चिमूर( प्रतिनिधी)
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ” भारतरत्न ” प्रदान करावा व त्यांच्या संस्कारक्षम,कलोचित ग्रंथ ग्रामगीतेचे भारतातील सर्व भाषेत भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्यावतीने किंवा महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा मंडळाच्यावतीने भाषांतर करावे अशी मागणी सन २००३ ला प्रचारक राजेंद्र मोहितकर चिमूर यांनी सातत्याने केली पण गेल्या २१ वर्षात या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
या मागणीच्या संदर्भाने महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानाकडे दिल्ली येथे नेवून चर्चा करण्याचेही आश्वासन सन २००८ साली देण्यात आले.पण ते अजुनही पूर्ण होवू शकले नाही.सन २०१२ साली केंद्र सरकारच्या गृह मंञालयाने या मागणीची शिफारस पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली आहे .
यापूर्वी लोकसभा व विधानसभा अधिवेशनात अनेकदा हा प्रश्न चर्चेला आला.अनेक सामाजिक संघटना,राजकीय पक्ष,अनेक आमदार,खासदार,असंख्य गावच्या ग्रामसभा,ग्रामपंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समिती,गावोगावची श्रीगुरूदेव सेवा मंडळे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सभेने ठराव,निवेदने,पञे पाठविली आहेत.तालुका,जिल्हा स्तरावर तहसीलदार,जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळानिशी निवेदने देण्यात आलेली आहेत.लाक्षणिक उपोषणे ,मोर्चेही झालेले आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात या मागणीचे ठराव घेण्यात आले तरी सदर मागणीकडे सातत्याने २१ वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे ही तीव्र खेदाची बाब आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रचंड व प्रभावी कार्य पाहून सन १९४९ ला भारताचे प्रथम राष्ट्रपती डाॅ.राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या भाषणातून त्यांना ” राष्ट्रसंत” असे संबोधून गॊरवोद्वगार काढले.सन १९५५ साली ते भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून जपान येथे विश्वधर्म व विश्वशांती परिषदेला गेले होते.त्यांच्या भजनांचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात झाला.स्वातंञ्यपूर्व काळात सन १९४२ ला त्यांच्या प्रेरणेने विदर्भातील चिमूर,आष्टी,यावली,बेनोडा इ.गावात ऎतिहासिक क्रांती झाली.परंतू या थोर क्रांतीकारी संतास अनेक वर्षांपासून मागणी असुनही भारतरत्न मिळू शकला नाही याची खंत जनमानसात आहे.
अनेक थोरांना यापूर्वी मागणी नसतानाही भारतरत्न देण्यात आले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न का नाही? याचे सर्व गुरूदेवप्रेमी जनतेला कोडे पडले आहे.विदर्भातील लोकप्रतिनिधींनी या मागणीची दखल घेवून ती पूर्ण करणे गरजेचे आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेबरोबरच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनाही भारत सरकारने भारतरत्न दिल्यास ही पदवीच पावन होईल असे प्रचारक राजेंद्र मोहितकर चिमूर यांचे मत आहे.