Home लेख सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष- विद्रोहाचा अग्निज्वाळ

सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष- विद्रोहाचा अग्निज्वाळ

216

 

डॉ. बादलशाहा चव्हाण यांनी संपादित केलेला डॉ. सुशीला ढगे यांच्या एम. फिलचा लघुशोध प्रबंध ‘दलित कादंबरीच्या अस्तित्वाचा संघर्ष’ यामधून सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष हा ग्रंथ साकार झाला आहे.

या लघुशोध प्रबंधाच्या अनुषंगाने अभावग्रस्त जीवनाचे वास्तवगर्भ चिंतन त्यांच्या समीक्षणेतून साकार झालेले आहे. वर्तमानाच्या येणाऱ्या समस्या यामधून सुटू शकतात.संपादकीय यामध्ये बादलशाहा चव्हाण लिहतात की, *दलित साहित्याचे सामाजिक भान म्हणजे ज्या आंबेडकरी प्रेरणेचे हे साहित्य आहे ते वैचारिक प्रेरणा नव्याने समजून घेण्याची गरजही इथे जाणवते. ती वैचारिक प्रेरणा जिवंत ठेवून त्यात नव्या वर्तमान जाणिवा निर्माण व्हाव्यात म्हणून पूर्वीच्या दलित साहित्य संकल्पनांचा इथे उल्लेख केला गेला आहे .दलित जाणीवांना कवेत घेऊन आंबेडकरी प्रेरणेने बलवान झालेले हे साहित्य कालांतराने लुप्त होऊ नये म्हणून पुन्हाःपुन्हा त्याला जिवंत ठेवणे गरजेचे आहे.* ही संपादकाची भुमिका बदलत्या साहित्य परिप्रेक्षाचा अचूक वेध घेणारी आहे.

भारतीय मराठी साहित्याला साठोत्तरी आंबेडकरवादी साहित्याने फार मोठे हादरे दिले. कल्पनारम्य , प्रणयरम्य ,देवधर्म लेखणीच्या चाकोरीला नाकारून जीवन वास्तवाची नवसृनात्मक कलाकृती तयार केल्या. जो समाज हजारो वर्ष शोषणाच्या अंधारचक्रात जगत होता तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मभानाने नव्या क्रांतीची भाषा बोलू लागला. लिहू लागला मुजोरवृत्तीच्या व्यवस्थेला नाकारू लागला. दलित कवितेतून अग्नी ज्वालांचे निखारे तेजाळू लागले. आंबेडकरवादी कवितेने मराठी कवितेची चौकट उध्वस्त करून स्वतःची अमिट छाप निर्माण केली. तसेच आंबेडकरवादी कादंबरीनेही स्वतःची नवी ओळख निर्माण केलेली आहे.

कादंबरी ही लेखकाच्या मनातील सुक्ष्मातिसुक्ष्म भावगर्भ चिंतनातून साकार झालेली कलाकृती असते . ती लघु आणि दीर्घ स्वरूपाची असते. कादंबरीतून एक नवा चलचित्रपट आपल्यासमोर साकार केला जातो. दलित कादंबरीची सुरुवात ही अण्णाभाऊ साठे यांच्यापासून झाली असे म्हणावे लागेल. यापूर्वीही अस्पृश्यांच्या, दलितांच्या जीवनावर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या पण त्या कादंबऱ्यांमधून जी अस्सलता असायला हवी ती प्रस्फोटीत होताना दिसत नव्हती. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून दलित समाजाच्या जाणिवांचे चित्र केलेले होते .त्यांनी शोषण, क्रांतीत्व, वेदना, स्त्रीजाणिवा, गुलामी ,अहंकार अशा विचारातून आपल्या कादंबरीचे लेखन केले आहे. फकीरा ही कादंबरी नव्या विद्रोहाची ठिणगी ठरली .त्याचप्रमाणे शंकराव खरात, बाबुराव बागुल, केशव मेश्राम, ज.वी पवार ,हरिभाऊ पगारे, नामदेव ढसाळ, सुधाकर गायकवाड, माधव कोंडविलकर, राजा राजवाडे यांनी आंबेडकरवादी विचारातून स्वतःच्या कादंबऱ्याचे लेखन केलेले आहे.
संपादक डॉ.बादलशाहा चव्हाण यांनी अशोक लोखंडे यांची निष्ठा, राजा राजवाडे यांची अस्पृश्यसूर्य ,शंकरराव खरात यांची पारधी या तीन कादंबऱ्यातील दाहकता प्रस्तुत केलेली आहे. सुशीला ढगे यांच्या वैचारिक समीक्षणेतून साकार झालेले चिंतन मूल स्वरूपाचे आहे. ज्या कादंबऱ्याकडे वाचकांचे फारसे लक्ष गेले नाही त्या कादंबऱ्यावर लघुशोध प्रबंध निर्माण करून वाचकाला नव्या विचारांची ओळख करून दिली आहे.

