Home लेख स्व.हरिदासजी सोनवाल – कृष्णाजी अवधूत संस्थान सावंगा विठोबाचे एक आदर्श विश्वस्त

स्व.हरिदासजी सोनवाल – कृष्णाजी अवधूत संस्थान सावंगा विठोबाचे एक आदर्श विश्वस्त

268

 

अवधूत संप्रदायाचे प्रवर्तक कृष्णाजी महाराजांनी सावंगा विठोबामध्ये वास्तव्य केले. तेथे असलेली त्यांची समाधी हे या गावातील व अमरावती जिल्ह्यातील आकर्षण आहे. समाधीच्या ठिकाणी बांधलेले मंदिर हे जुन्या वास्तू शिल्पाचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी गुढी पाडवा व विजयादशमी ला फार मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात व आज त्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये वसलेले सावंगा विठोबा आज श्री क्षेत्र सावंगा विठोबा म्हणून ओळखले जाते ते कृष्णाजी महाराज यांची असलेली समाधी व अवधूत संप्रदायामुळे. विदर्भातील पंढरपूर म्हणूनही सावंगा विठोबा या गावाला ख्याती प्राप्त झाली आहे.
अशा या कृष्णाजी अवधूत संस्थान, सावंगा विठोबाचे अवधूत संप्रदायाचे प्रचारक स्व. हरिदासजी बाबूसा सोनवाल हे 23 वर्षे विश्वस्त होते.
अचलपूर या ऐतिहासिक नगरीतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व.हरिदासजी बाबुसा सोनवाल 2024 च्या 13 मे या दिवशी अनंतात विलिन झाले. सोनवाल परिवारासोबतच सर्व आप्तस्वकीयांना, अचलपूर नगरवाशीयांना, सावंगा विठोबा नगरवाशी व अवधुत संपद्रायातील हजारो भक्तांना दुःख सागरात बुडवून गेले. आज 2024 च्या 23 मे गुरुवारला तेरवी निमित्त त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाविषयी हा शब्दप्रपंच.
स्व.बाबूसा व स्व.सिताबाई यांच्या पोटी 1930 च्या डिसेंबर मासातील 29 तारखेला एक गोंडस बाळ जन्मास आलं.त्याचे नाव ठेवण्यात आले हरिदास.
” बाबुसा वडील ।
सिताबाई माता ॥
सुसंस्कार दाता
मातापिता ॥” आई-वडिलांच्या सुसंस्कारातून हरिदासाचे बालपण घडत गेले.
अवधूत संप्रदायातील त्यांच्या आई-वडिलांना हरिनामाची व अवधूत भजनाची फार मोठी आवड होती. हरिदासही बालपणापासूनच हरिनाम व अवधुती भजनात रमू लागले व सोबतच समाजसेवाही करू लागले कारण त्यांच्यावर आई-वडिलांनी केलेल्या सुसंस्कारामुळे ते बालपणापासून सज्जनांच्या संगतीत राहू लागले.
धरा सज्जनांची संगत ॥
सोडा दुर्जनांची सोबत ॥
आदर्शाचं माहेरहेर ॥
जीवन होईल तुमचं ॥ अशाप्रकारे बालपणातील सज्जनांच्या संगतीचा उपयोग त्यांना पुढे पोलीस खात्यात सेवाकार्य करताना फार मोठ्या प्रमाणात झाला.
सन 1954 मध्ये स्व. हरिदासजी सोनवाल यांची पोलीस दलात नियुक्ती झाली. तेव्हापासूनच त्यांनी समाजाला गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले कारण समाजसेवेचे आई – वडिलांचे सुसंस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले होते. पोलीस दलात भरती झाल्यावर त्यांनी एकाच गावात सेवाकार्य न करता सिटी कोतवाली व राजापेठ अमरावती, शिरखेड, परतवाडा, आसेगाव या ठिकाणी सेवाकार्य करून ते ग्राम गुन्हेगारी मुक्त करण्याचा प्रयास त्यांनी केला.विशेष म्हणजे अमरावती येथे सेवाकार्य करीत असताना अमरावती ते अचलपूर हा 50 किलोमीटरचा प्रवास त्यांनी अनेक वेळा सायकलने केला व निरोगी आरोग्य जगले.
पोलीस दलात नोकरी करताना ते शांत बसले नाहीत तर अनेक अवघड गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना योग्य त्या शिक्षेपर्यंत पोहोचवून समाजामध्ये तसे गुन्हे कोणी करणार नाही अशी गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली व समाजाला गुन्हेगारीपासून वाचविण्याचा प्रयास सतत केला कारण ते म्हणत,
