Home चंद्रपूर मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत वृध्दांना मिळणार लाभ-सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत वृध्दांना मिळणार लाभ-सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन

193

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०
चंद्रपूर, दि. 9 : राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, मनस्वास्थ केंद्र, योगापचार केंद्र आदींद्वारे वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पात्र वृध्दांना लाभ मिळण्यासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज मागविण्यात येत आहे.
*योजनेचे स्वरुप* : पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता / दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपाड स्टिक, व्हील चेयर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत निधीचे वितरण ऑनलाईन पध्दतीने (महाडीबीटी) 3 हजार रुपयांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
*लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष* : 1) लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे), ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा व नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. 2) लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/ केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याच्या पुरावा सादर करू शकतात. 3) सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
4) पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात 3 हजार रुपये थेट लाभ वितरीत झाल्यावर विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करावे. तसेच संबंधित प्रमाणपत्र विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. 5) निवड/ निश्चित केलेल्या जिल्हयात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.
*उत्पन्न मर्यादा* : लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
*आवश्यक कागदपत्रे* : 1) आधार कार्ड/ मतदान कार्ड 2) राष्ट्रीयकृत बॅकेची बँक पासबुक झेरॉक्स 3)पासपोर्ट आकाराचे 2 फोटो 4) उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले) 5) उपकरण/साहित्याचे दुबार लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले)
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here