Home लेख लोकांतील, लोकांचा लोकनेता-विलासराव देशमुख

लोकांतील, लोकांचा लोकनेता-विलासराव देशमुख

139

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज ७९ वी जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे २६ मे १९४५ रोजी लातूरमधील बाभळगावमध्ये त्यांचा जन्म झाला. विलासरावांनी पुण्यात बीएससी, बीए, एलएलबी यासारखे उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर विलासराव आपल्या गावी बाभळगावला परतले. १९७४ साली विलासराव बाभळगाव चे सरपंच झाले. १९७५ पासून ते काँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते बनले. १९८० साली त्यांनी पहिल्यांदा लातूर विधानसभा मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात ते आमदार म्हणून ते निवडून आले. १९८२ साली त्यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून निवड झाली. त्यांनी कृषी, ग्रामविकास, सहकार, शिक्षण, तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. १९८६ साली ते महसूल आणि सहकार या महत्वाच्या खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले. उद्योग आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळेच ते सलग तीनदा विधानसभेत निवडून गेले मात्र १९९५ सालची विधानसभा निवडणूक त्यांना जिंकता आली नाही. १९९२- ९३ साली झालेल्या दंगली आणि बॉम्बस्फोट, काँग्रेसमधील सुंदोपसुंदी, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर झालेले आरोप, एनरॉन प्रकरण यामुळे काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यात विलासरावांचाही समावेश होता. विलासराव देशमुख यांना जनता दलाच्या शिवाजी कव्हेकर यांनी पराभूत केले. आपल्या गडात झालेला पराभव विलासरावांना खूप लागला. विलासराव देशमुख पडावेत यासाठी तेंव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या बड्या नेत्याने प्रयत्न केल्याचे तेंव्हा बोलले जात होते. १९९५ साली राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते विधिमंडळात नाही याची विलासरावांना खंत वाटत होती त्यामुळे काहीही करून विधिमंडळात जायचे असा चंग त्यांनी बांधला. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९६ साली विधानपरिषद निवडणूक लागली मात्र काँग्रेसच्या हायकमांडने त्यांना उमेदवारी नाकारली त्यामुळे बंडखोरी करून विधान परिषदेसाठी उभे रहा असा आग्रह त्यांना त्यांच्या समर्थकांनी केला. काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी त्यांना तसा सल्ला दिला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर त्यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली मात्र सारं आयुष्य काँग्रेस संस्कृतीत गेल्याने शिवसेनेत जाणं विलासरावांना शक्य नव्हतं म्हणून ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिले. या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना मदत केली तरीही त्यांचा अवघ्या अर्ध्या मतांनी पराभव झाला. विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक मताला ठराविक मूल्य असतं आणि मत मोजण्याची पद्धतही वेगळी असते. सलग दोन वर्षात दोन पराभव झाल्याने विलासरावांचे राजकारण संपले, विलासराव आता पुन्हा निवडून येऊ शकत नाही अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली मात्र हार मानतील ते विलासराव कसले ? विलासरावांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली. जनतेत गेले, जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडले त्याचे परिणाम लवकरच दिसले. १९९९ साली शरद पवार काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी म्हणजे १९९९ साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले तर शिवसेना भाजपने युतीत एकत्र निवडणुका लढवल्या. एकत्र लढूनही भाजप सेना युतीला बहुमत मिळाले नाही त्या दोन्ही पक्षांना मिळून १२५ जागा मिळाल्या तर स्वतंत्र लढलेल्या काँगेसला ७५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागा मिळाल्या. निकाला नंतर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात सरकार स्थापने साठी बोलणी सुरू झाली. छोट्या मोठ्या पक्षांनी देखील काँगेस आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. सर्वाधिक जागा काँग्रेसच्या निवडून आल्याने काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. काँग्रेस कडून लातूर मतदार संघातून विलासराव देशमुख सर्वाधिक मते घेऊन जिंकून आले होते. ज्या मतदार संघात त्यांचा पराभव झाला होता त्याच मतदार संघात ते पुन्हा विक्रमी मतांनी निवडून आले होते त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ते सर्वात पुढे होते शिवाय अपक्ष म्हणून जिंकून आलेल्या आमदारांनीही विलासराव देशमुख हेच मुख्यमंत्री असावेत अशी अट ठेवल्याने काँग्रेस हायकमांडने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली. जिंकून आलेल्या सर्व आमदारांनी विलासरावांना एकमुखी पाठिंबा दिला आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. सलग दोन पराभव स्वीकारून ही थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्याने विलासरावांची पराभवाची सल दूर झाली. काँगेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले पण २००३ साली त्यांना राजीनामा द्यावा लागला मात्र अवघ्या वर्षभरात म्हणजे २००४ साली त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विलासराव देशमुख हेच मुख्यमंत्री हवेत अशी मागणी केल्याने त्यांचीच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. २००४ साली विलासराव दुसऱ्यांना मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी चांगले काम केले मात्र २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले मात्र अल्पावधीतच त्यांची केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री बनले. १४ ऑगस्ट २०१२ रोजी विलासरावांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्यांचे आकस्मिक निधून महाराष्ट्रातील जनतेला धक्का देऊन गेले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला. विलासराव देशमुखांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here