आयपीएल अर्थात इंडीयन प्रीमियम लीग अंतिम टप्प्यात आली आहे. आयपीएलच्या या हंगामाचा विजेता कोण ठरणार याची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू असताना क्रीडा वर्तुळाला आणी क्रीडा रसिकांना धक्का देणारी बातमी आली. ती बातमी म्हणजे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली. ही बातमी क्रीडा रसिकांसाठी धक्का देणारी होती कारण सुनील छेत्री अजूनही फीट आणि फॉर्मात होता. तो असा अचानक निवृत्ती स्वीकारेल असा अंदाज क्रीडा प्रेमींना नव्हता. सुनील छेत्री भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार होता त्याची निवृत्ती ही भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्वाची बातमी व्हायला हवी होती मात्र प्रिंट मीडिया वगळता इतर कोणीही त्याच्या निवृत्तीची दखल घेतली नाही हे खेदजनक आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया ने तर त्याकडे दुर्लक्षच केले. जर भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराने निवृत्ती स्वीकारली असती तर किती मोठी बातमी ठरली असती मात्र क्रिकेट शिवाय इतर खेळांकडे आणि खेळाडूंकडे दुर्लक्ष करायचे ही मीडियाची विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाची मानसिकता भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी मारक आहे. वास्तविक भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे स्थान आहे तेच स्थान सुनील छेत्रीचे भारतीय फुटबॉलमध्ये आहे. भारतीय फुटबॉलला लोकप्रिय करण्यात आणि जागतिक पातळीवर भारतीय फुटबॉल संघाची स्वतंत्र ओळख बनवण्यात सुनील छेत्रीचा सिंहाचा वाटा आहे. सुनील छेत्री हा भारताचा सर्वकालीक श्रेष्ठ फुटबॉलपटू आहे त्याची आकडेवारीच ते सिध्द करते. सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत तो जगात चौथ्या नंबरवर आहे. सध्या सक्रिय असणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याच्या पुढे पोर्तुगालचा रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा मेस्सी हे दोघेच आहे म्हणूनच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने त्यांच्या निवृत्तीनंतर आपल्या अधिकृत सोशल हॅण्डल वर त्याच्या फोटोसोबत रोनाल्डो आणि मेस्सीचा ही फोटो शेअर केला. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सुनीलची कामगिरी या दोघां इतकीच दर्जेदार आहे हेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाला यातून सुचवायचे होते. भारतीय संघासाठी त्याने केलेली कामगिरी तर अविस्मरणीय आहे. भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी करून त्याने संघाला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून दिले आहेत म्हणूनच त्याला खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार पटकावणारा तो एकमेव फुटबॉलपटू आहे. एका गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा ते भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार असा त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. ३ ऑगस्ट १९८४ रोजी तेलंगणामधील सिकंदराबाद येथे जन्मलेल्या सुनील छेत्रीचे वडील नेपाळ सैन्य दल फुटबॉल संघात खेळायचे तर आई व बहीण या दोघीही नेपाळच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व करायचे. सुनीललाही लहानपणापासून फुटबॉलची आवड होती. तो स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. स्थानिक स्पर्धांमध्ये चमक दाखवल्याने त्याला मोहन बागान संघाकडून खेळायची संधी मिळाली. २००२ ते २००५ या काळात त्याने या संघाकडून खेळताना तब्बल १८ गोलांचा पाऊस पाडला याच कामगिरीच्या बळावर त्याने भारताच्या २० वर्षाखालील संघात स्थान मिळवले आणि पहिल्याच लढतीत गोल करून पाकिस्तान विरुद्ध १ – ० असा विजय साजरा केला. २००७ साली त्याला भारताच्या वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळताच त्याने भारताला नेहरू चषक जिंकून दिला. फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धा, साफ स्पर्धा, एएफसी चॅलेंज चषक, आशिया चषक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली याच कामगिरीच्या बळावर त्याची भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. भारतीय संघाचे कर्णधारपदही त्याने लीलिया सांभाळले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जगातील सर्वोत्तम संघांना नमवण्याची किमया केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ५० गोल करणारा तो भारताचा पहिला फुटबॉलपटू ठरला. आज त्याच्या नावापुढे ९४ आंतरराष्ट्रीय गोल आहेत. पुढील महिन्यात कुवेत विरुद्ध होणारा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. हा सामना जिंकून तो त्याच्या कारकिर्दीचा शेवट गोड करेल यात शंका नाही. भारताचा सर्वकालिक श्रेष्ठ फुटबॉलपटू असलेल्या सुनील छेत्रीला मनापासून शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५