◆ ज्ञानेश महाराव
वाचा, विचार करा! अविचाराची साठी सोडा; तुमची प्रगती नक्की होईल!
————————
*प्रबोधनकार तथा केशव सीताराम ठाकरे!* आज तुम्हाला जाऊन ५१ वर्षे (२० नोव्हेंबर १९७३) झाली. *आज तुम्ही असता, तर १३९ वर्षांचे झाला असता.* (जन्म : १७ सप्टेंबर १८८५) ही ‘जर-तर’ची बात झाली. ज्या काळात सतत असलेलं दुष्काळाचं सावट, आर्थिक कुचंबणा, जीवघेण्या साथींच्या रोगांचे फेरे यांचाच भडिमार होत होता, अशा काळातले तुम्ही! तरीही तुम्ही विचारबळाने आणि कृतिशीलतेने वयाची नव्वदी गाठलीत. वयाच्या नवव्या वर्षी ह.ना.आपटे संपादित ‘करमणूक’ ह्या मासिकातील ‘छत्रीची उत्पत्ती’ या माहितीपर टिपणातून प्रसिद्ध झालेली तुमची लेखणी अखेरपर्यंत अन्यायाचा आणि असत्याचा समाचार घेण्यासाठी तलवारीसारखी चालली. साथीला परखड वाणीचा दांडपट्टा होता. तो एक घाव आणि अनेक तुकडे करणारा होता. तुमच्याच शब्दांत सांगायचं तर, ”अडकित्त्यात सुपारी आली की ती फोडायचीच! त्यात लेखणी हाती असली, की जो कोणी समाजहिताच्या आणि माणुसकीच्या आडवा येईल, त्याला उभा सोललाच समजा!” असा तुमचा कडवा बाणा!! तर ”ज्याची लंगोटी साफ, तो कुणाला भिणार!” असा तुमच्या सत्यनिष्ठेचा टणत्कार !! आपल्या या कडव्या, प्रखर निश्चयाने तुम्ही देव-धर्माच्या नावानं सोकावलेल्या अमानवी सामाजिक रूढी-परंपरांचा समाचार घेतलात. त्यासाठी वर्ण्यवर्चस्ववादी भटी हरामखोरी उघड्यावर आणलीत. ह्या जातीनिष्ठ भटी हरामखोरीला तुम्ही ‘भिक्षुकशाहीचे बण्ड’ म्हटलंत. हे बंड ”उघड्या डोळ्यांनी पाहाणार्याला हिंदुस्थानच्या स्वराज्यप्राप्तीची मुदत सात महिन्यांवरून सात शतकांवर न्यावी लागेल. गुलामगिरी; मग ती शारीरिक असो वा मानसिक असो, ती महारोगासारखीच व्याधी आहे. या व्याधीत खितपत पडलेल्या राष्ट्रांना व समाजांना आपल्या दुष्कर्माची घाणच येत नाही. इतर अवयवांप्रमाणे त्यांची विवेकबुद्धीसुद्धा बधिर व आंधळी होते. त्यात बौद्धिक गुलामगिरी ही दृश्य नसल्यामुळे तींत बुजबुजणार्या अनेक किड्यांचा सुळसुळाट गुलामी मनोवृत्तीच्या माणसांना भासत नाही.” हे तुम्ही कणखरपणे सांगितलंत!
*अंधश्रद्धेचं हे जालीम जहर*
भटा- ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थी पोटासाठी बाळंतिणीच्या खोलीपासून ते स्मशानातील सरणापर्यंत लोकजीवनात कसे पेरलं; त्यासाठी देव-धर्माचा वापर कसा केला; ते ‘प्रबोधन’कार तुम्ही कठोर शब्दांत सविस्तर सांगितलंय. त्यासाठी तुम्ही ”जगद्गुरू म्हणजे कारस्थानी भिक्षुकशाहीच्या हातची मेणाची बाहुली” असल्याने ”शंकराचार्यांसारख्या निःसत्त्व दण्डधारी कर्महीनांच्या सत्तेला वास्तविक केव्हाच मूठमाती द्यायला पाहिजे होती. परंतु तेहतीस कोटी देव निर्माण करून दर माणसांच्या बोकांडी एकेक स्वतंत्र देव बसवणार्या भिक्षुकशाहीची सत्ता जोपर्यंत हिंदूजन झुगारून देणार नाहीत, तोपर्यंत ही पीठाची बाहुली सट्ट्याचा बाजार चालू ठेवणारच!” हे कटुसत्य ठणकावून सांगितलंत.
