Home महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक क्रांतीची मशाल तेवत ठेवली : जयसिंग वाघ

राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक क्रांतीची मशाल तेवत ठेवली : जयसिंग वाघ

176

अमळनेर :- महाराष्ट्रात आधुनिक काळात महात्मा जोतिबा फुले यांनी सामाजिक क्रांतीचा पाया रचला व त्या पायावर इमारत उभारणीचे काम करून भारतात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्याचे महान ऐतिहासिक कार्य राजर्षी शाहू महाराज यांनी केले आहे , त्यांच्या कार्यामुळे मागास व अतिमागास समाज शिक्षण , नोकरी तसेच व्यवसाय आदी क्षेत्रात प्रवेश करू शकला , यातूनच सामाजिकक्रांतीची मशाल तेवत राहिली असे प्रतिपादन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
मराठा सेवा संघ व युवा कल्याण मंच तर्फे अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित शंभर व्याख्यानसत्राच्या उदघाटन समारंभात उदघाटक म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की शाहू महाराज यांनी समता , स्वातंत्र्य , बंधुता , न्याय या तत्वांनी राज्यकारभार केला . सर्वांना सक्तीचे शिक्षण सुरू केले , रोजगारनिर्मितीची साधनं मोठ्याप्रमाणात निर्माण करून मागास तसेच अतिमागास समाजास प्राधान्य देवून त्यांचे जीवनमान उंचावले . आज महाराष्ट्र ‘ फुले , शाहू , आंबेडकरांचा महाराष्ट्र ‘ म्हणून ओळखला जातो त्या मागं या महापुरुषांचा त्याग आहे तो त्याग आजचे राजकारणी विसरले असून फुले , शाहू , आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख धूसर होत चालली आहे हे समस्त बहुजन जनतेने लक्षात घ्यावे असेही वाघ यांनी स्पष्ट केले .
प्रा. डॉ. संदीप नेरकर हे या प्रसंगी मुख्यवक्ता म्हणून हजर होते त्यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेली बहुजनोध्दाराची हाक , बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता ब्रिटिश सरकार समवेत केलेली बोलणी , आधुनिक शिक्षण , कोल्हापूर राज्यास केलेले सुजलाम , सुफलाम आपण समजून घ्यावे . त्यांच्या विचारांची व कार्याची आजही उपयुक्तता असून आपण शाहू महाराजांचे वारस आहोत ही जाण प्रत्येकाने ठेवावी असे विचार व्यक्त केले .
प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी शाहू महाराजांची ओळख महाराष्ट्रास कशी लाभली , महाराष्ट्राची सामाजिक , धार्मिक ओळख कशी बदलली , स्त्रियांचा त्यांनी कसा सन्मान केला या विषयी सविस्तर माहिती दिली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी १०० व्याख्यान सत्राचे संयोजक तथा प्रसिध्द समाज सेवक प्रा. अशोक पवार होते . त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आपले महापुरुष सहज सोप्या भाषेत समजतील अश्या भाषणांचे , लहान लहान पुस्तिकांचे वाटप करण्याचे , पुस्तिकांचे प्रकाशन करण्याचे आम्ही दोन वर्षांपासून आयोजन करीत आहोत , आता तर खुद्द विद्यार्थीच वक्ते झाले आहेत या मुळे शंभर भाषणांचे आयोजन करणे खूप सोपे झाले आहे . महात्मा फुले , शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार व कार्य या माध्यमातून घरोघरी पोहचण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन केले.
सुरवातीस राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जयसिंग वाघ यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे , प्रा. डॉ. राहुल निकम , प्रा. सोपान भवरे , प्रा . डी. एल. पाटील , प्रा. अजय भामरे , प्रा . अर्जुन देशमुख आदींसह विद्यार्थी , सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्यासंख्येने हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here