Home महाराष्ट्र कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे बोधवाक्य आता ‘अत्त दीप भव’-बोधवाक्य सूचक ‘प्रा.डॉ.सुभाष वाघमारे...

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे बोधवाक्य आता ‘अत्त दीप भव’-बोधवाक्य सूचक ‘प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा विद्यार्थी मेळाव्यात सन्मान

120

 

सातारा (प्रतिनिधी) : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये दिनांक २७ जुलै २०२४ रोजी माजी विद्यार्थी मेळावा नुकताच घेण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सुचवले व ते विद्यापीठ नियामक मंडळाने मान्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे हस्ते ग्रंथभेट व गुलाब फुल देऊन करण्यात आला. यावेळी संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सचिव विकास देशमुख ,सहसचिव बी.एन.पवार, प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, माजी विद्यार्थी संघाचे प्राचार्य शहाजी डोंगरे, प्रा.एम.एस शिंदे, प्रा. डॉ. अभिमान निमसे, कॅप्टन प्रल्हाद गायकवाड, श्री.पुनाप्पा वाघमारे, प्राचार्य सांगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

२७ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापिठाची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या तिन्ही कॉलेजचे मिळून समूह विद्यापीठ निर्माण झाले. नवीन विद्यापीठ झाल्याने विद्यापीठाचे बोधचिन्ह काय असावे या बाबत विद्यापीठाकडून विविध प्राध्यापक, शिक्षक, रयतसेवक यांचेकडून कल्पना व बोधवाकये मागवण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी बोधवाक्ये सुचवली त्यात मराठी, संस्कृत इत्यादी भाषेत बोधवाक्याचा समावेश होता. छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी विद्यार्थी व सध्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख असलेले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी पाली भाषेतील ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य सुचवले होते. तथागत गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना ‘अत्त दीप भव‘ म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा ‘हा संदेश दिला होता. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या वाक्याशी सुसंगत व रयतच्या विचारधारा व कृतिशी सुसंगत असे हेच वाक्य असल्याचे कळवले होते. ते मान्य झाल्यानंतर विद्यापीठाने त्यांना पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले होते. सुभाष वाघमारे हे छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याचे औचित्य साधून त्यांचा माजी विद्यार्थी संघाने प्रथमच सन्मान केला.
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील ,माळशिरस तालुक्यातील मळोली. या गावातून आलेले सुभाष वाघमारे १९८३ ते १९९० या काळात छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. १९९० ला एम.ए. ला मराठी विषयात त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी रयतच्या ‘पनवेल, फुंडे, कर्जत, माढा, मंचर, लोणंद, पाचवड येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. ३४ वर्षे त्यांची सेवा झाली आहे. अलीकडे त्यांच्या ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ व ‘मी भारतीय’ या कविता संग्रहास अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने त्यांनी गावी समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था सुरु करून अनेक विद्यार्थ्यांचे हिताची कामे केली आहेत. माजी विद्यार्थी मेळाव्यात सन्मान केल्याबद्दल अनेकांनी त्यांना भेटून अभिनंदन केले.

प्रस्तुत प्रतिनिधीनी प्रा. डॉ.सुभाष वाघमारे यांना ‘अत्त दीप भव’ या बोधवाक्याचा संदर्भ विचारला असता वाघमारे म्हणाले की ‘बुद्धविचार भौतिक जगाचा विचार करतो. जन्म ते मृत्यू या काळातील जीवन कसे जगावे या बाबत मध्यम मार्ग बुद्धांनी सांगितला. यथार्थ ज्ञान मिळवणे, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, पंचशील तत्वांचा उद्दात्त विचार, मनाची एकाग्रता, प्रज्ञा म्हणजे विवेक, अनित्यबोध, सकारात्मक दृष्टीकोन ,श्रमाला महत्व, अर्थ विचार, मध्यम मार्ग, सम्यक आजीविका, कुशल कर्मे करण्यासाठीची प्रेरणा, व्यापक दृष्टीकोन, मनुष्याचा उत्कर्ष करण्याचा विचार, शिक्षणातील करुणाशीलता, सदाचाराचे पालन, समता, बंधुता तत्वाचा प्रसार, बहुजन हिताय ,बहुजन सुखाय हा भवतु सब्ब मंगलम चा विचार ‘अत्त दीप भव’ संकल्पनेत अध्याहत असल्याने हे वाक्य ‘स्वतःच स्वतःचा दीप हो’ असा संदेश देते. आत्मनिर्भर व सदाचारी उन्नत जीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळते. या बोधवाक्याचा शोध घ्यायला जो जाईल तो शीलवान, प्रज्ञावान होईल. जगण्याची सार्थकता काय याचे मार्गदर्शन या बोधवाक्यात आहे. विद्यापीठाने हे बोधवाक्य स्वीकारले हीच देशातील आणि जगातील अतिशय महत्वाची घटना आहे. द्रष्टेपणाने घेतलेला या निर्णयाबद्दल सर्वांनी विद्यापीठाचे कृतद्न्य असले पाहिजे असे ते म्हणाले. कर्मवीर स्वतः ‘अत्त दीप भव’ म्हणजे स्वयंदीप झाले. बहुजन हिताय असे शिक्षणाचे उत्तुंग कार्य त्यांनी केले आणि विद्यार्थ्यांना त्यांनी स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग दाखवला त्यांचे जीवन मध्यम मार्गी होते. ते दीपस्तंभ आहेत. हे बोधवाक्य सर्वकाळ जगाला प्रेरणादायी आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here