Home चंद्रपूर शहिदांच्या स्मृती जपत ‘विकसित भारत, मजबूत भारत’ हेच आमचे स्वप्न:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

शहिदांच्या स्मृती जपत ‘विकसित भारत, मजबूत भारत’ हेच आमचे स्वप्न:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूर शहीद स्मृती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

721

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०

चिमूर -दि.16 ऑगस्ट ): चिमूर ही शहिदांची भूमी आहे. देशाच्या इतिहासात चिमूर आणि आष्टीच्या क्रांतीची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या 5 वर्षाआधीच चिमूर मध्ये तिरंगा फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाले. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात चिमूर मध्ये क्रांतीचे स्फुरण चढले, या स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाला कळले पाहिजे. भविष्यासाठी हा अनमोल ठेवा जतन करून ठेवत असतानाच “विकसित भारत आणि मजबूत भारत”  हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारची वाटचाल सुरू असून समाजाच्या प्रत्येक घटकामागे सरकार भक्कमपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


16 ऑगस्ट चिमूर शहीद स्मृती दिनानिमित्त चिमूर येथे हुतात्मा स्मारक तसेच शहिदांना अभिवादन करताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, मितेश भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, प्रा. अतुल देशकर, प्रकाश देवतळे, माजी आमदार डाँ. नामदेवराव उसेडी, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी गमे,प्रकाश वाघ यांच्यासह स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य सरकार दीन, दलित, आदिवासी, शेतकरी अल्पसंख्यांक, महिला तसेच सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तनासाठी काम करत आहे. या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी विदर्भात सर्वाधिक विकास निधी चिमूर मतदार संघासाठी खेचून आणला आहे. रस्ते, सिंचन, पिक विमा ही सर्व कामे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमदार बंटी भांगडिया यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. शेवटी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन, म्हणजेच खरा विकास होय, या सूत्रानुसार राज्य सरकार काम करीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. गरीबी संपेल तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होईल.

पुढे ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांकरिता अनेक चांगले निर्णय घेतले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार पुढील आठवड्यापासून देण्यात येणार आहे. ई पिक पाहणीत  नाव नसले तरी  सातबाराच्या नोंदीनुसार पैसे मिळणार आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. चिमूर तालुक्यात आतापर्यंत पिक विमा योजनेचे 30 कोटी रुपये जमा झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे आहे.

शेतकऱ्यांचे विजेचे बिल आता सरकार भरणार असून शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस 12 तास मोफत वीज मिळेल. केंद्र आणि राज्य सरकारने गोसीखुर्द प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. 125 किलोमीटर सिंचनाचे पाणी पोहोचत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले.

आमच्या सरकारने स्त्रियांसाठी सर्वात जास्त योजना सुरू केल्या असून महिलांना एस.टी.मध्ये 50 टक्के प्रवास सवलत, तसेच लेक लाडकी योजनेतून 18 व्या वर्षी मुलीच्या खात्यात 1 लक्ष रुपये जमा करण्यात येत आहे. मुलींसाठी व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करणे सुरू झाले आहे .17 ऑगस्ट पर्यंत राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसा जमा झालेला असेल. एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून तरुणांकरिता प्रशिक्षण देण्यात येत असून राज्यातील 10 लाख तरुणांना अप्रेंटीशीपच्या माध्यमातून नोकरी मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार बंटी भांगडिया म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिमूर शहीद दिनी या शहिदांच्या भूमीत आले यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तरुण पिढीला शहिदांचा इतिहास माहित झाला पाहिजे, त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिमुरचे अनेक प्रश्न मी सातत्याने मांडत आलो आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले आहे. चिमूर येथील रस्त्यांच्या विकासासाठी 117 कोटी, नागभीड येथे रस्ते आणि नाल्या बांधकामाकरिता 62 कोटी रुपये तसेच चिमूर आणि नागभिड मध्ये संत जगनाडे महाराज सभागृहासाठी प्रत्येकी सहा कोटी रुपये, रेल्वेच्या भूसंपादनासाठी 77 कोटी रुपये अशा अनेक विकास कामांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे,  असे आमदार बंटी भांगडिया म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.

 

*या कामांचे झाले ऑनलाइन भूमिपूजन*

 

चिमूर व नागभीड तालुक्यात विविध 39 कामांचे (अंदाजीत किंमत 438.239 कोटी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात
1.चिमूर तालुक्यातील 29 तलाठी कार्यालयाचे बांधकाम (4.35 कोटी)
2.नागभीड तालुक्यातील 23 तलाठी कार्यालयाचे बांधकाम (3.60 कोटी)
3.चिमूर येथे उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय बांधकाम (3.50 कोटी)
4.चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयाची दुरुस्ती व सुधारणा (5.98 कोटी)
5.नागभीड तालुक्यात शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम (5.77 कोटी)
6.चिमूर आणि नागभीड तालुक्यातीत विविध रस्त्यांचे रुंदीकरणासह सुधारणा  (एकत्रित किंमत जवळपास 70 कोटी) याशिवाय इतरही कामांचा भुमिपूजनमध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here