Home लेख नंदनवनात रंगणार लोकशाहीचा उत्सव

नंदनवनात रंगणार लोकशाहीचा उत्सव

26

 

 

 

जम्मू काश्मीरला विशेष अधिकार देणारे ३७० वे कलम हटवल्या नंतर जम्मू काश्मीर मध्ये पहिल्यांदाच निवडणुका होणार आहे. जम्मू काश्मीर मध्ये विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर मध्ये होणार असून तशी घोषणा निवडणूक आयोगाने नुकतीच केली. या निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने काही वर्षापासूनच सुरु केली होती. त्यासाठी निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर मधील मतदार संघाची पुनर्रचना केली होती. मतदार संघाची पुनर्रचना करण्यासाठी माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. समितीत तात्कालिन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र व उपायुक्त चंद्रभूषण कुमार हे सदस्य होते. या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर २०२२ सालीच जम्मू काश्मीर विधानसभा आणि लोकसभेच्या नवीन मतदार संघाची अधिसूचना जाहीर झाली होती. या अधिसूचनेनुसार जम्मू काश्मीर राज्यात एकूण ९० विधानसभा मतदार संघ असून त्यातील ४३ मतदारसंघ जम्मू क्षेत्रात तर ४७ मतदारसंघ काश्मीर क्षेत्रात आहे. मतदार संघाची पुनर्रचना झाल्याने जम्मू काश्मीरमधील अनेक नेत्यांना नवीन मतदार संघ शोधण्याची वेळ आली आहे कारण काहींचा मतदार संघ गायब झाला आहे तर काहींचा मतदारसंघ आरक्षित झाला आहे. मतदार संघाची पुनर्रचना झाल्यावर विरोधकांनी त्यावर टीकाही केली होती कारण पुनर्रचनेनंतर जम्मू क्षेत्रातील मतदारसंघात वाढ झाली आहे. जम्मू क्षेत्रात हिंदू धर्मीय लोकांची संख्या जास्त आहे. हिंदूंची मते मिळवण्यासाठीच भाजपने या क्षेत्रात मतदारसंघ वाढवले आहेत असा आरोप करण्यात आला मात्र निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. आता निवडणूक घोषित झाल्यावर राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी केली आहे. या आघाडीमुळे जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपने अद्याप कोणाशी आघाडी केली नसली तरी गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाशी त्यांची युती होऊ शकते. महेबुबा मुफ्ती यांचा पिपिल्स डेमोक्रेटिक पक्ष हा देखील तेथील एक महत्वाचा पक्ष आहे. तो पक्ष कोणती भूमिका घेतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. या पक्षाचे आणि नॅशनल कॉन्फरन्सशी विळ्या भोपळ्याचे नाते आहे म्हणून हा पक्ष काँग्रेस आघाडीत अद्याप सामील झाला नाही मात्र या पक्षाचे भाजपशीही पटत नाही. या पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना केंद्र सरकारने नजरकैदेत ठेवल्याचा आरोप या पक्षाने काही दिवसांपूर्वी केला होता त्यामुळे ते भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आघाडीत सामील झाला तर आश्चर्य वाटायला नको. याशिवाय आणखी काही छोटे मोठे पक्ष निवडणुकीत उतरू शकतात एकूणच काय तर आगामी महिनाभर नंदनवनात निवडणुकांचे वातावरण असणार आहे. जम्मू काश्मीर मध्ये लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्या विशेष म्हणजे मतदार मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. लोकसभे प्रमाणेच विधानसभेतही मतदार भरभरून मतदान करतील आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होतील असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. असे असले तरी मागील काही दिवसात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान सुरक्षा यंत्रणेपुढे आहे. अर्थात आपली सुरक्षा यंत्रणा त्यासाठी सक्षम आहे हे ही तितकेच खरे त्यामुळे नंदनवनात पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव रंगणार असून या उत्सवात मतदार उत्साहाने सहभागी होणार यात शंका नाही.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here