Home महाराष्ट्र मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…

213

 

तू एक आस
मनातला ध्यास
जिथे उभा मी
तिथे तू श्वास…

सबंध आयुष्यात आपण अनेक नाते निर्माण करतो. काही जन्मल्याबरोबर लगेच आपोआप लागतात, तर काही जगताना वाढत जातात, तर काही आपल्याकडून जाणीवपूर्वक वाढवली जातात. त्यातलचे एक नाते म्हणजे मित्राचे- मैत्रीचे! लहान असो की वयोवृध्द प्रत्येकाला एक मित्र असतो. काहींना तर खूप सारे असतात. आपण कसे वागतो यावर त्यांची संख्या ठरते. ते वागणेही मग त्या त्या हिशोबाचे असेल आणि मित्रही त्याच हिशोबाचे राहतील. मित्र म्हणजे सखा, सोबती असे समानार्थी शब्द आहेत. मित्र म्हणजे आपलासा वाटणारा, रक्ताचा नसला तरी सुख दुःखे वाटून घेणारा एकमेव सोबती असतो. ज्याच्यापुढे कुठलीच लाज नसते. प्रत्येक गोष्ट सांगू शकू एवढा हक्काचा तो असतो. मित्राला ना लिंगाचे बंधन आहे ना जाती – धर्माचे, वंशाचे. जसे की अनेक स्त्री-पुरुष एकमेकांचे भिन्न लिंगी मित्र आहेतच की. त्यातही काही गोष्टींचे बंधन असू शकेल पण मैत्रीला ते कधी आड येत नाही.
मित्र म्हणजे जणू आपण स्वतः, जसा काय आपला आरसा. जसा स्वभाव, जसे वागणे, जशा सवयी आपले मित्रही बहुदा तसेच असतात. चांगल्यांना चांगले मिळतात तर वाईटांना वाईट. कारण मैत्री तेव्हाच होते जेव्हा मित्रांची मते जुळतात. मते जुळले की मनेही आपोआप जुळतात. त्यामुळे अभ्यासू लोकं अभ्यासूंच्या सहवासात असतात तर व्यसनी व्यसनीजणांच्या. असे नाही की यामध्ये ढवळा ढवळ होत नाही. अर्थात मैत्री अगोदर एक जग आहे- ‘गरजांचे’. त्या पूर्ण करायच्या म्हणजे न आवडणाऱ्याशीही जुळवून घ्यावे लागते. जसे की एकत्र काम करणारे सहकारी. जे सोबत राहून बऱ्यापैकी एकमेकांना जाणतात. जिथे बऱ्याच गोष्टींचे अदान- प्रदान होत असते. काहीजण इथे पक्क्याने विसावतात तर काहीजण कामापुरते. जे कामापुरते असतात ती सहवास संपला की नातेही संपवतात. आता हेच पहा, आपल्या कॉलेज जीवनात बरेच मित्र होते त्यातले तुम्हाला किती आठवतात आणि आता किती संपर्कात आहेत. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की, ‘’ हा माझा बालमित्र आहे.” जो आता तेवढेच सांगण्यापुरताच राहिला. कारण जुळवून घ्यावे असे आचरण दोघातही उरलेले नसते. दोघांचा पेशा हा वेगवेगळा झालेला असतो तिथे बालमित्राची गरज व उणीव जाणवत नाही. मुले मुलींपेक्षा या नात्यात थोडी स्वार्थीच असतात. कारण मुली तरी मैत्रिणींना कधी विसरत नाहीत. त्यांच्याकडे बाल मैत्रिणींपासून ते कॉलेजपर्यंतच्या सोबतीनींचे काँटॅक्टस् अजूनही आहेत. ज्या त्यांना कालांतराने बोलून मध्ये- मध्ये संपर्कात राहतात. मुले मात्र ‘गरज सरो वैद्य मरो…’
मुळात मैत्रिवरती लिहावे इतका मित्रांच्या गराड्यातला माणूस मी नाही. माझे म्हणावे असे फारच कमी जवळचे आहेत. कदाचित मी अपुरा असेल नाहीतर समोरचा. पण जे आहे त्यात मी खूष आहे. तसे पाहता माझेही मोजकेच मित्र आहेत. असे मित्र की जे मलाही त्यांचा मित्र समजतात. कारण नाते व ओढ दोन्हीकडूनही तितकीच हवे. तरीसुद्धा मला यावरती लिहायची गरज भासली कारण याच मित्रांच्या गराड्यातले अनेक माझे मित्र आहेत. जे ‘मित्र’ नावाच्या फासात अडकून राहणे पसंत करतात. त्यांचा हा ‘फास’, ‘फास’च असून मित्र नाही हे सांगण्यासाठी लिहतोय.
