Home चंद्रपूर . हि. विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ...

. हि. विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वेळेचे महत्व जाणतो तोच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतो-पी.एस.आय. डिसेंबर दिवटे

531

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

 

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बल्लारपूर (माल) या छोट्याशा गावी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. परिस्थितीचा अधिक विचार न करता शालेय जीवनापासूनच मनात अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले व अभ्यासाला सुरुवात केली. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असतांना 2017 मध्ये मोठा अपघात झाला आणि पी.एस.आय. पदाचे स्वप्न अधुरे राहणार की काय असं वाटत होतं, परंतु अंतर्मनातील जिद्द आणि पी.एस.आय. होण्याचे स्वप्न मला स्वस्थ बसू देत नव्हते आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर अपयशावर मात करत एम.पी.एस.सी. मार्फत पी.एस.आय. पदाला गवसणी घालू शकलो. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पुणे, मुंबई सारख्या महानगरात कोचिंग क्लासेस लावण्याची गरज नसून स्वतःवर विश्वास ठेवणे व वेळेचे महत्व ओळखणे हे सर्वात महत्वाचे आहे. वेळेचे महत्त्व जो जाणतो तोच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतो. विद्यार्थ्यांनी वेळेचे काटेकोरपणे पालन करून अभ्यासाचे नियोजन करावे. कुठल्याही परिस्थितीचा बाऊ न करता आणि पराभवाने खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवावे. या मार्गाने निश्चितपणे यशशिखर गाठता येते.” असे प्रतिपादन पी.एस.आय. डिसेंबर दिवटे यांनी केले.
ते नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे ‘अधिकारी आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित होणाऱ्या परीक्षा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व मूल्यमापन पद्धती, मुलाखतीत आत्मविश्वासाचे महत्व इ. बाबींवर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांनी अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने मार्गक्रमण करावे अशी आशा व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य के.एम.नाईक, प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक ए. डब्ल्यू. नाकाडे तथा मार्गदर्शक विवेक खरवडे इन्स्पायर करिअर अकॅडमी, ब्रह्मपुरी हे उपस्थित होते. याप्रसंगी पी.एस.आय. डिसेंबर दिवटे यांचा मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

दुसरे मार्गदर्शक विवेक खरवडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना, ग्रामीण विद्यार्थ्यांनी पी.एस.आय. दिवटे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घ्यावी व आपले ध्येय निश्चित करावे आणि स्वतःवर विश्वास ठेवून अथक परिश्रमाने स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे” असे मत मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. डब्लू. नाकाडे यांनी करतांना, विद्यार्थ्यांना ‘अधिकारी आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाचे महत्व समजून सांगितले. पी.एस.आय. डिसेंबर दिवटे यांचे कौतुक करतांना मान्यवरांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून भविष्यात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी बनतील असा आशावाद व्यक्त केला.

प्राचार्य के.एम.नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात, पी.एस.आय. डिसेंबर दिवटे यांचे कौतूक केले आणि “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करावा व त्यादृष्टीने पाऊल टाकावे आणि यश संपादन करावे. आपण विद्यालयात सुरू केलेल्या ‘अधिकारी आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व आपले वक्तिमत्व घडवावे” असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. एन. बेंदेवार ,तर अतिथींचे आभार लक्ष्मण मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here