कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारताचे सृजनशील कलाकार घडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या बालसाहित्य कलामंचच्या मदतीसाठी निर्मिती फिल्म क्लब, निर्मित सामाजिक प्रबोधनपर क्रांती गीतांचा संगीतमय “अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!” हा बहारदार कार्यक्रम सोमवार दि. 2 सप्टेंबर, 2024 रोजी सायं. 5:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अंतिमा कोल्हापूरकर आणि आदित्य म्हमाने यांनी दिली.
सदर कार्यक्रमाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्माते अनिल म्हमाने तर संगीत संयोजन महेश सोनुले, विश्वनाथ कांबळे यांचे असून आदित्य म्हमाने, स्नेहा कांबळे, दीक्षा तरटे, नमिता धनवडे, तक्ष उराडे, वैभवी कांबळे, मंथन जगताप, लक्ष्मी पासवान, सई तरटे, गायत्री कांबळे, निवेदिता तरटे, ओम कांबळे या गायकांचा यात महत्वाचा सहभाग आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमहापौर भूपाल शेटे, लातूरचे ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांच्या हस्ते होणार असून हिंदुराव हुजरे-पाटील, ॲड. मंचकराव डोणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सोशल फौंडेशन, दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती विचारमंचचे असून प्रा. शहाजी कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, बाबासाहेब कामत, डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, रुपाताई वायदंडे, विश्वास तरटे, अश्वजीत तरटे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
सदर कार्यक्रमातून जमा होणारी रक्कम भारताचे सृजनशील नागरिक घडवण्यासाठी काम करणाऱ्या बालसाहित्य कलामंचच्या कृतीशील उपक्रमाच्या मदतीसाठी दिली जाणार असून जनतेने जमेल तेवढे अर्थसहाय्य करावे किंवा अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूरकरांनी अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंथन जगताप आणि दीक्षा तरटे यांनी केले आहे.