ज्याकाळात सोवळेधार्यांचा सुळसुळाट होता, पंक्तिभेद, जातिभेद, अस्पृश्यता पाळली जात होती; त्याकाळात ‘प्रबोधन’कार, तुम्ही माणसाला गुलामीच्या गुंगीत गुंतवणार्या भट-भिक्षुकांच्या जातिनिष्ठ हरामखोरीचं मर्म-वर्म सांगितलंत. त्यावर प्रबोधनाचे ठोसे लगावलेत. पत्थरी देव-धर्माचं भूत ब्रह्मदेवाच्या बेंबीतून नव्हे, तर ब्राह्मणांच्या पोटातून निर्माण झाल्याचं/होत असल्याचं तुम्ही नाना पुराव्यांसह दाखवून दिलंत. ‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ या पुस्तिकेत ‘उद्याची आशा’ व्यक्त करताना तुम्ही म्हटलंत, ”या देशातला तरुण स्वयंप्रज्ञेने उभा राहील, तेव्हा त्याच्या विचारांचा पहिला हातोडा देवावर आणि देवळांवर पडेल!” १९२९ मध्ये प्रकाशित झालेला हा आशावाद आहे. दरम्यानच्या ८० वर्षांत विज्ञानाने माणसाचं जीवन नाना प्रकारे सुसह्य केलंय. चमत्कार-रहस्य वाटणारी अनेक कोडी उलगडलीत. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने तर बिघडलेल्या मेंदूला ठिकाण्यावर आणण्यापर्यंत आणि हृदयाला ‘बायपास’ करण्यापर्यंत मजल मारलीय. विज्ञानामुळे माणूस सागराचाच तळ गाठतो; तसा जमिनीखाली शेकडो किलोमीटर जाऊनही सुरक्षित राहू शकतो. माणूस चंद्रावर जाऊन ५० वर्षे उलटलीत. तेव्हा कुठे आपलं यान तेवढं चंद्रावर पोहोचलंय! ह्या मागासलेपणाचा आंनद प्रधानमंत्री आणि त्यांच्या भक्त मंडळींनी ‘इव्हेंट’सारखा साजरा केला. मंगळावर संशोधन करणारे यान त्याआधी पोहोचलंय! पण भारतीयांच्या अंधश्रद्धेचं ग्रहण अजून काही सुटलेलं नाही; की मुलींच्या विवाहाला रखडवणारी ‘मंगळ बाधा’ जन्मकुंडलीतून नष्ट झाली नाही. किंबहुना, त्यात वाढ होताना दिसते. सभा-मोर्चांना, आंदोलनांना भाडोत्री लोक आणावे लागावेत, अशी आज परिस्थिती असताना; ‘जागृत’ पत्थरी देव- देवता दर्शनासाठी आणि अवतारी परमपूज्यांच्या कृपाप्रसादासाठी लोक लाखोंच्या संख्येने आपसूक जमतात. त्यावेळी होणाऱ्या चेंगराचेंगरीत शेकडो मरतात ; हजारो जखमी होऊन कायमचे विकलांग होतात.
