Home महाराष्ट्र एवढा सुसाट वेग कशासाठी….?

एवढा सुसाट वेग कशासाठी….?

180

 

काल परवा न्यूज चॅनल्सच्या संदर्भाने पुणेमधील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’’ चे प्रकरण ऐकले. एका सुसाट महागड्या पोर्शे कारने दोन तरुण मुला – मुलीचा नाहक बळी घेतला. आजारी पडून मरणे समजता येईल पण हा विनाकारण काही चूक नसतानाचा बुलावा समजावा लागेल. जाणाऱ्यासाठी आणि त्या घेणाऱ्यासाठी दुःखद ते काय असेल? जितके दुःखद इथे जिवंत असणाऱ्या माता पित्यांसाठी असेल. संसाराचे ओझे वाहून थकलेले खांदे आधीच गळलेले असताना आपल्या तरुण लेकरांच्या पार्थिवाचे ओझे ते कसे आणि का सहतील बरं! अणि तो जो कोण अपघात करून फरार, अटक, जामीन यात गुरफटून गेला त्याला तरी कुठले चटके बसणार होते. त्याचे आईवडील त्याला इतकी मोकळीक देत असतील तर त्यांनाही हे नवीन नसावेच. एकंदरीत ज्यांची परिस्थिती आधीच कठीण त्यांना जीवंतरुपी दिलेल्या या मरणयातनाच होत. मुळात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर आपण अधिकचे बोलणे अधिक नको.
या प्रकरणावरून मला फक्त गाड्यांचा वाढत असलेला ‘सुसाट वेग’ याविषयी बोलायचे आहे, ते आवश्यक आहे म्हणून लिहायचे आहे. या पळत सुटणाऱ्या गाड्यांसाठी नाही तर त्यावर आरूढ गाढवांसाठी बोलायचे आहे. आईवडिलांनी घेवून दिलेल्या गाडीची जर तुम्हाला कदर नसेल तर तुम्ही मुर्खांचे गाढवच. जिथे लोकांना पायाचे पायताने होवोस्तोर पळावे लागते, जिथे पायाचे कातडे व पोटाचे आतडे भाजेपर्यंत कष्ट उपसावे लागतात तिथे आयत्या गाडीवर सुसाट धावायला काय लागते! गाडी दुचाकी असो की चारचाकी तुम्हाला ऐशोआराम मिळावे म्हणूनच आहे. राजेशाही थाट जगायचे सोडून कुत्र्यासारखे धावण्यात थोडी मजा आहे. चविष्ट गोष्ट चव घेवून प्राशन केली तर त्यातील चवीचा चवना वाढेल. घाईबडीत काहीच कळत नाही. त्यामुळे वाहणे एकोनोमीमध्ये चालविण्यात जी मजा आहे ती सुसाटमध्ये नाही. सुसाट वेगात ना आजूबाजूचा निसर्ग न्याहळता येतो, ना सोबत्यासंग हितगुज (वेगावर – रस्त्यावर लक्ष देवून) साधता येते, ना ती ड्राईव्ह आठवणीत राहील अशी होते. सुसाटमध्ये काय? तर लक्ष फक्त त्या एक्सलेटरवरच. वरती धडक लागली की पुढचे -मागचे मरण व वाचले तर जिवंतपणी सरण.
गाडीमध्ये एक इंजिन आहे व ते गाडीला खूप पळवू शकते. मग त्याला पळविणे जरुरीच आहे का? त्याला वेग असला तरी ते निर्जीवच आहे. मग निर्जीवाला भावना कुठून येतील. तुमच्या भावना ते त्याच्या भावना. जर तुम्ही मेले तर पुन्हा ते ‘भावनाशून्य’. तुम्ही त्याच्यासोबत खेळता ते तुमच्याशी, दोन्हींमध्ये नुकसान तुमचेच.
मी रस्त्यावर दुचाकीचा वेग पाहिलाच पण चारचाकीचा तर त्याहून जास्त. रस्त्यावरील 90 टक्के चारचाकी या वेगातच असतात. जणू त्या चालकाला सूचनाच आहे, चारचाकी म्हटले की वेगातच चालावे लागेल. विनाकारण गाडी जोरात चालवायची, याला त्याला ओव्हरटेक करायचे, काहीतरी जिंकल्यासारखे करायचे. तुम्ही त्या एक्सलेटरवर पाय ठेवल्यावर ते कितीपण पळवते त्यात तुमचा काय रोल? पण मेले तर मेन रोल तुमचाच राहील. हिरो असताना विलन व्हायची पाळी आपल्यावर येईल. आता यामध्ये काहीतर इतके पुढे असतात की त्यांना ना टोलवर ना सिग्नलवर ना गतिरोधकवर पुढे जायचा जोर आवरतो. म्हणजे याठिकाणीही अपघाताच्या घटना आपण बऱ्याच ऐकल्या असतीलच. अशा वागण्यामुळे गतिरोधकवर तर सगळ्यात जास्त परेशानी