निष्ठा, अस्पृश्यसूर्य ,पारधी या तीन कादंबरीचा कालखंड जुना वाटत असला तरी तिची दाहाकता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे . आपण आजही त्याच संघर्षात जगत आहोत. वर्तमानातील वातावरण त्यात स्वरूपाचे तयार केले जात आहे अशा खदखदणाऱ्या भयकंपित वातावरणात या कादंबऱ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. आंबेडकरवादी साहित्याच्या कक्षा जशा वाढल्या तशा त्या पुन्हा मागे येताना दिसतात. नव्या कलाकृतीतून अभावग्रस्त जीवनाचे चिंतन फारसे पाहायला मिळत नाही. जागतिकीकरणाने व भांडवलदार शाहीने शोषित, वंचित, आदिवासी समाजाला कोंडीत पकडले आहे. बेरोजगारी ,बकाल वस्ती , अन्याय, अत्याचार, बलात्कार, अस्पृश्यता, विषमता ,जातीवाद ,धर्मवाद नव्या स्वरूपात निर्माण झाला आहे .आजही आंबेडकरी समाज जगण्यासाठी धडपडतो आहे. त्याचे धडपडणे शासन व्यवस्थेला दिसत नाही.

धर्माच्या नशात चूर असलेले सरकार फक्त एका वर्गाची मिरासदारी करत आहे. संविधानाला आव्हान देत आहे. नव्या हुकूमशाहीची नवी मांडणी देशात होत आहे. अशा वातावरणात निष्ठा, अस्पृश्यसूर्य व पारधी या कादंबऱ्याचे महत्व फार मोठे आहे. अशोक लोखंडे यांच्या निष्ठा कादंबरीचा आशय चिंतनशील आहे. पण विद्रोहाची जाणीव कमजोर आहे. भावनिक पातळीवर या कादंबरीने मोठी मजल मारली असली तरी लेखकाने जो नायक तयार केला तो नायक लढाईसाठी तयार झाला नाही. राजा राजवडे यांची अस्पृश्यसूर्य ही कादंबरी सामाजिक आशय व्यक्त करणारी आहे. या कादंबरीचे नावच अनोखी असे वाटते. पुरोगामी असणारा समाज अजूनही अस्पृश्य बांधवांना आपला मानत नाही. स्त्रीवर अन्याय होत असतो असताना पुढे येत नाही. अस्पृश्यसूर्य या कादंबरीतील खेड्यातील अभावग्रस्त वास्तव व सामाजिक चित्रण वाचकाला अंतर्मुख करायला लावणारे आहे. या कादंबरीतून अस्पृश्य समाजाचे वास्तव उजागर करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शंकराव खरात यांची पारधी ही कादंबरी भटक्या विमुक्त समाजाच्या हालअपेष्टाची जाणीव अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. आजही समाज चाकोरी बाहेर यायला तयार नाही पारधी समाजाला ज्या व्यवस्थेने नाकारले तीच व्यवस्था नव्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. पारधी या कादंबरीतून पारधी एक माणूस आहे. त्याच्या जीवनातील विविध पदर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच वाखण्याजोगी आहे. सुशीला ढगे यांनी केलेल्या तिन्ही कादंबऱ्याचा अभ्यास वाचकांसाठी उपयोगी व महत्त्वाचा आहे. दलित कादंबरीतील सामाजिक संघर्षाची जाणीव उजागर करणारे आहे. त्यांच्या चिंतनातून कादंबरीतील विविध पदर समजून घेता येतात. डॉ.बादलशाहा डोमाजी चव्हाण यांनी हे पुस्तक संपादन करून वाचकाला नवी जाणीव करून दिले आहे. ते गंभीर व संशोधक विचारांचे संपादक आहेत. वर्तमाच्या काळोखमय वातावरणात निष्ठा, अस्पृश्य ,सूर्य, पारधी या कादंबऱ्या वाचकाला विचारदर्शक ठरतील अशी आशा आहे. सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष हे संपादन विद्रोहाचा अग्नीज्वाळ आहे . या ज्वाळातून भारतीय समाजाला लागलेल्या विकृतीचे क्षरण व्हावे हीच अपेक्षा. बादलशहा चव्हाण यांच्या पुढील लेखन प्रवासास मी मंगलकामना चिंतितो.
संदीप गायकवाड नागपूर
९६३७३५७४००
सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष
(निष्ठा,अस्पृश्यसूर्य, पारधी)
संपादक डॉ.बादलशाहा चव्हाण
सीवली पब्लिकेशन नागपूर
मूल्य: एकशे पंचवीस रूपये.
मो.न. 8007928227

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here