चंद्रपूर (प्रतिनिधी )-डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया व थेंब ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक लोकशाही परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा. डॉ. टी. डी. कोसे यांनी केले. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक अशोक वानखेडे जेष्ठ पत्रकार नवी दिल्ली हे उपस्थित होते तर प्रमुख वक्ता माजी सनदी अधिकारी तथा संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे उपस्थित होते. सामाजिक लोकशाहीला यशस्वी करण्यासाठी नीतिमान , चारित्र्यवान आणि प्रामाणिक माणसे निवडून दिली पाहिजेत असे प्रतिपादन अशोक वानखेडे यांनी केले. सामाजिक लोकशाही मजबूत झाल्याशिवाय राजकीय लोकशाही मजबूत होणार नाही. सामाजिक लोकशाहीला मजबूत करण्यासाठी भारतीय नागरिकांची फार मोठी जबाबदारी असणार आहे. आपण कशा पद्धतीने आपल्या संविधानिक मूल्यांचे पालन करतो यावर देशाचे भवितव्य ठरत असते. वर्तमान स्थितीमध्ये सामाजिक लोकशाहीचे भवितव्य या विषयावर 24 आगस्ट ला चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथील कार्यक्रमात अशोक वानखेडे बोलत होते. सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून नागरिकांपर्यंत संविधानाला अपेक्षित असलेले नागरिकांचे अधिकार पोहोचवले पाहिजे. जनतेचे आर्थिक शोषण होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून सशक्त सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचे आवाहन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. भांडवलशाही आणि माणसा माणसांमध्ये भेद करणारी प्रवृत्ती सामाजिक लोकशाही करिता घातक आहे. परिषदेचे उद्घाटन श्रीमती संध्या चिवंडे अधीक्षक अभियंता महावितरण यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. टी. डी. कोसे यांनी केले तर प्रस्ताविक इंजिनिअर किशोर सवाने व आभार राजेश वनकर यांनी केले. परिषदेचे अध्यक्षस्थानी दिलीप वावरे उपस्थित होते. स्वागताध्यक्ष बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे, इंजिनीयर चेतन उंदीरवाडे, डॉ. विवेक बांबोडे, डॉ. कपिल गेडाम, डॉ. प्रवीण डोंगरे, इंजिनीयर यशवंत बर्डे, शीलवान डोके, राजूभाऊ खोब्रागडे, एड. पूनमचंद वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक परिषदेला चंद्रपूर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संजय खोब्रागडे, प्रा. मनोज निरंजने, देवानंद , आवाज इंडिया टीव्हीचे धर्मेश निकोसे, आदींनी सहकार्य केले.