_आजही भारतातील अनेक राज्यात प्रेमविवाहांना खुल्या मनाने स्विकार केला जात नाही. भारतात अशी अनेक कुटुंबे आहेत, जिथे आजही प्रेमविवाहास परवानगी नाहीये. अशा परिस्थितीत कुटुंबातील कोणत्या सदस्याला प्रेम झालं तर ती त्याच्यासाठी एक मोठी समस्या बनते. त्यामुळे कुटुंबीयांची परवानगी मिळवण्यासाठी येथील काही टिप्स कामी येऊ शकतात. सदर मार्गदर्शक संकलित लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी खास प्रेमवीरांना समर्पित केलाय… संपादक._
आपल्या देशात ० ते १९ वर्षांपर्यंत- जन्मापासून तर लग्नांपर्यंत आईवडील आपल्या मुलांमुलीचा जीवापाड सांभाळ करतात. त्यांना सरळ-चांगले चालणे-बोलणे, उठणे-बसणे, लिहिणे-वाचणे शिकवितात. त्यांच्यावर सुसंस्काराची उधळण करतात. एवढेच का? तर आपली मुले कुठेही मागे राहू नयेत. ती जागतिक स्पर्धेत सरस ठरावीत, त्यांच्याबद्दल कटू व बदनामीकारक शब्द ऐकू येऊ नयेत. म्हणून स्वतः ज्या चाकोरीबद्ध मर्यादेत वावरत असतात, त्याच मर्यादापूर्ण चाकोरीत वागण्यास मुलांनाही बाध्य करीत असतात. आपल्या वंगाळ व विपरीत वागणुकीने आपला आदर्श परिवार, समाज, धर्म किंवा संप्रदाय कलंकित होऊ नये. म्हणून ते कडक शिस्त लावतात. मुलांना त्यांच्या या कडक शिस्तीचाच विट येतो. कारण त्यांना स्वैर, स्वतंत्र व स्वच्छंदीवृत्तीने विनानिर्बंध वागावेसे वाटते. म्हणून ते परस्परांच्या यौनसौंदर्यावर भाळून घर सोडून घरांपासून दूर पळून जातात. त्यांना ती शिस्त व मर्यादा खूप कटकटीची व कष्टप्राय वाटल्यानेच ते असे टोकाचे पाऊल उचलतात. जगाच्या पाठीवर कोठेही पळून गेले तरी ती ब्याद काही पाठलाग सोडत नाही, हे त्यांना नंतर हळुहळू कळू लागते. ते अविचाराने व मोठ्या हिंमतीने घरून निघून जाऊ लागतात, तेव्हा भ्रम झालेला असतो की आपण कोणाच्याही मदती, सहकार्य, किंवा आधाराशिवाय सहज जगू शकतो. म्हणून ते आईवडिलाना किंवा नातलगांना न पुसता, न विचारता लग्न करतात आणि प्रपंचाच्या काटेरी पिंजऱ्यात आकंठ अडकतात. पुढे अशा आईवडिलांच्या उपकाराची, संस्काराची जाण नसलेल्या मुलांना या प्रपंचाचा काटेरी पाश सोसवत नाही आणि काही दिवसातच ते एकामेकांचा काडिमोड करून प्रेमवेलीवर फुललेले फूलही रस्त्यावर टाकून देतात. अरेरे! हे काय तुमचे माणुसकीचे जगणे झाले का? बाळांनो, जरा विचारा स्वतःलाच.
आजही भारतातील अनेक राज्यात प्रेमविवाहांना खुल्या मनाने स्विकार केला जात नाही. भारतात अशी अनेक कुटुंबे आहेत, जिथे आजही प्रेमविवाहास परवानगी नाहीये. अशा परिस्थितीत कुटुंबातील कोणत्या सदस्याला प्रेम झालं तर ती त्याच्यासाठी एक मोठी समस्या बनते. त्यामुळे कुटुंबीयांची परवानगी मिळवण्यासाठी काही टिप्स कामी येऊ शकतात. जसजशी वेळ बदलत गेली तसतसे भारतीय संस्कृतीत लग्न या विषयामध्ये अनेक बदल होत गेले. आताच्या काळात प्रेमविवाह किंवा अरेंज्ड मॅरेज दोन्हीही अगदी सामान्य झाले आहेत. पण तरीही आज अशी बरीच कुटुंबे आहेत जिथे प्रेमविवाह करण्यास परवानगी नाहीये. जर तुमच्या घरातही असे काही नियम असतील आणि तुम्ही मात्र नकळत कोणाच्या प्रेमात पडला असाल; पण तुम्हाला आई-वडिलांच्या आशीर्वादानेच लग्न करायचे असेल तर या काही खास टिप्स तुमच्या नक्की कामी येतील. या टिप्स वापरुन तुम्ही आपल्या जोडीदाराची माहिती आई-वडिलांना देऊ शकता व त्यांची परवानगी मिळवू शकता.
