मुंबई दि (प्रतिनिधी) शहराच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौकांमध्ये राजकीय व्यक्तींकडून शुभेच्छा, विविध कार्यक्रम धर्मोत्सवाचे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बॅनर लावले जातात. याबाबत उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बॅनरवर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे लेखी पत्र महापालिका व बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिले आहे.
शहरात कोणत्याही स्वरूपाची जाहिरात करण्यासाठी स्वतंत्र जाहिरात व फलक नियंत्रण नियम २०१३ तयार केले आहेत. यानुसार सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौक आदी ठिकाणी बॅनर लावण्यास प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी देण्यात येत नाही.
तरीही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चौका-चौकांत, काही मोक्याच्या ठिकाणी विविध वाढदिवस, निवड-नियुक्ती अभिनंदन, विविध धार्मिक कार्यक्रम, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथी तर गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण शहरभर अनधिकृतपणे बॅनर लावून जाहिरातबाजी केली जात आहे.
यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असून, संबंधित व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ अतंर्गत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रशासनाने या कायद्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
शिवाय महापुरुष व देवी देवतांचे फोटो बॅनर वर छापले जातात नंतर तेच बॅनर फाटून तुटून कचर्यात पडून महा विटंबना होते, अश्यावेळी धार्मिक भावना दुखावल्या जातं नाहीत का? असा सवाल करून यापुढे अशा प्रकारची जाहिरातबाजी करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी समाजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे