सुनील शिरपुरे/यवतमाळ
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात कमळवेल्ली या छोट्याशा गावातील अश्रीता माधव चंदावार हिने घवघवीत यश संपादन करीत आकाश झेप घेतली. तिच्या जीवनाचा दारून प्रवास शब्दबद्ध करणे खुपच अवघड आहे. वडिलांच्या प्रेमाचा लवलेशही तिला माहित नाही. वडिलांच्या तेरवीच्या दिवशी या जगात तिने पाऊल टाकले आणि आईच्या प्रेमळ छत्रछायेत आपल्या जीवनाची नाव हाकू लागली. परंतु काळाने इथेसुद्धा तिचा घात केला. वयाच्या अवघ्या तिस-याच वर्षी नियतीने तिच्या आईला पण हिरावून घेतले. त्यानंतर ती आपल्या आईआजोबांच्या अधिन स्वत:ला समर्पित केले. आता तरी तिला सुखाचे दिवस पाहता येईल हा मानस असताना परत नियतीने आपला फेरा पलटवला. आईआजोबांच्या सततचा व्याधीग्रस्तपणा आणि मानसिक स्थिती खालावलेल्या आईआजी सोबत राहत, त्यांचा सांभाळ करू लागली. अशाप्रकारे आपल्या खडतर जीवनाचा प्रवास मार्गक्रमण करीत ह्रदयाला पिळवटून टाकणा-या परिस्थितीवर हावी होऊन आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीने तिने ८६.६० टक्के गुणांनी उत्तीर्ण होत हे सुयश प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल परिसरातून तिच्यावर कौतुकाचा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.