Home महाराष्ट्र अहिल्याबाई होळकर मंदिरामध्ये बंदिस्त न करता यांची कर्तबगार शौर्यगाथा बहुजन समाजाने समजून...

अहिल्याबाई होळकर मंदिरामध्ये बंदिस्त न करता यांची कर्तबगार शौर्यगाथा बहुजन समाजाने समजून घ्यावी-प्रा.एम.एम.सुरनर

230

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :- मौजे खडी येथे राजमाता , शुरमाता, रणरागिनी, महाराणी, कर्मयोगिनी, आहिल्यामाई होळकर यांचा २९९ वा सार्वजनिक जयंती महोत्सव मोठ्या ऊत्साहात आणि गुणवंत विद्यार्थांचा त्यांचा पालकांचा सत्कार सन्मान सोहळा जयंती ऊत्सव समितीच्या वतीने राजमाताच्या कार्याची प्रेरणा मिळावी म्हणुन सन्मानचिन्ह शाल, पुष्पहार अशा पध्दतीने करण्यात आले, त्याबरोबरच महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ, परिवर्तन चळवळीचा सत्यशोधक आवाज प्रा.एम.एम.सुरनर सर यांच्या भव्य व्याख्यानाचे तथा प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील सर्व जाती समुहातील पुरूष आणि स्त्रिया मोठ्या प्रचंड संख्येने ऊपस्थित होते. या सर्व प्रचंड जनसमुदायास संबोधित करत असताना प्रा.सुरनर सरांनी राजमाता आहिल्यामाई होळकर यांच्या प्रचंड संघर्षाचा धर्मव्यवस्थेच्या आणि पेशव्याच्या विरोधातील बंड किती महान होते हे समजावत एका विदेशी तत्ववेत्या लॉरेन्स यांने राजमाता आहिल्यमाई होळकरींची तुलना रशियाची राणी कॅंथरीन, ईंग्लंडची राणी एलिझाबेथ, तर डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.
पुढे बोलताना मध्ययुगातील एक धगधगते स्त्रीरत्न म्हणजे लोकमात, राजमाता, राष्ट्रमाता महाराणी अहिल्यामाई होळकर .मूळच्या ऐतद्देशीय बुद्धीमान समाजाने विकसित केलेल्या आणि प्राचीन भारताला श्रीमंत बनविणाऱ्या मातृसंस्कृतीचे विकसित रुप म्हणजे अहिल्यामाई होळकर . खंत याची वाटते की पुराणात दगड झालेल्या आणि श्रीरामाने उद्धार केलेल्या अहल्येची *बनावट कथा* आज आमच्या एतद्देशीय समाजाला माहित आहे पण अठराव्या शतकात दगडालाही पाझर फुटावा असे खडतर आयुष्य जगणाऱ्या आणि आपल्या रयतेला मातृत्वाचे प्रेम देऊन त्यांचे जीवन फुलविणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्यामाईंची पराक्रमी कथा माहीत नाही ही खेदाची बाब आहे .
बहुजन समाजात माता यशोधरा ,मॉं जिजाऊ , अहिल्यामाता, क्रांतीज्योती सावित्रीमाई ,फातिमाशेख , माता रमाई ही महान स्त्रीरत्ने जन्माला आली .जी गुणवत्तेच्या बाता ठोकणाऱ्या एकाही उच्चवर्णीयाच्या घरी जन्माला आली नाहीत .भारतीय बहुजन समाजाने अख्ख्या विश्वाला दिलेली ही हिऱ्या मोत्यांची खाण .*तात्पर्य काय तर बहुजन समाज हा गुणवत्तेची खाण आहे .* *बहुजनांच्या सुपीक भूमीत सोनं पिकत नाही, सोन्यासारखी माणसं जन्माला येतात , हिरे जन्माला येतात .* बहुजन समाजाने आपली ही विरासत आता संघटितपणे समजून घ्यावी .बहुजन समाजात भाईचारा निर्माण होऊन मंगल मैत्री रुजावी .*बहुजन महामानवांची आणि महान स्त्रियांची जयंती एकाच जातीने साजरी करण्याचा गुन्हा आपल्या हातून घडू नये .जाती निर्मूलनासाठी लढलेल्या महामानवांना अज्ञानातून आपण जाती-जातीत बांधू नये . बहुजन समाजाने एकत्र येऊन एक दिलाने महामानवांचे जयंती समारोह साजरे केले तरच त्यांना सन्मानाचे अभिवादन ठरेल .अपेक्षित अभिवादन ठरेल .*