होते. मागच्यांना तर अचानक धक्काच बसतो कसल्यातरी भूकंपाचा विनाकारण. काहीजणांचे तर कंबरडे मोडल्यांचे पण ऐकिवात आहे. मुळात एवढ्या वेगात जावे असे काम हे यातील 90 टक्क्यातील 10 टक्क्यांनाही नसते. तुम्ही जर नाही पोहचलेत तर लग्न थोडे थांबणार आहे! पण जर पोहचायची इतकीच गडबड असेल तर जिथे पोहचायचे तिथे जरूर पोहचसाल. त्यासाठी ड्युटी वर जा की कुठल्या कामाला जरा दहा मिनिटे लवकर हलायचे. तिथे गडबड केली तर काय हरकत आहे! बर पहिला नंबर काढतो म्हणले तरी बक्षीसही वाढून ठेवलेले नसते. मग ही अतिघाई कशापायी? वरती जायची तर नाही? बरं चालवणाऱ्या ती असेलही पण तुम्ही ज्याला विनाकारण धडक देता त्याला तर जगायचे आहे की. त्यांचा जीव एवढा स्वस्त नाही जितके सुसाटपिडीत चिल्लर असावेत.
पूर्वी काळी -पिवळी जीप म्हटल्यानंतर भीतीच वाटायची, कारण ती काळी – पिवळी जीप म्हणजे एका अर्थी ‘अपघात’ हा समानार्थी शब्द होता. विमानामध्ये अपघात झाल्यानंतर मरणाऱ्यांची संख्या 100% असते तशी रस्त्यावरील या काळ्या पिवळीमध्ये अपघात झाल्यानंतर मरणाऱ्यांची संख्या ही कुठल्याही रस्त्यावरील वाहनांपेक्षा जास्त असते. लोकं त्या जीपमध्ये खुराड्यात कोंबडी कोंबावी अशी कोंबवली जातात. ना श्वास घ्यायला फुरसत असते ना सुस्कारा सोडायला जागा. ड्रायव्हरही त्याच्या सीटवर त्याच्या एका नितंबावर बसून खांदा वाकवून गाडी चालवत असतो. संकटकाळी एक्झिटची कुठलीही व्यवस्था त्या गाडीमध्ये नसते. पण हा पूर्वीचा नाईलाज होता. आता लोकांकडे स्वतःची वाहने मुबलक प्रमाणात असताना विनाकारण स्वतः च्या जीवाची एक्झिट सुसाट वाहने चालवून का घेत असतील? हे न उलगडलेले कोडे आहे. दुःखामध्ये दुखी घटना घडून माणसे मरत असतील तर सुखामध्ये दुःख शोधणारी ही माणसेच होत का?
एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा तर वेगळाच किडा दुचाकी चारचाकी वाल्यांत पहायला मिळतो. पण ओव्हरटेक करता करता कधी स्वतः चीच ओव्हर संपते तेच कळत नाही. वरती पासिंगच्या वर लोकं गाडीत घेणे, त्याकडे पोलिसांनी डोळेझाक करणे हा अलिखित कायदाचा झालेला आहे. मग अशा घटना घडल्या की काही काळ शिस्त लावायची व पुन्हा काळ संपतो तसा पुन्हा माज वाढत जातो त्या रस्त्यावरील अतिक्रमणासारखा हळू हळू.
बऱ्याच आधुनिक चारचाकीत ‘ऑटोपायलेट मोड’ आला आहे. ज्याचा अत्याधिक वापर हा धोकादायकच आहे. एमर्जन्सी काळातल्या व्यवस्थेला लोक गाडीत पत्ते खेळण्यासाठी वापरत असतील तर जीवनाचा सट्टाच ते लावत आहेत. त्या ‘सनरुफ’मधून हत्तीएवढे शरीर व भोपळ्याएवढे तोंड काढणे जरुरी आहे का? आधुनिक गोष्टी कारगर असतीलही पण जेव्हा गरज तेव्हाच! उगाच दिखावा म्हणून नको.
अपघात होण्याचे आणखी एक सोपे कारण आहे; ते म्हणजे गाडी चालवताना सारखे बोलत राहणे. रस्त्यावर कमी बोलण्यातच जास्त लक्ष ठेवणे. गाडीतील ए.सी.कमी जास्त करत राहणे; गाणे बदलत राहणे; साईड व्ह्यू मिरर अडजस्ट करत राहणे; खिडक्यांच्या काचा चालू बंद करणे. तंबाखू गुटखा खाणे; खालेला पुन्हा पुन्हा थुंकणे आणि महत्वाचे फोनवर बोलणे. इथून एक क्षण पुरेसा आहे तुमच्यातला जीव चालूचा बंद करायला. या उपरोक्त ज्या काही खटपटी आहेत त्या आधीच करून घ्यायच्या; नंतर काड्या करणे उचित होणार नाही.
