वरूड तालुका प्रतिनिधी / विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्याला ओळख आहे. मात्र, सध्या संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा बगीच्यात जाऊन संत्रा पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. तसेच कृषी अधिकाऱ्यांकडून त्यांनी संत्रा गळतीची कारणे जाणून घेतली.
शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेत त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आदेश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले आहेत. संत्राच्या नुकसान भरपाईत शासनाकडून मिळणारी रक्कम कमी आहे. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वाढीव मोबदल्याची मागणी देखील करणार असल्याचे यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
वरूड मोर्शी तालुक्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे मतदार संघातील संत्रा पिकाची मोठया प्रमाणात गळती सुरु आहे तसेच इतर पिकांचे सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी संत्रा गळतीवर उपाययोजना करून संत्रा पिकाची गळती थांबविण्यासाठी शेतकरी बांधव आणि कृषि विभाग अधिकारी यांच्यासह प्रत्यक्षात पाहणी केली.
मागील काही दिवस संततधार आलेल्या रिमझिम पावसाने संत्रा पिकाला ग्रासलं आहे. विविध रोगांचा प्रादुर्भाव हा संत्रा झाडांवर झाल्याने त्याचा परिणाम हा संत्राच्या फळावर झाला आहे .त्यामुळे जिल्ह्यातील संत्राच्या बगीच्याना मोठ्या प्रमाणावर गळती लागली असल्याने संत्रे जमिनीवर पडत आहे. यामुळे अमरावतीतील मोर्शी, वरुड तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विविध खासगी कंपनीच्या सल्ल्याने या रोगांवर उपाय योजना केल्या जात असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची हजारो रुपयांची औषध फवारणी व ड्रेंचिंग केले जात असून त्यांची आर्थिक पिळवणूक होतांना दिसत आहे त्यामुळे संशोधकांनी प्रथम या रोगावर संशोधन करून योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी कृषी विभागाला दिले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, डॉ.राजेंद्र वानखडे सहायक प्राध्यापक फलोत्पादन शाखा फळ संशोधन केंद्र अचलपूर, उज्वल आगरकर कृषि उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अमरावती, प्रफुल्ल सातव उपविभागीय कृषि अधिकारी मोर्शी, अतुल आगरकर तालुका कृषि अधिकारी वरूड यांच्यासह शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.