रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- महाराष्ट्रात माळी समाज एकून लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असून चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत राजुरा चौथा, बल्लारपूर 1 ला, चंद्रपूर 3 रा,चिमूर 3 रा, व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3 ऱ्या क्रमांकवर आहे. जिल्ह्यात हा समाज फारमोठ्या संख्येने असून सुद्धा पैसा, राजकीय महत्त्वाकांक्षा व डावपेचा अभावी वर्षानुवर्षे राजकीय पक्षांचा वेठबिगार म्हणून जगत राहिला आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षासाठी हा समाज कधीही दखलपात्र ठरू शकला नाही. तात्पर्य समाजाची ही कमजोरी ओळखुन काँग्रेस- भाजपा सारख्या राजकीय पक्ष व नेत्यांनी आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी आजपर्यंत या समाजाचा गैरवापर करून घेतला. ही बाब जेव्हा समाजातील उच्चविद्याप्राप्त व उच्चपदस्थ समाज कार्यकर्त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी राजकीय पक्षांकडून समाजाचे होणारे शोषण व दिशाभूल थांबविण्याचा व उच्च विद्याप्राप्त नेते विधानसभेत पाठविण्याबाबत विचारमंथन करण्यासाठी माळी समाज समन्वय समितीच्या वतीने रविवार दि. 11 ऑगस्टला ब्रह्मपुरी येथे सभेचे आयोजन केले होते.
सदर सभा ने.ही काॅलेजचे से.नि. प्राचार्य डॉ. एन एस कोकोडे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष से.नि. प्रा.नामदेवराव जेंगठे, अभा माळीमहासंघाचे जिल्हा संघटक से.नि.प्राचार्य सोनुले सिंदेवाही, म.फुले वाचनालयाचे संस्थापक व समाजाचे सल्लागार दिनकरराव मोहुर्ले सावली, तालुका भाजपचे अध्यक्ष से.नि. प्राचार्य अरुण शेंडे व तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष मंगलाताई लोनबले यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. तत्पुर्वी प्रा.जेंगठे सरांनी आपल्या प्रास्ताविकात सभेचा उद्देश सांगून जातगणनेच्या प्रश्नासाठी ब्रह्मपुरी विधानसभेतून अभ्यासू ओबीसी नेतृत्वाला संधि मिळावी म्हणून ब्रम्हपुरी-सिंदेवाही- सावली तालुक्यातील संपूर्ण समाजाने सामाजिक- राजकीय एकजूट दाखवून प्रस्थापित अल्पसंख्यांक नेत्यांना धडा शिकवावा असे आवाहन केले.
याप्रसंगी प्राचार्य शेंडे सर मेंडकी, प्राचार्य सोनुले सर सिंदेवाही, दिनकरराव मोहुर्ले सावली, सिंदेवाही ता. युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय पेटकुले, नगरसेविका साधनाताई वाढई,सावली महिला काॅंग्रेस अध्यक्ष शिलाताई गुरनुले, नगरसेविका शारदा गुरनुले, भारती चौधरी,मंगलाताई लोनबले, प्रा.राहुल मोहुर्ले यांनी आपले विचार मांडले. विशेष म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांकडून समाजाला वर्षानुवर्षे डावलले जात असल्यामुळे आजपर्यंत समाजातून प्रभावी असे राजकीय नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही याची खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या विविध योजना, खासदार- आमदार निधी व जि.प. विकास फंडाच्या लाभापासून य समाजाला आजपर्यंत हेतुपुरस्पर वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांविरुद्ध अत्यंत कडवट भावना या समाजात पसरल्या असून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापित नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार व यासाठी समाजातीलच नेत्याला उमेदवार घोषित करण्यावर उपस्थित सर्व समाज बांधवांचे एकमत झाले. यासाठी प्रत्येक तालुक्यातील समाज बांधवांनी आपापल्या स्तरावर प्रचाराची जबाबदारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर बैठकीत संभाव्य नावावर चर्चा झाली असली तरी त्यातून एक नाव निश्चित करून लवकरच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याचे एकमताने ठरले. यावेळी अभा माळीमहासंघाचे जिल्हा सचिव तथा जो.सा. नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक शेंडे यांनी संपूर्ण सभेचे संचालन केले. सभेत ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदरावजी लांजेवार, दिलीप लोनबले, सचिन गुरनुले,प्रकाश लांजेवार, रामप्रकाश देशकर, निलेश गुरनुले, वैभव रासेकार, आकाश खंडाळकर, विलास लेनगुरे, भोगेश्वर मोहुर्ले, प्रा. पंकज बेंदेवार, प्रा. अमोल मोहुर्ले, वैभव लोथे आदी शेकडो कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.