मुंबईत सध्या गिरणगावातल्या ‘लालबागचा राजा’चा बडा बोलबाला आहे. ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाने १०० वर्षं पूर्ण केलीत. गेल्या ४० वर्षांत ह्या राजाच्या परिसरातील कापड गिरण्या आणि त्यांच्या जमिनी बिल्डर व मॉलवाल्यांनी राजकारण्यांशी संगनमत करून गिळल्यात. तिथे गगनचुंबी टॉवर उभे राहिले. कामगार मात्र कुटुंबासह उद्ध्वस्त झाला. त्यावेळी हा-
*‘लालबागचा राजा’ काय करत होता?*
“अरे, जसा तू सुखकर्ता, तसा तू दुःखहर्ता; संकट निवारक ना तू? मग लाखो कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना, केवळ पाहात राहाण्याची सुपारी घेतली होतीस का रे लालबागचा राजा ?” असे प्रश्न दर्शनाच्या रांगेत पंधरा-वीस तास उभं राहाणार्या सुशिक्षितांनाही पडत नाहीत. प्रश्न श्रद्धेचा आहे. हो, पण तसाच तो बुद्धीचाही आहे. मात्र बुद्धिदात्याच्या ‘जागृत’तेची तपासणी करण्यासाठी बुद्धी चालवणारा झटपट ‘धर्मद्रोही’ ठरतो ; तर राजाला २० कोटी रुपयांचा सोन्याचा मुकुट घालणारा “महा-देवभक्त” ठरतो. हा ‘भटीविकार’ त्याचे गुलाम झालेल्यांनीही सध्या सोयीस्करपणे वापरायला सुरुवात केलीय. अशा विकार-वृत्तीलाही आजकाल “प्रबोधन” म्हटलं जातं. अशी चालूगिरी तुमच्याही काळात होती. पण त्या विरोधात तुम्ही लोकभावनेची फिकीर न करता आवाज उठवलात; प्रसंगी संघर्षही केलात आणि ‘प्रबोधनकार’ ही उपाधी सार्थ ठरवलीत. त्या उपाधीचा लोकजीवनात साक्षात्कार घडवण्यात तुमच्या रक्ताचे जाऊ देत ; तुमच्या सहवासाचं गुणगान करणारेही कुचकामी निघाले; त्याचं काय? या उफराटीचा अंदाज तुम्हाला असावा. म्हणूनच तुम्ही (१९३९ मध्ये प्रकाशित झालेल्या) ‘प्रस्थान’ या लेखसंग्रहात लिहिलंत, ”प्रबोधन संप्रदाय अजून अस्तित्वात आलेला नाही. त्याला पक्ष, पंथ, पार्टी काही नाही. तो स्वतंत्र मतवादी आहे. स्पष्टच बोलायचं तर ही एक खांबावरची द्वारका आहे. खांब आहे तोवर द्वारका, पडला की त्याच्या कार्याच्या एकजात खारका!”
आपलं कार्य, त्यासाठी केलेला संघर्ष, खाल्लेल्या खस्ता मातीमोल झाल्या तरी बेहत्तर; पण आपण वर्तवलेलं हे ‘द्वारका-खारकाचं भविष्य’ खोटं ठरू नये, ह्याची काळजी भटशाहीने आणि त्याच्या गुलाम- गुलब्यांनी पराकोटीने घेतलीय. *भट-भिक्षुकशाही आपली स्वार्थी हरामखोरी, खोटेपणा उघड्यावर येण्यापूर्वीच, स्वतःला आवरतं घेते आणि वेळवखत पाहून, समाजाला देव-धर्माच्या खुळाची लालूच दाखवून, आपल्या गुलामीचा डंख मारते. प्रसंगी सत्य सांगणाऱ्या संपविण्यासाठी आपले पाळीव बजरंगी वापरते. हे खुनशी कट – कारस्थाने समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात जोरात सुरू आहेत.* भिक्षुकशाहीच्या या हरामखोरीला अहिंदू धर्मही अपवाद नाहीत. अयोध्येतल्या मंदिर-मशीद वादापासून भारतात सर्वच क्षेत्रातल्या भिक्षुकशाहीने उचल खाल्लीय. पडीक-दुर्लक्षित देव-देवळं जागृत झालीत. वास्तुशांती, वास्तुशास्त्राचा बनाव आला. ‘नारायण नागबळी’सारख्या लूटमार विधीचं स्तोम माजलं.
