_वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत होय. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो, अशी धारणा आहे. यंदा शुक्रवार, दि.२१ जून २०२४ रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. हे जाणूनच महिला यंदा मोठ्या उत्साहाने पूजाविधीनंतर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनाचा वसा- प्रण घेणार आहेत, श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी ही महत्त्वपूर्ण माहिती प्रस्तुत करताहेत… संपादक._
हिंदू पंचांगानुसार एका वर्षात १२ पौर्णिमा असतात. या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सूवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावानेही ओळखला जातो. या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते. आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते, तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावस्येला केला जातो. यंदा ज्येष्ठ वटपौर्णिमा आज दि.२१ जून २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात. या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे ५ वाजून २४ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतरचा, शुभ मुहूर्त हा दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी सुरू होणार असून, तो दुपारी २ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये सूवासिनी वडाची पूजा करू शकतात, असे पंचांग सांगते. वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्रमा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे. यासोबतच वडाचे झाड हे १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगते, त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात, आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसेच या वृक्षांचे अस्तित्व टिकावे, यासाठी वृक्षारोपण सुद्धा आवश्यक आहे, या पवित्र दिवसानिमित्त वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कार्यक्रम आयोजित व्हायला पाहिजेत.
वटपौर्णिमेच्या दिवशी सूवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करतात. स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करतात आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करतात. त्यानंतर १६ श्रृंगारांचा साज करतात. नंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घेतात. त्यासाठी ताटात फुले, कापसाची पोत, अक्षता, हळदी-कुंकू, उदबत्ती, पांढरा दोऱ्याचा रीळ, मिठाई, आंबा, जांभूळ, करवंद, फणस इत्यादी फळे ठेवतात. ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळ घेतात. शक्यतो आंबा ताटात ठेवतात. शुद्ध पाण्याचा गडवा- तांब्या आणि निरांजन सोबत ठेवतात. सुरूवातीला वडाच्या झाडाला पाणी वहातात. त्यानंतर हळदी-कुंकू, अक्षता, फुले कापसाची पोत वहातात, झाडाचे औक्षण करतात. त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून ७ वेळा झाडाला प्रदक्षिणा घालतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करतात, विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. या पूजाविधीत वृक्षांची साथ वेळोंवेळी लागते, म्हणून प्रत्येक वटपौर्णिमेस प्रत्येक महिलेने वृक्षारोपणाचा वसा घ्यावा व नित्यनेमाने पाळावा.
या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. ती उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. स
तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता ती त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा तिला परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. आता आधुनिक सावित्रींनी भरपूर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून या संपूर्ण जीवसृष्टीचा गुदमरलेला जीव वाचविण्यास व्रतस्थ वागले पाहिले.
!! वटपौर्णिमेच्या समस्त भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली,
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.