अपघात जर स्वतःचाच करून चिरफाड करून घ्यायचीच हौस असेल तर मेलेलेच बरे कारण वाचून जर अपंगत्वाचे जीवन वाट्याला येत असेल तर ते खूपच कठीण होईल. पाय गेले तर चालता येणार नाही अन् हात गेले तर खाता येत नाही. डोके फुटले तर बुद्धी चालत नाही आणि समोर दिसणारी गाडी चालवतो म्हटले तरी चालवता येत नाही. ना जमण्याची भावना एवढी भयंकर असते की मेल्याहून मेल्याची प्रचिती येते.
गाडीच्या इंजिनला जोपर्यंत गंज चढत नाही तोपर्यंत ते मंदावत नाही आणि इथे गंज पडलेले डोक्याचे इंजिन मेल्यावाचून थांबत नाही. तुमच्याचांगल्या विचाराने आणि तितक्याच चांगल्या आचरणाने त्याचे ऑईलिंग करा. सुस्त पडलेल्या मस्तकाला चांगल्याचे टॉनिक द्या. जे तुमचे जवळचे त्यांचा विचार आपले म्हणून करा. तेच तुमचे टॉनिक असेल आणि हेच टॉनिक जेव्हा वरच्यावर ग्रिसिंग करायला लागते तेव्हा पळायचा वेळ नक्कीच हळू व्हायला लागतो. माझ्या माघाऱ्या मागच्यांचे काय? हा विचार करून गाडी चालवा. नक्कीच स्पीड ब्रेक लागल्याशिवाय राहणार नाही.
दारू पिवून गाडी चालवू नये याबद्द्ल शिक्षा एवढ्या कडक असताना तरीही गाडीचा वेग अजून मंदावलेला नाही. याचा अर्थ शिक्षा अधिक कडक व अंमबजावणी त्याहून कडक होण्याची आवश्यकता आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याला तुरुंगवासाचीच शिक्षा पाहिजे, केवळ दंडाने काही होत नाही. जवळचा पैसा अंगातली रग जिरू देत नाही पण या रगला जरा गर्मीत बसवा सगळी गरमी वाफ होवून बाहेर निघते. कारण ही गरमी नको तिथे वाया जात होती त्यामुळे ती एकदा बाहेर निघणे आवश्यकच आहे.
अपघात करून पळून जाणे म्हणावे तितके सोपे नाही. लोकांच्या हाती जर चुकून सापडले तर घरचा दारचा सर्व राग तिथे निघतो. नाही नाही म्हणणारे ठोकून जातात. शिस्तीतले बेशिस्त व्हायला वेळ लागत नाही आणि तुमची घडी व शिस्त ओरबाडून टाकायला तो एक क्षण पुरेसा आहे. तो क्षण चांगल्यासाठी वापरा; असे कित्येक चांगले क्षण पुढे मिळतील.
सुसाट वेगात नाहक लोकांचे बळी जात आहेत. जे मरत आहेत ते कोणाचे तरी आधार असतील. बाप बाहेर गेलेला सरळ सरणावर पाहून पोराचा घास तोडणे हे महापाप नाही का? अणि जो मारतो तोही कोणाचा आधार व आशा असेलच की.
परिवहन विभागाने रस्त्यावर काही सूचना दिलेल्या असतात; जसे पुढे वळण आहे, वाहन हळू चालवा!, सिंगल वे रोड, पुढे शाळा आहे, रहदारीचा रस्ता, वैगरे. त्या सूचनांचे पालन करत जा. त्या सूचना आपला हितासाठीच असतात. त्यांना शाई जास्त झाली म्हणून लिहित नाहीत. कधी चुकून आपल्यामुळे अपघात झाला तर तिथून पळून जावू नका. जखमीला मदत करा. कारण जखमीला त्या अवस्थेत सोडल्यामुळे जास्त मृत्यू होत आहेत. त्याला वेळीच मदत मिळाली तर जीव वाचू शकतो. अणि अत्यंत महत्वाचे दारू पिवून गाडी अजिबात चालवू नका; त्याला कदापि माफी नाही.
जीवनाचा आनंद वेगात नाही तर हळुवार एंजॉयमेंट करण्यात आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आपण एपल असो की आंब्याचा रस आस्वाद घेवून हळू हळू प्राशन करतो; का? कारण त्यातील मजा दीर्घकाळ जिभेवर रहावी म्हणून. ड्रायव्हिंग ही देखील एक मजा आहे पण ती शिस्तीत केली तर. सुसाट पळायचेच म्हटल्यावर मग ती सजाच….

माणूस आहात म्हणजे
गतिमान नाही…
यंत्राच्या जीवावर उडणाऱ्याला
इथे मान नाही….

नशा दारूचा की त्या
महागड्या गाडीचा
इथे उडवायला माणसे
तुम्ही दानव नाही…

करत असालच जर दगाफटका
इथे ‘माफी’ नाही…

लेखक – अमोल चंद्रशेखर भारती, नांदेड
मो.8806721206

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here