*‘वैभवलक्ष्मी’चं व्रत आलं.*
गणपतीच्या मूर्ती दूध पिण्याचा चमत्कार झाला. नामवंत वैज्ञानिकांनी गैर ठरवलेलं ‘ज्योतिषशात्र’ विद्यापीठीय शिक्षणात थापण्याचा प्रयोग झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचं ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी ‘मृत्युंजय जपयागा’चं आयोजन (१९९६) झालं. ‘वाजपेयी सरकार’ टिकून राहाण्यासाठी संसद भवनाच्या जवळ यज्ञ करण्यात आला.(१९९८) ‘विश्वशांती यज्ञा’ने लूटमार झाली. ‘आयटी’वाल्यांच्या हातातही पिवळे-लाल दोरे दिसू लागले. गणपतीचं मार्केटिंगही जोरात झालं. सुपरस्टार अमिताभ बच्चन प्रभादेवीच्या सिद्धिविनायकला सहकुटुंब अनवाणी चालत गेल्यापासून तिथे भक्तांच्या संख्येत लाखोंनी वाढ झाली. तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज यांच्याही ‘बुलाव्या’चं प्रस्थ वाढलं. स्वामींच्या चमत्काराच्या बाता प्रचारार्थ समर्थ कलावंत मंडळी कामाला लागलीत. ‘हे सगळं देशात जे दहशतीचं, असुरक्षिततेचं सावट आहे, त्यातून मनःशांती मिळण्यासाठी होतं,’ अशी पोपटपंची मीडियातून होऊ लागली. तथापि, हा-
*भट्ट सांगे आणि मठ्ठ ऐके*
असा प्रकार आहे, हे सत्य कुणी सांगत नाही. कारण तो ”मराठा-बहुजन समाजाला परावलंबी परप्रत्ययनेय स्थितीत अडकवून ठेवून आपला स्वार्थ साधणं, हा भट-भिक्षुकांचा सनातन उद्योग आहे,” हे ‘प्रबोधन’कार तुमचं म्हणणं. ते भटी उद्योगाचे रखवालदार तथा ‘मीडियामास्टर्स’ संदर्भासाठीही वापरणार नाहीत, हे ठाऊक आहे. ते एकवेळ संदर्भासाठी अनाकलनीय मार्क्स, रसेल यांची ‘अवघड अवतरणं’ देतील. समदृष्टी दाखवण्यासाठी नाइलाजाने फुले- आगरकर- शाहू- आंबेडकरांची साक्ष काढतील. पण ‘प्रबोधन’कार ठाकरे, ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील, ‘क्रांतिवीर’ नाना पाटील, ‘कर्मवीर’ भाऊराव पाटील आदिंचे भटी बदमाषी दाखवणारे संदर्भ अजिबात देणार नाहीत. कारण, त्यांनी भट- भिक्षुकशाहीला दिलेले प्रबोधनी तडाखे ब्राह्मणविरोधी ठरतात ना!