प्रतिक्रांती झपाट्याने होते पण क्रांतीला वेळ लागतो .इतिहास बदलणे,जुने संकेत बदलणे रंध्रारंध्रात वळवळणारे मनुवादी किडे मारणे हे फार क्रिटिकल काम आहे .फार चिवटपणे, चिकाटीने आणि जिद्दीने ते करावे लागते .आपल्या महामानवांनी न थकता,न थांबता ते केले इथून पुढे ते आपणाला करायचे आहे .*मनुवादी लोक चालाखीने बहुजन महामानवांचे ब्राह्मणीकरण करून बहुजन समाजाचे ब्राह्मणीकरण करतात .छ.शिवाजी महाराजांना ‘गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतात’ तर अहिल्यामाई होळकरांच्या हाती शिवलिंग देऊन त्यांना अहिल्या ‘देवी’, ‘पुण्यश्लोक’ असे संबोधतात .* तलवार गाजवणाऱ्या *एका रणमर्दानी स्त्रीचे हे केवढे अनैतिहासिक दैवतीकरण .* ही किती मोठी विसंगती .*जे हात तलवार चालवण्यासाठी निर्माण झाले त्या हातात शिवलिंग किती मोठे इतिहासाचे विकृतीकरण .* बहुजन समाजाने हे सगळे मनुवादी गुंते समजून घ्यावेत .अहिल्यामाता धार्मिक होत्या .मानवतेवरील कळवळा,दयाभाव,सहानुभूती,प्रेम,माया त्यांच्या अंतकरणात दरवळत होती या अर्थाने त्या धार्मिक होत्या .परंतु आपली धार्मिकता आपल्या कर्तव्याच्या आड त्यांनी कधीही येऊ दिली नाही .काय होते ते कर्तव्य ? *प्रजाहीत , प्रजाकल्याण ,प्रजारक्षण . पहिलं प्राधान्य दिलं सामाजिक कार्याला .पण प्रतिक्रांतीवाले हे सांगत नाहीत .अहिल्या’देवी’,’पुण्यश्लोक’ या ब्राह्मणांनी दिलेल्या पदव्या आहेत .ते ब्राह्मणीकरण करणारे शब्द आहेत . या ब्राह्मणी शब्दांचा बहुजन समाजाने चुकूनही उच्चार करू नये .* देवी,देव म्हटलं की महामानवांचे मानवी कर्तृत्व संपते आणि श्रेय जाते देवीला,देवाला .अहिल्यामातेसाठी प्रतिगाम्यांनी अहिल्यादेवी असा शब्दप्रयोग केला आणि फार मोठी प्रतिक्रांती घडली .*शब्द हे शस्त्र असतात .शब्दाच्या शस्त्राने मनुवाद्यांनी अहिल्यामातेला देवी म्हटलं* मग आमच्या बहुजनातील भाबड्या लोकांनी विचार केला देवीचं ठाण कुठं असतं ?तर मंदिरात .मग बांधा मंदिरं .अहिल्यामातेची लाखो मंदिरं उभी राहीली .स्मारकं उभी राहायला हवी होती,कॉम्पुटर लॅब उभ्या राहायला हव्या होत्या,ग्रंथालय उभे राहायला हवे होते .जी महान स्त्री आपल्या प्रजेला पुत्र मानून रात्रंदिवस समाजकार्यात व्यस्त होती तिला आम्ही मंदिरात कोंबलं .ज्या स्त्रीने विशालकाय असे 29 वर्षे राज्य चालविले तिला आम्ही मंदिरात डांबलं . अहिल्यामातेला देवी म्हणणे आणि तिची मंदिरं बांधणे हे प्रतीक्रांतीचे काम कोणीही करू नये .’पुण्यश्लोक’ हा शब्दही वरून गोड आणि आतून विषारी आहे .अहिल्यामाई धार्मिक होत्या आणि त्या दान दक्षिणा वाटत राहायच्या,मंदिरं बांधत राहायच्या ,दान-दक्षिणा वाटून आणि मंदिरं बांधून त्यांनी एवढं पुण्य कमावलं की त्या ‘पुण्यश्लोक’ झाल्या . अहिल्यामाईला मानणाऱ्या बहुजन लोकांनी असेच पुण्य कमवावे .पुण्यश्लोक व्हावे .क्लासवन,सुपर क्लासवन होऊ नये .माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागांकडे त्यांचे लक्ष जाऊ नये ,त्यांनी नेहमी मंदिरामध्ये गुंतून राहावे आणि व्यवस्थेवर आपलेच अधिपत्य असावे यासाठीच्या या *मनुवादी चाली* आहेत .बहुजन समाजाने हे धोके ओळखावेत .*प्रतिगामी लोक टिळकांचे , सावरकरांचे ,आगरकरांचे मंदिरं बांधत नाहीत त्यांची स्मारकं बांधतात आणि बहुजनांना आपल्या आदर्शांची मंदिरं बांधायला लावतात केवढी ही बदमाशी ?* अहिल्यामाई केवळ पूजा पाठ करीत बसल्या असत्या ,हातात शिवलिंग घेऊन त्यावर बिल्वपत्रे वाहत आणि दान-दक्षिणा वाटत राहिल्या असत्या तर होळकरशाही केव्हाच संपुष्टात आली असती आणि अहिल्यामातेची जयंती आज आपण साजरी केली नसती अशा अनेक ऊदाहरण दाखल्यासह ऊपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच मा.निळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन बाबा पठाण, सुनिल एंगडे, आदि मान्यवर ऊपस्थित होते तर कार्यक्रमाचे संचलन माधव गुळवे यांनी केले तर आभार बंटी निळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष व्यंकट कंरडे,त्यांच्या सर्व पदाधिकारी,गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here