Home लेख गणेशोत्सवात विधायक कामे करावीत!

गणेशोत्सवात विधायक कामे करावीत!

101

 

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून आज १३० वर्ष झाली. इंग्रजांच्या राजवटीत भारतीय संस्कृतीची उघड उघड विटंबना होत होती. इंग्रजांच्या दमनशाही विरुद्ध तरुण एकत्र यायला तयार नव्हते. तरुणांना एकत्र आणल्याशिवाय इंग्रजांविरुद्ध लढा देणे अशक्य आहे हे ओळखून लोकमान्य टिळकांनी तरुणांना एकत्र आणण्यासाठी व त्यांच्यात देशभक्तीची मशाल पेटवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सव ही महाराष्ट्राची परंपरा बनली. आजही ती परंपरा मोठया भक्तिभावाने जोपासली जाते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राची ओळख आहे. लवकरच गणेशाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत सर्वच गणेशभक्त गणेशाची मनोभावी पूजा करतात. सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते मात्र अलीकडच्या काळात गणेशोत्सवाचे हे स्वरूप बदलू लागले आहे. टिळकांनी ज्या उद्देशाने हा सण सुरू केला तो उद्देशच आता हरपला आहे. इतकेच काय पण या उत्सवाचे पावित्र्यही कमी होऊ लागले आहे. आज गणेशोत्सव हा उत्सव न राहता इव्हेंट बनला आहे. उंचच उंच मूर्तींची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. या मोठ्या मुर्त्या समुद्राच्या पाण्यात विसर्जित करताना दोरीच्या साहाय्याने बांधाव्या लागतात. उंचच उंच मूर्तीचे अवडंबर न माजवता पर्यावरण पूरक गणेश मूर्ती खरेदी करून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. शास्त्रानुसार शाडूच्या मातीने गणेश मूर्ती बनवावी, असे सांगितले आहे असे असतानाही सर्रास प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मुर्त्या बनवल्या जातात. या मुर्त्या पाण्यात विरघळत नसल्याने पाण्याचेही प्रदूषण होते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत ध्वनी प्रदूषणही खूप वाढते. गणेशोत्सवात डॉल्बीच्या स्पीकरवर मोठमोठ्या आवाजात गाणी लावून चित्रपटांच्या गाण्यावर हिडीस नृत्य करण्याची फॅशन रूढ झाली आहे. या डॉल्बीचा आवाज इतका मोठा असतो की त्याचा परिणाम लहान मुले व जेष्ठ नागरिकांच्या श्रवण इंद्रियांवर होऊ शकतो. उत्सवाच्या नावाखाली वर्गणी उकळली जाते प्रसंगी धमकीही दिली जाते. त्यावरही गणेशभक्त नाराज आहेत. भक्तांनी जितकी वर्गणी दिली गणेश मंडळांनी तीच दान म्हणून स्वीकारावी. गणेशोत्सवात डोळे दिपवणारी रोषणाई केली जाते त्यामुळे विजेचाही अपव्यय होतो. तेंव्हा सजावटी रोषणाई यावर मर्यादा घालावी. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या मंडळाचे मार्केटिंग करत आहेत. नवसाला पावणारा गणपती अशी जाहिरात करून सिलेंब्रेटींना बोलवले जाते. त्यातूनच मग मंडळा- मंडळामध्ये मतभेद होऊन तेढ निर्माण होते त्यातूनच मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. टिळकांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यास सांगितले आहे. दुसऱ्यांना त्रास होऊ न देता गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. गणेश मंडळांनी दहा दिवसांच्या कालावधीत सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत. गणेश मंडळांनी समाजाला उपयोगी पडतील अशी विधायक कामे करावीत. रक्तदान शिबिर, दुष्काळग्रस्तांना, पूरग्रस्तांना मदत तसेच गरीब आणि कोरोना काळात पालक गमवलेल्या अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारावे. अनाथ आश्रम, वृद्ध आश्रमांना मदत करावी. गणेश मंडळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. मंडळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा यांचे आयोजन करावे. गणेश ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढीस लागेल असे उपक्रम राबवावेत. हा उत्सव जितका साधेपणाने साजरा केला जाईल तितकेच त्याचे पावित्र्य कायम राहील आणि भक्तांनाही त्याचा आनंद लुटता येईल.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here