‘प्रबोधन’कार, तुम्ही केलेला मानसिक गुलामी विरोधातला संघर्ष कुणा एका जाती-धर्माविरोधात नव्हता! तर तो, हिंदुधर्म सुधारणांसाठी; समस्त हिंदूजनांच्या संघटनांसाठी; त्यांच्या स्वाभिमानासाठी, लोकोद्धारासाठी होता. तरीही ‘प्रबोधन’कार तुमचा विचार तर सांगितला जात नाहीच; पण तुमचं नावही घेतलं जात नाही. ‘भटी विचार’ भक्तांशी आणि त्यांच्या मीडियातील बगलबच्चांशी फुकाचा वाईटपणा कशासाठी घ्यायचा; असा प्रश्न पडावा इतके ‘सांस्कृतिक दहशतवादाचा संचार’ देशात आहे. त्यासाठी देवा-धर्माच्या नावानं हिंदुत्व घुमवलं जातं ; आणि बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वीवर फुलं उधळली जातात ! (मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक करून कोर्टात आणले जात असताना (२००९) नाशिकच्या शिवसैनिकांनी प्रज्ञा सिंग यांच्यावर फुलं उधळली होती. या प्रकरणी जामिनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंग २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्या.) अशाप्रकारे हवं तसं राजकारण रेटता येतं. ह्या खोट्या व्यवहारात “देव- धर्म- देवळे- मठ यांच्या आश्रयाने ब्रह्मचार्यांचे वंश वाढतात कसे? विधवा पतिव्रता पुत्रवती होतात कशा? गोसावडे सावकारी करतात कसे? मठात गुरू-महाराजांचे गोकुळ नांदते कसे?” हेही तुम्ही नेमक्या गोळीबंद शब्दांत सांगितलं. तेच आसाराम, राम-रहीम, रामपाल, रामवृक्ष ह्या चार हरामांनी केलं. ते तुरुंगात आहेत; म्हणून छात्या पिटणारे ‘हिंदू जागृती’वालेही आहेत.
*गोळीला तुम्ही, पोळीला आम्ही*
हा भट-ब्राह्मणांचा गुलबे-गुलाम बनवण्याचा सनातनी उद्योग चालतो कसा; याची तुम्ही केलेली चिरफाड वाचा म्हणून सांगायचं कुणी आणि कशाला? ‘आपुल्या पित्याची आपणचि सांगे कीर्ती’ अशी नाक मुरडणी कुणी करू नये, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनीही शक्य आणि आवश्यक असूनही तुमच्या विचार-साहित्याचा प्रचार करण्याचं टाळलं असेल! पण जे स्वतःला पुरोगामी, डावे, हिंदुत्वविरोधी, अंधश्रद्धा निर्मूलक म्हणवतात, त्याचं काय? त्यांचीही तुमचं नाव घेताना दातखीळ का बसते? लिहिताना पेनातली शाई का संपते? कॉम्प्युटर हँग का होतो? का, त्यांच्यातील जातीनिष्ठता बंड करून उठते?
‘इतिहासाचार्य’ (?) वि.का.राजवाडे यांनी कायस्थांना ‘शिवरायांचे शत्रू, स्वराज्यद्रोही, संभाजीराजांचे खुनी’ अशा विशेषणांनी रंगवताच; तुम्ही राजवाडे आणि त्यांची पाठराखण करणार्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ विरोधातही ‘कोदंडाचा टणत्कार’ ओढला. ब्राह्मणी वर्ण्यवर्चस्ववाद्यांनी इतिहासातही कोणकोणत्या खोट्या घुसखोर्या केल्या, ते उदाहरणांसह जगजाहीर केलंत. ते जातीसाठी मती चालवणारं नव्हतं; तर तो संशोधनाचा अस्सल टणत्कार होता. ‘ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास’ या ग्रंथामधून तुम्ही पेशवाईने माजलेल्या ब्राह्मणी विकृतीची शिरजोरी सांगितलीत. ते सांगताना “क्षत्रियांची बदनामी करणारे खोटे दस्तऐवजी पुरावे स्मृतिपुराणी ग्रंथात स्वार्थी ब्राह्मणांनी घुसडण्याच्या वेळीच जर ब्राह्मणांच्या नरड्यावर क्षत्रिय बसले असते, तर आज त्यांना ‘शूद्र शूद्र’ असे ब्राह्मणांनी धिक्काराने म्हणताच, त्यांच्या खाडकन् मुस्कटात भडकवण्याचा अतिप्रसंग टळला नसता काय?”
