंतर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनीच राज्यसभा कुशलतेनी हाताळली असं जाणकाराचं मत आहे. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 1959 आणि 1963 ला भूमिहिनांचा सत्याग्रह झाला. या सत्याग्रहाचा इतिहासात तोड नाही, याचे नेतृत्व हे दादासाहेब गायकवाड व बॅरि. खोब्रागडे यांनी केले होते. 1964 च्या भूमिहीन सत्याग्रहाला केवळ रिपब्लिकन चळवळीत महत्वाचे स्थान आहे. तर या सत्याग्रहाचा जागतिक स्तरावर ऐतिहासिक महत्व आहे. या मोर्चाचे नेतृत्व हे दादासाहेब गायकवाड, बुद्धप्रिय मौर्य व बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी केले होते. या आर.पी.आय. पुरस्कृत सत्याग्रहाने भारत सरकारची झोप उडाली होती. या सत्याग्रहामुळे सरकारने एकूण 37,500 लोकांना एकूण 2,50,000 एकर जमीन वाटल्या गेली.
बॅरि. राजाभाऊंनी कामगार चळवळी चालवल्या, कोतवाल संघटन, बिडी मजदूर युनियन, डेमॉक्रॅटिक इंडियन ट्रेड युनियन (डीटू) या संघटना राजाभाऊंनी उभ्या केल्या आणि त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले संघटनात्मक वैचारिक मूल्य व प्रतिष्ठा दिली. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपुरात बौद्धधम्म दीक्षा कार्यक्रम झाला त्यावेळी बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हे अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचेचे सरचिटणीस होते. बाबासाहेबांचा जीवाला धोका होऊ नये व सुरक्षितेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे एक गुप्तचर समूह नागपुरात टेहळणीसाठी नियुक्त केले. त्यानंतर देवाजीबापू खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध जनसमिती ने चंद्रपूर मध्ये अल्प अवधीत 16 ऑक्टोबर 1956 ला बौद्धधर्म दीक्षा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते संपन्न केला. चंद्रपुरात 3 लक्ष अस्पृश्यांना बौद्धधम्म दीक्षा देण्यात आली. यातील खर्चाचा सिंहाचा वाटा हा खोब्रागडे परिवाराचा होता.
1966 साली कृष्णवर्णीय नेत्यांच्या परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून इंदिरा गांधींनी आवर्जून राजाभाऊंना अमेरिकेला पाठवले होते. तिथे त्यांनी दलित आणि निग्रोंच्या प्रश्नाचा उहापोह तर केलाच पण जागतिक स्तरावर सर्व वंचितांनी एकत्र येण्याची आवश्यकता स्पष्ट केली. भूमिहीनांच्या आंदोलनासाठी ते आग्रही होते. शेतीचे राष्ट्रीयीकरण व्हावे, असे त्यांचे मत होते. खाणकामगार आणि विडी कामगारांच्या युनियनचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मुंबई आणि दिल्लीत मोर्चे काढून त्यांच्यासाठी अनेक अधिकार मिळवले. नवबौद्धांना सवलती मिळाव्यात यासाठीचे त्यांचे आंदोलनही यशस्वी झाले. नवबौद्ध विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यासाठी राज्य सरकारला त्यांनी भाग पाडले. हुंडाबळीचा कायदा व्हावा यासाठी त्यांनी संसदेत खूप प्रयत्न केले.
विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात यावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. संसदेतही त्यांनी महाराष्ट्राची बाजू जोरदार उचलून धरली. पुढे महाराष्ट्रात विदर्भावर होणाऱ्या अन्यायाने ते खूप व्यथित झाले. सत्तरच्या दशकात त्यांनी स्वतंत्र विदर्भाची आणि छोट्या राज्यांची भूमिका मांडायला सुरुवात केली. राजाभाऊंचे अष्टपैलू व्यक्तिमत्वही तसेच करारी अन् दृढनिश्चयी होते. ‘कॉग्रेसचे तुम्ही केवळ चार आण्याचे सदस्य झालात तरी तुम्हाला फार मोठे मोठे मंत्रीपद लाभेल’ अशा प्रलोभनाची अनेकदा बरसात काँगेस श्रेष्ठीकडुन होऊनही त्याला त्यांच्या स्वत्वपूरित स्वार्थीनिवेशाने कधीच भीक घातली नाही व स्वाभिमानाने तळपणारी त्यांची अस्मिताही कधी कुणाकडे गहाण राहिलेली नाही, यालाच आत्मसन्मान म्हणतात.
राज्यसभेचे उपसभापती झाल्यानंतर प्रथमत: त्यांचे चंद्रपूरला आगमन झाले असतांना त्यांच्या एका जिवलग मित्राने अभिनंदन करतांना म्हटले, ‘बॅरिस्टर साहेब, आपले तर जीवनच बदलून गेले आहे’. यावर राजभाऊ उत्तरले, ‘अहो, कसला आलाय बदल? यापूर्वीही मी महिन्याचे पंचवीस दिवस बाहेर घालवायचो, आजही घालवितो. फरक एवढाच की आधी मी आगगाडीने प्रवास करायचो तर आता विमानाने करतो’ सहज बोलता-बोलता अगदी अल्पशा शब्दात राजाभाऊ अनाहूतपणे फार मोठया अर्थाचा अविष्कार करुन गेले. या इवल्याशा शब्दातून व्यक्त झालेल्या आशयापेक्षा त्यातील अव्यक्त आशय कितीतरी महान…किती तरी गहन… राज्यसभेचे उपाध्यक्ष असले काय किंवा नसले काय, समता, स्वातं¡य आणि बंधुत्वाच्या शिलालेखातून उगम पावलेली त्यांची जीवनसरीता अभंग आणि अखंड वाहिली आहे. भगवान बुध्द, संत कबीर, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या वैचारिक परंपरेचे कर्णधार म्हणून बॅरि. खोब्रागडे भारताच्या इतिहासाच्या धवल पृष्ठांवर चिरंजीवी ठरले.
1981 मध्ये खासदार राजभाऊ यांनी राज्यसभेत बौद्धांचे धार्मिक स्थळ श्रावस्ती, कुशीनारा, बौद्धगया व नालंदा यांच्या विकासाचा आराखडा सरकारने तयार केला यासंदर्भात प्रश्न विचारला, नंतर सरकारने यावर कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या इमानदार रिपब्लिकन सेनापतीचे मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी भारतात अस्पृश्य दलित, जमाती, अदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या वर्गाच्या हितासाठी जे शैक्षणिक, आर्थिक, नौकरीविषयक, शेती व भूमिहीनांना जमीन यासंदर्भात होते. याकरिता सतत राज्यसभेत खासदार म्हणून पाठपुरावा केला. दलितांना व बौद्धांना सतत न्याय मिळावा याकरिता सतत कार्य केले. बौद्धांची लोकसंख्या वाढावी व भारत बौद्धमय व्हावा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्तीसाठी सतत बौद्धधम्म दीक्षेचे कार्यक्रम भारतभर करित राहिले. डॉ. बाबासाहेबांच्या निष्ठावान नेत्याचे दिल्लीत हृदयविकारामुळे परिनिर्वाण झाले. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या सन्मानार्थ, भारत सरकारने 11 नोव्हेंबर 2009 रोजी एक टपाल तिकीट जारी केले. रिपब्लिकन पक्षाच्या अशा थोर महापुरुषाला त्यांच्या 99 व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन !