_महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संतांपैकी एक गुरू होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर महाराज होत._
महान संतश्रेष्ठ कबीर महाराज म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाजसुधारक होते. संत कबीर भारतीय भूमीमध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संतांपैकी एक गुरू होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर साहेब! त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे कबीर के दोहे युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, असे वाटते. उपदेशपर सहज सोप्या शब्दांतील काही दोहे अभ्यासुया…
“कबीर घास नींदिये, जो पाऊँ तलि होइ।
उडि पडै जब आँख में, बरी दुहेली होइ।।”
संत कबीरजी या दोह्यात म्हणतात, कुणालाही छोटे लेखू नये. पायाखालचे गवतही जेव्हा डोळ्यात पडते तेव्हा खूप त्रास होतो.
“साई इतना दीजिये, जामै कुुटुंब समाय।
मैं भी भूखा ना रहूं, साधु न भूखा जाय।।”
या ओवीत कबीर थोड्यामध्ये सुखी राहण्याचा उपदेश देतात. हे ईश्वरा मला इतकेच दे की ज्याने माझ्या कुटुंबाला पुरेसे असेल आणि कधी कुणी पाहुणा घरात आला तर त्याचे अगत्यही करता येईल.
“हीरा तहां न खोलिये, जहँ खोटी है हाटि।
कसकरि बांधो गठरी, उठि करि चलै बाटि।।”
या दोह्यात योग्य जागेवर ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. ज्ञान हे हिऱ्यासारखे असते. जिथे प्रामाणिक लोक नसतील तिथे हिऱ्याची थैली उघडूच नये. उलट तिला आणखी घट्ट बांधून लवकरच त्या जागेवरून चालते व्हावे.
“सब काहू का लीजिए, सांचा सबद निहार।
पच्छपात ना कीजिये, या कहे कबीर विचार।।”
सत्याची महती या दोह्यातून कबीर सांगतात, सत्य कुठेही मिळाले तर ते निसंकोच भावाने ग्रहण करा. सत्याचा स्वीकार करताना भेदाभेदाचा विचार मनात येऊ देऊ नका. विचार करायची गरज नाही. अत्यंत विचारपूर्वक हा संदेश त्यांनी दिला आहे.
काशी क्षेत्रात राहणाऱ्या एका मुसलमान जोडप्यास समुद्राच्या लाटांवर मिळालेल्या पेटीत सापडलेले मुल म्हणजे संत कबीरदास होत. त्या मुलाचे नाम ठेवण्यासाठी निरूने मौलवीना बोलवले, तेव्हा ज्या ज्या वेळेस कुराण शरीफ उघडून पहिले, त्या त्या वेळेस कुराण शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ होतो सर्वज्ञ- सबसे बडा. हे नाव ठेवण्याची मौलवीची मुळीच इच्छा नव्हती. पण इच्छा नसतांनाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले आणि पुढे ते बालक महान कवी व संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले. निरु व निमा या जोडप्यास एकही मुल नव्हते. म्हणून त्यांनीच त्यांचा सांभाळ केला. पुढे कबीरदास मोठे झाल्यावर विणकाम करू लागले. काम करीत असताना ते देवाची भक्ती करीत असत. भजने, दोहे गात असत. देवावर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. एकदा त्यांना गिऱ्हाईक लवकर मिळेना, त्यावेळी एक भिकारी त्यांना वस्त्र नसल्यामुळे शालू मागत होता. संत कबीरांनी विणलेला शालू जो बाजारात विकायला न्यायचा होता, तो शालू भिकाऱ्याला देऊन टाकला. संत कबिरांना गुरु कोणाला म्हणावे, ते समजत नव्हते. नंतर ते काशीमध्ये आलेल्या साधू रामानंदांचे शिष्य बनले. पुढे ते रामानंदांच्या संगतीत राहिले. मुसलमान व हिंदुना रहिम व राम ऐक्याची भावना प्रकट केली व उपदेश करीत करीत ते भारतभर फिरले. त्यांचे दोहे अतिशय उच्च प्रतीचे होते. समाजाला समजेल अशा शब्दात त्यांनी उपदेश केला. देवाची आराधना आपल्या मार्गाने दुसऱ्याला त्रास न देत करावी, देव एकच आहे, असे ते सांगत. त्यांच्या एका दोह्यात म्हटले आहे कि-
“सहज मिले ओ पाणी है भाई।
मांगनेसे मिले ओ दुध है।
खींच के ले तो खून है।।”
अशा परखड शब्दात आपला उपदेश त्यांनी जनतेला दिला. भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता, याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. संत कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी संत कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते.
संतश्रेष्ठ कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप विठ्ठलाची लेकरे आहेत. संत रविदास कबिरांना मोठा भाऊ मानत असत. उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणजे संत कबीर होत. संत कबीर यांच्या जन्म वर्षाबद्दल विवाद आहेत. कोणी ते इ.स.१३७०मध्ये तर कोणी सन १३७८मध्ये जन्मले असे म्हणतात. त्यांच्या जन्माविषयी परंपरागत कथा सांगितली जाते ती अशी- ज्येष्ठ पौर्णिमेस एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक पुत्र जन्मला, पण उजळ माथ्याने त्याचे पालनपोषण करणे शक्य नाही; म्हणून तिने काशीतील एका लहरतारा सरोवराच्या काठी त्याला टाकून दिले. कर्मधर्म संयोगाने काशीतल्या एका मुस्लिम जोडप्याला तो सापडला. त्या मुस्लिम जोडप्यांचे नाव निरू व निमा होते. ते त्या मुलाचे चांगले पालनपोषण करतात आणि पुढे हाच मुलगा संतशिरोमणी कबीर महाराज या नावाने प्रसिद्ध झाला. संत कबीर जरी मुस्लिम कुटूंबात रहात होते, तरी ते रामाचे उपासक होते. संत कबीर यांच्या बद्दलची कोणतीही ठाम महिती नाही पण असे म्हणतात कि, त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते व त्यांना एक कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची एक मुलगी होती. ते काशीत विणकर म्हणून काम करत होते.
संत कबीर साहेब हे १५व्या शतकातील संत होते. त्यांनी तत्कालीन रूढींवर प्रहार केले. निर्भीडता हे त्यांच्या ओव्यांचे मुख्य वैशिष्ट्य होय. तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले. या माध्यमातूनच त्यांनी समाजाला थोतांड आणि अवडंबरातून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ओव्या- दोहे आजही आपल्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात-
“कबीर आप ठगाइये और न ठगिये कोय।
आप ठग्या सुख उपजै और ठग्या दु:ख होय।।”
चोरी, लबाडीपासून दूर राहण्याचा उपदेश करताना संत कबीर सांगतात की, दुसऱ्याला लुटण्यापेक्षा स्वत: लुटले गेलेले बरे. कारण दुसऱ्याला लुटले तर नक्कीच त्याचे रूपांतर दु:खात होणार.
“सिंहों के लेहड नाही, हंसों की नहीं पाँत।
लालों की नहीं बोरियां, साथ न चलै जमात।।”
ते सांगतात, सिंह जंगलात एकटाच असतो. सिंहांचे कळप नसतात. तसेच हंसाचे थवे नसतात आणि रत्नांची पोती नसतात. याच प्रकारे संतसुद्धा जाती-जमाती घेऊन चालत नाही. तो एकटाच जगकल्याणासाठी झटत असतो.
त्यांचा मृत्यू इ.स.१५९८साली झाला असे मानले जाते. मगहर मध्येच मुस्लिम प्रथेनुसार त्यांचे दफन झाले असावे. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले, पण त्यांचा मृत्यू काशीत नसून मगहर येथे झाला, हे स्वतःच त्यांनी सांगितले आहे-
“सकल जनम शिवपुरी गंवाया।
मरती बार मगहर उठि आया।।”
आज ज्येष्ठ पौर्णिमा दि.२२ जून २०२४, हिंदू पंचांगानुसार आजच्या दिवशी- ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते. भारत सरकारने सन १९५२ साली संत कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते, हे विशेष!
!! संतश्रेष्ठ कबीर महाराज जयंती निमित्त त्यांना व त्यांच्या लोकोपकारी कार्यांना लाखो विनम्र अभिवादन !!
– संकलन व सुलेखन –
संतचरणरज: श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
वंद.रा.सं.श्री तुकडोजी महाराज चौक,
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त मधुभाष- 7775041086.