योग्य वेळेची निवड: जर तुम्हाला आधीच माहित असेल की ते लग्नाला विरोध करणार तर मात्र तुम्ही योग्य वेळ बघूनच हा विषय त्यांच्यासमोर काढणे उत्तम! अशा वेळेची वाट बघा जेव्हा घरातील वातावरण टेन्शन फ्री असेल आणि आई-वडिलांचा मुड देखील खूप चांगला असेल. अशी योग्य वेळ हाती लागताच बोलता बोलता त्यांना सांगा की तुम्हाला कोणीतरी आवडते आणि त्या व्यक्तीसोबतच तुम्हाला आयुष्य व्यतीत करायचे आहे.
मदत घ्या: आई-वडिलांना आपल्या प्रेमाबद्दल काही सांगण्याआधी एखाद्या अशा नातेवाईकाची मदत घ्या, ज्याचा आई-वडील खूप आदर करत असतील किंवा त्यांच्या शब्दाला घरात मान असेल. त्यांच्यासोबत मिळून ठरवा की हा विषय कसा तुम्ही आई-वडिलांसमोर मांडू शकता आणि कशी त्यांची परवानगी चुटकीसरशी मिळवू शकता. तसेच आई-वडिलांशी बोलायला जाताना या नातेवाईकालाही सोबत जरुर घेऊन जा. जेणे करुन परिस्थिती हाताबाहेर गेली अथवा पालक चिडले तर तो नातेवाईक सर्व परिस्थिती चलाखीने हाताळेल.
स्वत:ला परिपक्व सिद्ध करा: हा मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा असतो. कारण जर आईवडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असं वाटत नसेल तर ते कधीच तुम्ही घेतलेल्या निर्णयास दुजोरा देणार नाहीत. म्हणूनच आईवडिलांचा विश्वास जिंकून त्यांना हे पटवून द्या, की तुम्ही स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास समर्थ असून तुम्ही एक परिपक्व व्यक्ती आहात. त्यामुळे तुम्ही लग्नासारखा निर्णय पूर्णत्वास नेऊ शकता. तरच ते तुमचे बोलणे गांभिर्याने घेतील.
जोडीदाराची खासियत सांगा: जोडीदाराविषयी सर्व माहिती आपल्या आई-वडिलांना सांगा. करियर, नोकरीपासून तुमच्या कुटुंबासाठी ती व्यक्ती कशी योग्य आहे, हे त्यांना पटवून द्या. तसेच कधी कोणत्या संकट काळात तुमच्या जोडीदाराने तुमची सर्वोत्तम काळजी घेत साथ दिली असेल, तुम्हाला सावरले असेल, तर ते देखील आवर्जुन सांगा. कारण यामुळे आईवडिलांनाही खात्री पटेल, की तुम्ही पसंत केलेली व्यक्ती भविष्यात तुमची व्यवस्थित काळजी घेऊ शकते.
संयम ठेवा: तुम्ही सांगताक्षणी तुमचे पालक लग्नासाठी सहमती देतील, असं अजिबात नाही. त्यामुळे अशावेळी संयम ठेवणे अतिशय गरजेचं आहे. जरी त्यांनी लग्नाला नकार दिला, तरी तुम्ही शांत राहा आणि वेळोवेळी त्यांचं मत बदलले आहे का? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही आतातायीपणे आपला राग दाखवला तर आई-वडील लग्नासाठी तयार होतील देखील पण लग्नानंतर तुमच्या जोडीदाराला स्वीकारणे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसेल. लग्नाच्या मंगलाष्टकातील “सावधान!” शब्द प्रपंचात प्रवेश करतांना खरेच दक्षतेचा संकेत देतो, हे विसरून कसे चालेल, नाही का?
यात त्यांच्या मायबापांचा काहीच दोष नाही, असेही पूर्णपणे म्हणता येणार नाही. काही अंशी तरी त्यांचाही येथे दोष आहेच. आपण पुत्र-पुत्रीचे बालपणीचे रुसणे-फुगणे सावरले, त्यांचे बालहट्ट पुरविले. तसेच काहीसे कलेकलेने घेतले असते, माणुसकीच्या नात्याने त्यांना समजून जवळ केले असते; तर आज ही अशी पुत्र-पुत्री वियोगाची वेळच आली नसती. मायबाप हाच खरा घरपरिवार, समाज, धर्म, आणि संप्रदायांतील महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे आपोआपच बदनामीला खिळ बसली असती. आपल्या उपस्थितीत आणि आशीर्वादामुळे त्यांचे प्रेमविवाह अधिकच यशस्वी व शोभायमान ठरले असते, एवढे मात्र खरे हं!
!! प्रेमविवाहाच्या सर्व प्रेमवीरांना “सावधान” होण्यास्तव हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!
— श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, जि. गडचिरोली.
फक्त व्हाट्स ॲप- ९४२३७१४८८३.