या तुमच्या विचारानेच, जेम्स लेनच्या माध्यमातून शिवरायांची आणि जिजाबाईंच्या चरित्राची विटंबना होताच; मी लेखणी व वाणी द्वारे अस्सल शिवप्रेमी कृतिशील केले. (२००३-०४) लेनला वापरणार्यांच्या हरामखोरीचा त्यांनी समाचार घेतला. संशोधन कार्यासाठी जेम्स लेन जिथे राहात होता, त्या पुण्याच्या ‘भांडारकर प्राच्य विद्या संस्थे’वर ‘संभाजी ब्रिगेड’च्या कार्यकर्त्यांनी (जानेवारी २००४) हल्ला केला. तुम्ही इच्छिल्याप्रमाणे ते कुणाच्या नरड्यावर बसले नाहीत, तरीही त्यांच्या नावानं ‘ब्राह्मणद्वेषी’ असा गिल्ला करीत त्यांना ‘तालिबानी’ म्हणून हिणवण्यात आले. अशा कांगावखोरांच्या सुरात सूर मिसळणारे जागृत क्षत्रिय- मराठेही असावेत, ह्यास तुमच्या प्रबोधनी टणत्काराला दिलेली ‘उलटी सलामी’च म्हटली पाहिजे.
प्रबोधनकार तुम्ही म्हणाल, ह्यात काय नवं आहे? विपरीत वागणं, गिर्हाईक बनून जगणं, ही मराठा-बहुजन लोकांची सनातन खोड आहे. ‘माझी जीवनगाथा’च्या प्रकाशन समारंभात तुमचं भाषण अखेरचे ठरलं. त्यात तुम्ही म्हटलं होतं, ”स्त्रिया आता खूप शिकल्या. खूप पुढे गेल्या. रूढी-परंपरेत त्यांचा विकास खुंटून राहिला होता. पण त्यांनी आता इतकं पुढे जावं, पुरुषांना वाटलं पाहिजे की, स्त्रिया आपल्यावर सूड उगवत आहेत.” तुमच्या या आशावादामुळेच स्त्रियांना ‘भटी छूमंतर’च्या धुपार्याने सॉफ्ट टार्गेट करणारे पुरुषसत्ताकवादी सावध झाले असावेत. तुम्ही ‘भिक्षुकशाहीचे बण्ड’ या ग्रंथाच्या अखेरीस भट-ब्राह्मणांच्या भेज्यात काय रटरटत असतं ते सांगताना म्हटलंय, *”जावत्काल (जोवर) हिंदूसमाजातील स्त्रीवर्ग आम्हा भिक्षुकांच्या भजनी लागलेला आहे, तावत्काल (तोवर) आमच्या भिक्षुकशाहीचे वर्चस्व हाणून पाडण्याचे यत्न जेहेत्ते फोलच होणार!”*
आपला हा मर्मवेध आजही सत्यात उतरताना दिसतो. स्त्रिया शिकल्या. विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना त्या दिसतात. राजकारणात, समाजकारणातही मोठ्या पदावर आहेत. भारताच्या राष्ट्रपतीही झाल्या आहेत. अवकाशात भरारी मारण्यातही त्या यशस्वी झाल्या आहेत. असं असूनही त्या मोठ्या प्रमाणात भटीपाशात अडकल्या आहेत. नुकतंच पुण्याच्या ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’च्या उत्सवात २५ हजार महिलांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केलं. त्याला प्रसारमाध्यमांनी ‘विराट स्त्री शक्ती’, ‘महागणेशभक्ती’ अशी विशेषणं लावून प्रसिद्धी दिली. कुठल्याही गर्दीला भक्ती-शक्तीचा टिळा लावून त्यातल्या भाबडेपणाची भलामण करण्याचा मीडिया हव्यास, रोग म्हणावा इतका बळावलाय. परिणामी, अथर्वशीर्ष पठणच्या सामुदायिक उपक्रमाला प्रसिद्धी देताना तारतम्याचा अभाव दिसला. किंबहुना, त्याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्षच केलं जातं असावं. ‘अथर्वशीर्ष’ पठण हा श्रद्धेचा विषय जरूर आहे. पण त्याचं जाहीरपणे सामुदायिकरीत्या पठण करण्याचं कारण काय?
