सातारा ,खटाव प्रतिनिधी/ नितीन राजे
पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील गौरव जाधव मित्र समूह व श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने पुसेगाव आणि पुसेगाव पंचक्रोशीतील ११११ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये दप्तर, वह्या, कंपासपेटी, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके मोफत मिळतात, परंतु त्या व्यतिरिक्त लागणारे इतर शैक्षणिक साहित्य उदा. वही ,पेन, पेन्सिल, कंपास, दप्तर आदी साहित्य काही विद्यार्थ्यांना त्यांचे पालक देऊ शकत नाहीत. गतवर्षी काही पालकांनी ही अडचण कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गौरव जाधव यांच्या लक्षात आणून देताच पुसेगाव आणि पुसेगाव पंचक्रोशीतील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी १ हजार १११ विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य घरपोच भेट दिले होते.
यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत ‘शाळासोबती’ या उपक्रमाअंतर्गत पुसेगाव आणि पुसेगाव पंचक्रोशीतील पालकांना एक कॉल करून आपल्या पाल्याला आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याची नोंद करण्याचे आवाहन केले गेले. त्यानंतर नोंदणीनुसार उपक्रमात सहभागी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील १ हजार १११ विद्यार्थ्यांना जय हनुमान चौक येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले.
दरम्यान, गौरव जाधव मित्र समूहाच्या माध्यमातून शाळासोबती सारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून गौरव जाधव मित्र समूहाने दाखवलेल्या या सामाजिक जाणीवेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
:
*शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू हीच आमच्या कामाची पावती आहे. याचाच पुढचा भाग म्हणून जसे आपले दातृत्व वाढेल तसे आणखी गरजवंतांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे.*
– गौरव जाधव – विश्वस्त, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव
फोटो ओळ – पुसेगाव : येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.