*दत्तकुमार खंडागळे* संपादक वज्रधारी, 9561551006
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा गंभीर अपमान झाला. आजवर इतक्या वाईट पध्दतीने कधीच शिवरायांचा अवमान झाला नव्हता. शिवरायांचा छिन्न-विछिन्न अवस्थेतला पुतळा पाहताना काळजात खुप खुप वेदना झाल्या. राजकीय साठमारीसाठी सरकारने शिवरायांचा उपयोग केलाच पण त्यांची भयंकर विटंबना केली आहे. याबाबत अवघा महाराष्ट्र चिडला आहे. विखरून पडलेला शिवरायांचा पुतळा पाहून अनेक शिवभक्तांच्या डोळ्यात पाणी आले होते. मराठी माणसांची ही अस्वस्थता ओळखून अजित पवारांनी पहिल्यांदा माफी मागितली, त्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली. या लोकांनी माफी मागत शिवभक्तांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजूनही या बाबत माफी मागितली नाही. त्यांनी या प्रकरणाबाबत माफी न मागता त्यांची पाळीव अंडी-पिल्ली विरोधकांच्यावर सोडली आहेत. त्यांची पाळीव गँग माध्यमासमोर येवून कसेही तोंड सोडत आहेत. फडणवीसांनी या एकूण प्रकरणाला कलाटणी देत नवा वाद माजवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवरायांनी सुरत लुटलीच नव्हती हा चुकीचा इतिहास कॉग्रेसने आम्हाला शिकवला असल्याचे म्हणत त्यांनी नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना राजकोट पुतळा अवमान प्रकरण बाजूला सारावयाचे आहे. लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा नवा साप ते लोकांच्या पायात सोडू पाहत आहेत.
आज आचार्य अत्रे असते तर कडाडले असते. देवेंद्र फडणीसांची राजकीय बदमाशी पाहून ते खवळून उठले असते. “देवेंद्र फडणवीसांरखा बदमाश माणूस दहा हजार वर्षात जन्माला आला नाही !” असे त्यांनी म्हंटले असते. देवेंद्र फडणवीसांचे त्यांनी वाभाडे काढले असते. माध्यातल्या कैकांनी नांग्या टाकल्या आहेत. जाहिरातीच्या पँकेजसाठी लेखण्यांना टोक राहिले नाही. त्यामुळे आचार्य अत्रे असते तर त्यांनी फडणवीसांच्या या बदमाशीला सोलून काढलं असतं. राजकोटला पुतळा विटंबना करूनही नामानिराळे राहत दुस-याकडे बोट करणा-या फडणवीसांची अत्रेंनी गचांडी पकडली असती. आचार्य अत्रे असते तर शंभर टक्के हेच बोलले असते. “फडणवीस, इतिहास म्हणजे तुम्हाला गंगाधरपंताची चड्डी वाटली काय ? हवी तेव्हा, हवी तशी बदलायला असा सवाल अत्रेंनी केला असता. “देवेंद्रजी, गंगाधरपंताच्या धोतराशी खेळलात तसे इतिहासाशी खेळायला जाऊ नका. शिवप्रेमी जनता नागडं केल्याशिवाय सोडणार नाही !” असा इशाराही त्यांनी फडणवीसांना दिला असता. खरेतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हव ते राजकारण करावे. राजकारण करताना त्यांनी इतिहासाशी खेळायला जाऊ नये. त्यांनी ज्यांना महाराष्ट्र भुषण दिला त्या पुरंदरेंनाही सुरतेची लुट नाकारण्याची हिम्मत झाली नाही. त्यांनीही त्यांच्या इतिहास मांडणीत असा दावा कधीच केला नाही. पण फडणवीसांनी केंद्रातल्या गुजराती पप्पांना खुष करण्यासाठी इतिहासाची नवी मांडणी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना एका दगडात दोन पक्षी मारावयाचे आहेत. राज्यात राजकोट पुतळा प्रकरणाचे उठलेले पडसाद थांबवायचे आहेत आणि त्याचवेळी गुजराती पप्पांनाही खुष ठेवायचे आहे. फडणवीसांनी राजकीय स्वार्थासाठी इतक्या खालच्या थराला जाऊ नये. स्वत:चा सदसदविवेक मरू देऊ नये.
राजकारण राजकारणाच्या पध्दतीने होत राहिल. इथं कुणीच सत्तेच्या अढळपदावर कायम राहत नाही. कुणाचीच सत्ता शाश्वत नसते. काळाच्या ओघात जगजेत्ते नष्ट झाले. त्यांचीही साम्राज्यं लयाली गेली. मग फडणवीस कोण लागून गेले ? पाच वर्षाच्या कालखंडात ते “मा मु” चे “उप मा मु” झाले. काळाच्या पोटात अजून काय काय दडलय त्याचा अंदाज नाही बांधता येत. तसे नसते तर अडवाणींची इतकी उपेक्षा नसती झाली. अढळ व्हायला इथं कुणी ‘ध्रुव तारा’ नाही याचे भान फडणवीसांनी ठेवावे. राजकारणात कित्येक उदयाला येतात तर कित्येकांचा अस्त होत असतो. ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. एकेकाळी लालकृष्ण अडवानींच्या तोंडासमोर माईक पकडणारे मोदी आज सत्तेच्या खेळात शक्तीमान आहेत. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडेंच्या बँगा उचलून त्यांच्या मागे मागे चालत होते. आज त्याच पंकजा मुंडेची आजची अवस्था बिकट आहे. काळाच्या ओघात त्या अडगळीत गेल्या आहेत आणि त्यांच्या बँगा उचलणारे फडणवीस राजकारणाचा मध्यबिंदू झाले आहेत. पण हे चित्र चिरकाल किंवा शाश्वत राहणार नाही. फडणवीसांचीही सत्ता शाश्वत राहणार नाही. आज ते मध्यबिंदू असतीलही पण काळाच्या ओघात त्यांचाही लालकृष्ण अडवाणी होणार आहे. हाच काळाचा महिमा असतो. आज हाती सत्तेची पॉवर असलेले फडणवीस भविष्यात निष्प्रभ झालेले दिसतील. राजकारणात हे होत राहतं. पण लालकृष्ण अडवाणींच्याबद्दल लोकांना आजही सहानुभूती वाटते. फडणवीस ज्या पध्दतीची कारस्थानं करत आहेत ते पाहता त्यांच्याबद्दल कुणाला सहानूभूती वाटेल असं वाटत नाही. अडवाणी स्वबळावर त्या उंचीवर पोहोचले होते. फडणवीस काळाच्या करिष्म्याचे आणि मोदी लाटेचे लाभार्थी आहेत. ते ‘मासलिडर’ नाहीत. त्यांच्या डोक्यावर असणारा संघाचा व गुजराती पप्पांचा आशिर्वादाचा हात निघाला की फडणवीसांना स्वत:ची खरी किंमत कळेल. आज त्यांच्या इशा-यावर इतरांच्या अंगावर धावून जाणारी सगळी अंडी-पिल्ली त्यांच्याच अंगावर धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. फडणवीस सुडाचे राजकारण करत आहेत. सुडाचे राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी फडणवीसांची थुंकी चाटणा-या लोकांनी फडणवीसांना भ्रमात ठेवले आहे. फडणवीसांच्या मुतखड्यालाही हिरा म्हणून गळ्यात घालणारे हे लोक फडणवीसांची वाट लावणार हे नक्की. या सगळ्या खेळात फडणवीसांसारखा चांगला बुध्दीमान नेता बरबाद होताना पाहून दु:ख होतय.