रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर, दि. 22 : गत दोन दिवसात चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. प्रादेशिक हवामान खात्याने अजूनही जिल्ह्याला अतिवृष्टी व सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासन पूर पीडितांच्या मदतीसाठी तत्पर असून तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणेने पूरबाधित गावांना भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी दिले.
जिल्ह्यातील पूरपरिस्थतीचा आढावा घेण्यासाठी वीस कलमी सभागृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अजूनही काही रस्त्यांवर पुराचे पाणी वाहत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अशा रस्त्यावर वाहनांना तसेच नागरिकांना वाहतुकीस प्रतिबंध करावा. त्यासाठी आवश्यक बॅरेकेटींग करावी. पुराच्या पाण्यामुळे कोणतीही जिवीतहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील खालच्या यंत्रणेला निर्देश द्यावे. तसेच क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा जि.प.बांधकाम विभागाने डागडुजी करावी.
*कृषी विभाग :* प्राथमिक अंदाजानुसार पावसामुळे जिल्ह्यातील 778 गावे बाधित तर 11229 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतमालाचे युध्दपातळीवर पंचनामे करा. कृषी सहायक, ग्रामसेवक, तसेच गावस्तरावरील सर्व यंत्रणांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावे. तसेच जिओटॅगिंचे फोटो काढावेत.
*पाणी पुरवठा विभाग :* पूरबाधित गावांमध्ये पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच शाखा अभियंत्यांनी भेट देऊन पाणी टाकी दुरुस्ती, बोअरवेल दुरुस्ती करून घ्यावी. तसेच नागरिकांना दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचे क्लोरीनेशन करावे.
*आरोग्य विभाग :* पूरबाधित गावांमध्ये साथरोग पसरणार नाही, यासाठी आरोग्य विभागाने विशेष काळजी घ्यावी. तालुका आरोग्य अधिका-यांनी पूरबाधित गावांना भेटी देऊन विशेष शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करून घ्यावी.
*अधिकारी – कर्मचा-यांनी मुख्यालयी राहावे :* स्थानिक परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी आपापल्या मुख्यालयी राहावे. याबाबतच्या सुचना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विभागांना तातडीने द्या. तसेच ज्या गांवाना पुराचा तडाखा बसला आहे, तेथे तालुकास्तरीय सर्व विभागाच्या शासकीय यंत्रणेने पोहचून पूरपिडीतांच्या समस्या सोडवाव्यात.