(दत्ता खंदारे /प्रतिनिधी ) मुंबई -प्रगत शहरात ढोर वाडा, चांभार वाडा नावाने संबोधल्या जाणाऱ्या कक्कय्या समाजाला आजही मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले गेले. त्याच्या विकासासाठी स्वतंत्र संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ हवे, या प्रमुख मागणीसाठी वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाच्या नेतृत्वाखाली कक्कय्या समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
मंगळवारी मुंबई मराठी पत्रकारसंघात वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाचे अध्यक्ष महादेव शिंदे, सचिव यशवंत नारायणकर, रविंद्र शिंदे, सूर्यकांत इंगळे, विश्वनाथ शिंदे, बबन सोनवणे, नंदादीप शिंदे, गोविंद खरटमोल,पत्रकार दत्ता खंदारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्य सरकारने गेल्या वर्षी लिंगायत, गुरव, रामोशी, वडार या चार समाजाची महामंडळे निर्माण केली. मात्र २५ जुलै २०२३ रोजी कक्कय्या ढोर समाजासाठी स्वतंत्र महामंडळाचा प्रस्ताव आम्ही सादर केला आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर चर्चा झाली. तरी सुद्धा कक्कय्या ढोर महामंडळाच्या प्रस्तावाची दखल घेतली जात नाही.
त्यामुळे येत्या २८जून रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पाश्ववभूमीवर आझाद मैदान येथे कक्कय्या ढोर समाज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. येत्या अधिवेशात आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आगामी विधानसभेत आम्ही योग्य धडा शकवू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष महादेव शिंदे यांनी दिला आहे.-ढोर समाजाची राज्यात ३०० तालुक्यात परिस्थिती हलाखीची आहे.
वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाने राज्यात ३००हुन अधिक तालुक्यांतील कक्कय्या ढोर कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. त्याची जनगणना केली आहे. त्यानुसार राज्यात जवळपास १० लाखांपेक्षा जास्त कक्कय्या ढोर समाज आहे. मात्र त्याची स्थिती अजूनही मागास आहे. ७८ टक्के कुटुंब प्रमुख मजुरी करतात. त्याचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे. १२ टक्के कुटुंब किरकोळ फुटपाथवर व्यवसाय करतात. त्याचेही वार्षिक उत्पन्न २ लाख नाही. शिक्षण नसल्याने आरक्षणाचा लाभ नाही. अशी दारुण अवस्था कक्कय्या ढोर समाजाची असल्याचे संस्थेचे प्रवक्ते रविंद्र शिंदे यांनी सांगितले.