*’अथर्वशीर्ष’ हा ‘अथर्ववेद’ ह्या ग्रंथाचाच एक भाग आहे. त्यात गणपतीचं परब्रह्मस्वरूप विषद करण्यात आलंय. या अथर्वशीर्ष शब्दातील ‘अ’चा अर्थ आहे ‘अभाव’. ‘थर्व’ म्हणजे ‘अस्थिर’; आणि ‘शीर्ष’ म्हणजे डोकं! चंचलपणाचा अभाव असणारं डोकं म्हणजे बुद्धी तयार करणे म्हणजे अथर्वशीर्ष! ह्याचा अर्थ, ज्यांचे मन-बुद्धी हे अस्थिर-चंचल आहे; स्पष्टच सांगायचं तर ज्याचं डोकं ठिकाणावर नाही, अशांच्या दुरुस्तीसाठी ‘अथर्वशीर्ष आहे.* ह्याचा अर्थ, सामूहिक अथर्वशीर्ष पठणासाठी संघटित शक्ती दाखवणार्या महिलांचं डोकं ठिकाणावर नव्हतं, असं म्हणणं साफ चुकीचं आहे. तथापि, ‘अथर्वशीर्ष’चा अर्थ न समजून घेता त्याच्या सामूहिक पठणातून आपल्याभोवतीच्या भटीपाशाचं प्रदर्शन मात्र स्त्रियांनी घडवलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुशिक्षित, स्त्रिया मोठ्या प्रमाणावर होत्या. मोठ्या हुद्याची जबाबदारी पेलणार्या तरुणी होत्या. परंतु त्यांना, ‘प्रबोधन’कार तुम्ही जो स्त्रियांच्या शोषणाविरोधात विचारांचा जबरदस्त सोटा चालवला, तो ठाऊक नसावा. “स्त्रियांच्या परवशतेचा, राष्ट्रदेवतांच्या गुलामगिरीचा, आमच्या माताभगिनींच्या बौद्धिक अधःपाताचा प्रश्न स्वच्छ सुटल्याशिवाय भिक्षुकशाहीचे बण्डसुद्धा पुनःपुन्हा उपटल्याशिवाय राहाणार नाही!” हा इशारा तुम्ही ८० वर्षांपूर्वी दिलात. तेच वर्तमान असावं, त्याची साक्ष महिलांच्या सामूहिक ‘अथर्वशीर्ष’ पठणातून मिळावी, ही विचारी मनाला शरमिंदं करणारी घटना आहे.
‘प्रबोधन’कार, अशा घटना तुमच्या हयातीतही होत होत्या. पण तुमच्या लेखणी-वाणीत समाजमनाला भानावर आणणारी ताकद होती. या ताकदीला राजर्षि शाहू महाराज, भास्करराव जाधव, पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील, नाना पाटील, माधवराव बागल, यांच्याप्रमाणे सत्यशोधक कार्यकर्त्यांची, शोषित कष्टकरी जनतेची मोठी साथ होती. आज समाजाला भूलथापा मारून त्यांना स्वार्थी राजकारणासाठी गुंगवणार्यांची चलती आहे. त्यांचं मार्केटिंग करणारेही आहेत. अशा वातावरणात गरज असूनही तुमच्या विचारांचा प्रसार कुणी करायचा? स्पष्ट सांगायचं, तर बाळासाहेब ठाकरे यांची ‘राजकीय ओळख’ होती म्हणून तुमचं नाव तरी घेतलं जातं. तुमच्यासारखंच विचार-कार्य करणार्या महात्मा फुले यांचे अनुयायी कृष्णराव भालेकर, ताराबाई शिंदे, मुकुंदराव पाटील, केशवराव विचारे, भगवंतराव पाळेकर, दिनकरराव जवळकर, रामचंद्र जाधव ऊर्फ ‘दासराम,’ वीर माहिते, गुरुवर्य कृष्णराव केळुसकर, श्रीपतराव शिंदे, सावित्रीबाई रोडे आदिंची नावं कुणाला ठाऊक आहेत का?
