मोर्शी तालुका प्रतिनिधी /
विदर्भाच्या कॅलिफोर्नियात मोर्शी तालुक्यातील दापोरी परिसरामध्ये ठाणाठुनी येथे १०० एकरा पेक्षा अधिक जमिनीवर मागील ८ वर्षापासून काम सुरू असलेला जैन ईरिगेशन, कोकाकोला व शासन उपकृत असलेला संत्रा उन्नती प्रकल्प नव्याने उदयास येणारा संत्रा उन्नती प्रकल्प हा संत्रा उत्पादक शेतक-यांसाठी उन्नतीची पर्वणी कधी ठरणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादकांसाठी संत्रा प्रक्रिया उद्याेगांचा अभाव, घटलेली संत्राची मागणी आणि बांगलादेशच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. बांगलादेशने संत्र्यावर आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे निर्यात घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्र हा संत्रा उत्पादक देश आहे. येथे संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बांगलादेशच्या या धोरणामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बाजारात वाढलेली आवक यामुळे अंबिया बहाराच्या संत्र्याचे दर काेसळले आहेत. दापोरी हीवरखेड परिसरामध्ये मागील ८ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प रखडल्याने, ही स्थिती उदभवल्याचे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.
मुळात विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्याेगाचा अभाव आहे. बाजारात मध्यम व छाेट्या आकाराच्या संत्र्यांना फारशी मागणी नाही. भाव काेसळले आहेत. विदर्भातील ‘कॅलिफाेर्निया’ची वाताहत सुरूच आहे. दीड लाख हेक्टरवर लागवड असलेल्या संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी जैन फार्म फ्रेश फूड व हिंदुस्थान काेका काेला बेव्हरेजच्या भागीदारीत अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यात ठाणाठुणी येथे ‘ऑरेंज उन्नती’ प्रकल्पाची अनुक्रमे ३१ ऑगस्ट २०१६ व ३० डिसेंबर २०१६ राेजी मुहूर्तमेढ राेवल्या गेली.
या प्रकल्पांमध्ये मध्यम व छाेट्या आकाराच्या अंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचा ‘ज्यूस’ तयार करून त्याचा विविध उत्पादनांमध्ये वापर तसेच काही स्वतंत्र उत्पादने केली जाणार असल्याचे संत्रा उत्पादकांना सांगण्यात आले हाेते. परंतु ८ वर्षात संत्रा उन्नती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित हाेणे अपेक्षित असतांना त्यांचे काम तसूभरही पुढे सरकले नाही.
जैन फार्म फ्रेश फूड व हिंदुस्थान काेका काेला बेव्हरेजने ठाणाठुणी येथे केवळ ‘नर्सरी’ तयार केली असून, त्यांनी शेतकऱ्यांना संत्र्याची प्रति कलम २५० रुपयाप्रमाणे ‘व्हॅलेन्सिया’ जातीच्या कलमा विकल्या आहेत. त्या झाडांना फलधारणा व्हायला सुरुवात झाली असून, ‘व्हॅलेन्सिया’ जातीचा संत्राही कुणी खरेदी करायला तयार नाही. मध्यम व छाेट्या आकाराचा संत्रा ही माेठी समस्या आहे. हे दाेन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले असते, तर ती समस्या सुटली असती विश्वास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून शासनाने हिवरखेड दापोरी परिसरातील जैन फार्म फ्रेश संत्रा उन्नती प्रकल्पाचे काम युद्धस्तरावर सुरू करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
दापोरी परिसरातील ठाणाठूनी येथील संत्रा उन्नती प्रकल्प तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. ८ वर्षा आधी संत्रा उन्नती प्रकल्प उभारतांना मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांनी केलेल्या घाेषणा हवेत विरल्या आहेत. यामध्ये सरकारने कंपन्यांना अप्रत्यक्ष मदत केली आहे. त्यामुळे ते पूर्ण करण्याची ‘डेडलाईन’ सरकारने द्यायला हवी हाेती. सर्वपक्षीय नेत्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या विषयात राजकारणाचा विषय न करता एकत्र येऊन संत्रा प्रकिया प्रकल्पाची समस्या साेडवायला हवी. — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.