Home लेख सर्वच क्षेत्रांना प्रभावी युवा नेतृत्व बहाल! (राष्ट्रीय विद्यार्थी दिन विशेष.)

सर्वच क्षेत्रांना प्रभावी युवा नेतृत्व बहाल! (राष्ट्रीय विद्यार्थी दिन विशेष.)

74

 

_अखिल भारतीय विद्यार्थी परिषद- एबीव्हीपी ही एक राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आहे, ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली संघटना आहे. तीस लाख वीस हजाराहून जास्त सदस्य असलेली ही जगातील मोठी विद्यार्थी संघटना आहे. अ.भा.वि.प. ही उजव्या विचारश्रेणीची भारतीय विद्यार्थी संघटना असून ती रा.स्वं.संघाशी जोडलेली आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विद्यार्थी हितासाठी काम करणारी संघटना आहे. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींची ही सुंदर रोचक संकलित माहिती सदर लेखातून वाचकसेवेत समर्पित… संपादक._

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय पुनर्निर्माण, सक्षम आणि सशक्त तरुण पिढी घडवण्याच्या उदात्त ध्येयाने दि.९ जुलै १९४९ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रवास सुरू झाला. कोणत्याही संघटनेसाठी ७५व्या वर्षापर्यंत पोहोचणे ही एक अभिमानास्पद, महत्त्वाची आणि उत्सवाची घटना होय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक प्रवासात ही घटना अशा वेळी आली आहे, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी पर्व सुरू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा प्रवास देशाच्या विकासासोबतच देशासाठी समर्पित सक्षम तरुण पिढी घडवण्याचा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्वरूप ७५व्या वर्षात व्यापक आणि बहुआयामी झाले. मागील वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एकूण सदस्यता ४५ लाखांहून अधिक झाली असून, देशभरात २१ हजारांहून अधिक ठिकाणी अभाविपच्या शाखा व संपर्क केंद्र आहेत. हा केवळ आकडा नसून, विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय चारित्र्य स्पष्टपणे समोर आणून ती जागतिक स्तरावरील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असल्याचे सिद्ध करते. गेली ७४ वर्षे शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर कार्यरत असलेल्या अभाविपच्या सकारात्मक शक्तीने भारतीय शैक्षणिक परिसरांमधून राजकारण, चित्रपट, मीडिया, व्यवसाय, शिक्षण, प्रशासन आदी क्षेत्रांना प्रभावी युवा नेतृत्व दिले आहे. आज या वैविध्यपूर्ण क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती आहेत, जे विद्यार्थी जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सक्रियपणे जोडलेले आहेत.
देशातील आणीबाणीसारख्या मोठ्या संकटाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची महत्त्वाची भूमिका आणि योगदानासोबतच लहान-मोठ्या प्रमाणात अशी अनेक उदाहरणे आहेत, जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली देशातील तरुणांनी सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री राहिलेले आणि सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख असलेले सुनील आंबेकर अभाविपच्या संकल्पानिमित्त लिहितात की, ”भारत ही आमची माता आहे, आम्ही पुत्राप्रमाणे देशवासीयांची सेवा करू, या संकल्पासोबत विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली होती. विद्यार्थी परिषदेचे कार्यक्षेत्र जरी शैक्षणिक परिसर म्हणजेच कॅम्पस असले, तरी वैचारिक क्षेत्र हे शिक्षणाच्या पलीकडे जाऊन देशहिताच्या प्रत्येक मुद्द्याशी निगडित आहे.”
अगदी सन १९६१ सालपासून हजारो शिक्षण संस्थेमध्ये अभाविपच्या अनेक शाखांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसते. सन १९७०नंतर अभाविपने मोठ्याप्रमाणावर मध्यमवर्गाचे प्रश्न हाताळायला सुरुवात केली, जे इतर डाव्या पक्षांकडुन हाताळले जात होते आणि त्यामध्ये तत्कालिन सरकारची भ्रष्टाचाराबाबतची अनास्था आणि इतर मुद्यांचा सहभाग होता. जेपी.चळवळीमध्ये आणि त्याभोवतालच्या अनेक निदर्शनांमध्ये अभाविपचा सक्रिय सहभाग होता, त्यांनी त्यासाठी गुजराथ आणि बिहारमधील विद्यार्थी संघटनांबरोबर हातमिळवणी केली होती, आणिबाणीनंतर याच सगळ्या कामांमुळे अभाविपच्या सदस्य संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सन १९७४नंतर अभाविपच्या सदस्य संख्येमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आणि ती १६०,०००च्या वर पोहोचली शिवाय त्यांनी ७९० ठिकाणी आपल्या शाखासुद्धा सुरू केल्या, भारतभरातील अनेक विद्यापिठांमध्ये प्रभावी अस्तित्व निर्माण केले. हीच संख्या १९८३ दरम्यान २५०,०००च्या वर गेली आणि ११००च्यावर शाखा भारतभर उघडल्या गेल्या. सन १९९०च्या बाबरी मशिदीच्या घटनेमुळे आणि नरसिंहराव सरकारने मुक्त बाजाराचे धोरण स्वीकारल्यामुळे मोठ्याप्रमाणावर अभाविप वाढली आणि आता सन २०१६ला त्यांची सदस्य संख्या ३.१७८ लाखाच्या वर पोहोचलेली आहे. त्यामुळे ही संघटना भारतातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रवास हा भारतीय मूल्यांनी प्रेरित देशभक्त तरुणांची सक्षम पिढी घडवण्याचा प्रवास राहिला आहे. कोरोना महामारीच्या काळात, देशावर संकट आले असताना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी लोकांचे दुःख कमी करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. हे ताजे उदाहरण आहे, असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा अभाविपच्या नेतृत्वाखाली तरुणांनी एकत्र येऊन देशातील विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम पुढे आला. देशातील शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची हितचिंतक म्हणून आपली भूमिका बजावत आहे. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध शाखा पर्यावरण, सेवा, क्रीडा इत्यादी क्षेत्रातही कार्यरतअभाविपच्या सदस्य संख्येमध्ये मोठी वाढ आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपला प्रवास सतत नवनवीन विषय आणि क्षेत्रांशी जोडून ठेवला आहे, त्यामुळेच ७५व्या वर्षात पोहोचलेला हा प्रवास कुठेही खडतर किंवा स्तब्ध न राहता सतत गतिमान आणि नव्या क्षेत्रांमध्ये गुंतलेला दिसतो. एकीकडे उर्वरित विद्यार्थी संघटना मर्यादित क्षेत्रात एकाकी आंदोलनापुरत्या मर्यादित असताना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रवास केवळ आंदोलनांपुरता मर्यादित न राहता, शिस्तबद्ध सर्जनशीलतेच्या माध्यमातून तरुणांना जगाशी संबंधित विविध विषयांशी जोडणारा आणि भारतीय मूल्यांशी जोडून सतत गतिमान राहणे व अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणादायी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा शिस्तबद्ध, भारतीय-केंद्रित विचार मार्गावर गतिमानतेचा प्रवास असाच प्रवाहित राहील, जेणेकरून येणार्‍या पिढ्यांना नवीन आव्हानांना तोंड देता येईल आणि राष्ट्र पुनर्निर्माणाचे स्वप्न पूर्ण करता येईल व सक्षम नागरिक म्हणून भारतीय तरुण प्रत्येक क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची भूमिका बजावू शकतील.
!! सर्व देशवासीयांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना व राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!


– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर, गडचिरोली; जि.गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here