*क्रांती आपली पिल्लं खाते,*
असं म्हणतात. पण आपल्या देशाचा न्याय याबाबतीतही उफराटाच आहे. ज्यांनी समाज सुधारणेसाठी खस्ता खाऊन, समाज विकास घडवून आणला, त्या विकासाच्या लाभार्थींनीच सुधारकांना, क्रांतिकारकांना विस्मरणाच्या आवंढ्यात गिळंकृत केलंय. ‘प्रबोधन’कार, आपण पाच नाटकं लिहिलीत. त्यात साहित्यिक छचोरपणा नाही. त्यातही सामाजिक समस्यांचा आणि त्यांची उकल करण्याचा ध्यास काठोकाठ भरलेला आहे. त्यापैकी ‘संगीत विधि-निषेध’ हे धर्म, सामाजिक रूढी-परंपरांच्या नावानं चालणार्या विधींचा निषेध करणारं नाटक आहे. (प्रकाशन १९३४) त्यात तुम्ही क्रांती, शांती, विवेक, कावळे, बावळे, सनातने, भडाग्नी अशा नाव-आडनावांतच त्यांची ओळख सांगणारी पात्रं निर्माण केलीत. त्यातील ‘क्रांती’ ही ‘विवेक’ला ऐकवते, “देश? कुठला देश? या देशानं माझ्या जीवनाची जबाबदारी पत्करली आहे का? मग कुणासाठी, कशासाठी या क्रांतीनं या देशात जगण्याची व्यर्थ धडपड करावी? मायेच्या उमाळ्यानं ‘क्रान्ती ये’ म्हणून मला जवळ करणारा, आपुलकीच्या मायेनं पोटाशी धरणारा, एकतरी जिता जीव या मोठ्या लोकवस्तीच्या देशात तुम्हाला दिसतो का?”
तिला समजावत विवेक म्हणतो, “मला तुझ्या या करुणास्पद स्थितीची कल्पना आहे. पण जोवर आपण हिंदुस्थानात आणि हिंदू समाजात वावरत आहोत; नव्हे वावरल्याशिवाय सुटकाच नाही- तोवर तुझ्या या स्थितीला उपाय काय?” त्याची ही हताशा साफ करताना ‘शांती’ त्याला म्हणते, “युरोप-अमेरिकेची सफर करून आलेल्या तुझ्यासारख्या तरुण विद्वानात सुद्धा असले निराशेचे उद्गार! पेसिमिझम्-निराशा हाच हिंदू संस्कृतीचा पिंड दिसतो.”
तुमच्या या नेमक्या संवादात धनाने, मनाने आणि अकलेनेही श्रीमंत होऊनसुद्धा भटी व्यवस्थेपुढे लाचार होणार्या भारतीयांच्या मानसिकतेचं सार आहे. तुमच्या नाटकातील ‘क्रांती’ गाण्यातून आपलं मन मोकळं करताना म्हणते-
*झुरत सतत मनी। क्रान्त क्रान्ति ही।*
*जीवन कसले। रसाभावी या-*
– अशीच अवस्था तुमच्या विचारांनी झपाटणार्यांची असताना, तुमच्या ‘सत्य परमो धर्म:’ या ब्रीदाशी प्रामाणिक राहून मी सांगतो, *”प्रबोधन’कार माफी असावी. आता तुम्ही नावापुरते आणि तसबिरीतून दिसण्यापुरतेच शिल्लक आहात!* तुमचं विचार-कार्य शासकीय प्रकाशनाच्या पाच खंडी ग्रंथांत बंदिस्त आहे. पत्थरी देव-देवता जागृत झाल्यावर तुमच्यासारख्या ‘प्रबोधन’काराच्या वाट्याला दुसरं काय येणार? आजच्या तरुण पिढीचं हे दुर्दैव आहे.”
■
(*ज्ञानेश महाराव* संपादित व लिखित *प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व* ह्या पुस्तकातील वरील लेख आहे.)