मैत्रीची व्याख्या खरी एक आहे आणि खोटी एक. सुरुवातीला खरी सांगतो. ‘ मित्र म्हणजे असा सोबती जो मार्गदर्शक असून मित्राचे नेहमी चांगले चिंतन करतो.’ आणि एक खोटी – ‘ मित्र म्हणजे असा सोबती जो गरजेपुरता सोबत असतो.’
मुळात या दोन्ही व्याख्या का कराव्या लागल्यात? कारण दुसरी व्याख्या सध्या खरी होवू पाहत आहे आणि पहिली व्याख्या ही पहिली आहे यातच खूष आहे. जो पहिला नंबर काठावर पास होवून पहिला असण्यात समाधानी आहे. ‘आस’ नावाच्या शब्दाची जागा ‘फास’ने घेतली आहे. शोधण्यासाठी म्हणून नाही तर जे सापडले ते आपल्यापुढे मांडायचे म्हणून. सध्याचे मैत्रीचे नातेच मुळात व्यावसायिक झाली आहे. फायदा तिथे मैत्री झाली आहे. जिथे फायदा नाही तिथे मैत्रीपण नाही. जीवाला जीव देणारे दोस्त आता कुठेच सापडत नाहीत. कारण तितके मरण्यापर्यंत जाण्याची कोणात धमक उरलेली नाही.
मित्र म्हणजे मदतीला धावून येणारा असेही आपण येतो. पण नेहमी आपणच मित्र व्हायचे सगळी जवळची माणसे, कामे सोडून त्याचे काम करायला पळत सुटायचे आणि त्याची वेळ आली की असेच काहीतरी महत्वाचे काम आले म्हणून त्याने स्तब्ध बसायचे, हे स्वार्थी नाही म्हटले तरी त्याच्यासाठी ‘हो’ आणि आपण का ‘हो’ होवू नाही. मित्र म्हणजे आतला पाझर म्हणे, पण तोही आता आटत चाललाय. आणि हे आटणे इतके भयंकर आहे की काळीजही केवळ हदय म्हणूनच धडकत आहे.
मित्राची सोबत असतानाची निंदानालस्ती समजू शकू, मित्राचे कदाचित ते वाट दाखवणे असू शकेल. पण माघाऱ्याची वाजवावाजवी केवळ भित्रे ‘शत्रूत्वच’ आहे.
व्यसनी मित्र असू शकतो पण व्यसनी करणारा नाही. त्याचे नुकसान झाले म्हणून आपलेही करावे तो मित्र कसला. तुम्ही हजार गोष्टी त्याच्याबद्दल चांगल्या सांगता पण तो एक चांगला शब्द आपल्यासाठी उच्चारत नसेल तर त्याच्यापासून दूरच रहा. माहिती लपवणारा, तुम्हालाच खोटेनाटे सांगणारा मित्र कसा असेल बरं! माघारी वाजवणारा तरी भित्रा शत्रू असेल पण पुढून विनाकारण चूक काढणारा तर खुला-खुला मित्राच्या वेशातला शत्रुची की! मित्र सुख-दुःख वाटून घेतो पण आपलेच सुख बरे न दिसणारा असेल तर हा आव्हानाच्या मार्गातला जबरदस्ती आव्हानच की!
शंभर कोरडे असण्यापेक्षा दोन चार मोकळे कधीही कामाचे. चार स्तंभातला एकही भरोशाचा नसेल तर मोडकाच पण एक विश्वासाचा असावा, जो जिंकण्याचे बळ देईल तोच मित्र सदैव आपल्या ताईत ठेवावा.
मित वणाव्यामध्ये गारवा देणारा असेल तर तुम्हीही कधीतर गारवा दिलेला असावा लागतो. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवताना स्वतः रिकामे राहणे हे कुठल्याच व्याख्येत बसणारे नाही. स्वतः ला ओळखायला जिंदगी संपते पण लोकांना ओळखायला एक क्षण पुरेसा असतो. फेसबुकवर अनोळखी चेहऱ्यांचे लोकं मित्र करताना ओळखीचे आधी ओळखा. नाहीतर गराडा करण्याच्या नादात कधी चुराडा झाला हेच कळायचे नाही.
त्यामुळे सोबत राहणे व नुसतेच गरजेपुरते एकमेकांना झेलने म्हणजे मैत्री नसते. जिथे ओलावा नसतो मुळात तिथे पाझर नसतो; आणि जिथे सगळेच आटलेले आहे तिथे जबरदस्ती मित्र शोधायचा नसतो.

तुझा चेहरा तर
माझ्यागतच आहे
मन इतके कलुषित
असेल तर,
शत्रू काय वाईट आहे ..

अमोल चंद्रशेखर भारती, नांदेड
मो. 8806721206

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here