” माणसाने माणुसकीने,
वागावे हे खरे ॥
निर्माण होतील मग,
प्रेमाचेच झरे ॥ ”
त्यांच्या अंतःकरणात असलेल्या प्रेमाच्या झऱ्यामुळेच ते गोरगरिबांना सतत मदत करीत कारण गोरगरिबांची सेवा हीच ईशसेवा अशी त्यांची धारणा होती. त्यांनी फक्त समाजसेवाच केले नाही तर स्व.हरिभाऊ सोनवाल यांनी आपल्या चारही मुला-मुलींना सुसंस्कार देऊन घडविले. आज त्यांचे थोरले सुपुत्र श्री अशोकराव हे अमरावती आयुक्तालयातून सहा.पोलीस निरीक्षक (A.P.I.) पदावरून 2010 ला सेवानिवृत्त झाले. त्यांचे धाकटे सुपुत्र श्री सतीशराव हे अमरावतीला व्यवसायिक आहेत. त्यांच्या सुकन्या सौ.सुनंदा रघुनाथराव अजमिरे व सौ.अल्का वसंतराव गोडबोले या त्यांच्या वडिलांचा वारसा जपत आहेत. स्व.हरि दासजींचे नातू श्री अमोल अशोकराव सोनवाल व श्री सारंग सतीशराव सोनवाल हे इंजिनिअर असून श्री मयूर अशोकराव सोनवाल अमरावतीच्या बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यरत आहे.श्री ऐश्वर्य सतीशराव सोनवाल अमरावतीला व्यवसायिक आहे. सौ.अर्चना व सौ.सरिता या दोन्ही स्नुषा आणि सौ. मीनल, सौ.स्नेहा व सौ. मोनिका या नात स्नुषा स्व. हरिभाऊंच्या आदर्शाचा पाठ आचरणात आणून सोनवाल कुटुंबाच्या रोपट्याचे त्यांनी वटवृक्षात रूपांतर केलेले आहे.
स्व.हरिदासजी सोनवाल हे स्पष्टवक्ते व सत्यवादी होते. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे व सत्यवाणीमुळे त्यांना कर्तव्यावर सेवाकार्य करताना खूप अडचणी येत होत्या पण त्यातून ते योग्य मार्ग काढून सेवाकार्य करीत असत.त्यांच्या या सद्गुणांची त्यांच्यासोबत असलेल्या सेवेकरी मित्रांनाही कधी कधी भीती वाटत असे.
स्व.हरिदासजी सोनवाल यांनी 1988 मध्ये स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि सेवानिवृत्तीनंतर श्री कृष्णाजी संस्थान,सावंगा विठोबा जिल्हा अमरावती या ठिकाणी 1995 ते 2013 पर्यंत ते अठरा वर्षे विश्वस्त या पदावर कार्यरत होते.पुढे 2014 पासून 2018 पर्यंत उपाध्यक्ष म्हणून कार्य केले. आणि पुढे 2019 ते 2024 पर्यंत पुन्हा पाच वर्षे विश्वस्त या पदावर कार्यरत होते.कृष्णाजी अवधूत संस्थान सावंगा विठोबाचे 23 वर्षे विश्वस्त असताना त्यांचा प्रामाणिकपणा निःस्वार्थीपणा आणि मनोभावे सेवाभाव या गुणामुळे विश्वस्त या पदाचे महत्त्व काय असते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे व बोधप्रद होते. त्यामुळेच त्यांच्यापासून विश्वस्त पदावरील सेवा करण्याची अनेकांनी प्रेरणा घेतली.
स्व.हरिदासजी अवधूत संप्रदायातील चतुरपती नामाचे विचारवंत व नामाचा अभ्यास असलेले ते गाढे अभ्यासक होते. आज त्यांचे सुपुत्र माजी ए.पी. आय. श्री अशोकराव सोनवाल या संस्थांनचे मार्च 2024 पासून सचिव पदी कार्यरत आहेत.ते सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून श्री क्षेत्र सावंगा विठोबा संस्थानचे मनस्वी सेवाकार्य करीत आहेत.
स्व.हरिदासजी सोनवाल यांनी सावंगा विठोबा संस्थांनमध्ये अवधुती भजन व नामस्मरण सुरू राहावे यासाठी अनेक भक्तांना एकत्र करून मांडीचे कार्यक्रम आयोजित केले कारण नामस्मरणामध्ये असणाऱ्या शक्तीची त्यांना कल्पना होती.
त्यांनी सावंगा विठोबा
संस्थांनच्या विकासासाठी विश्वस्त – उपाध्यक्ष असताना रात्रंदिवस परिश्रम घेतले.ते कुशल संघटक असल्यामुळे त्यांना अनेक भक्त मिळाले.सर्व भक्तांसोबत त्यांचे प्रेमळ नाते होते.स्पष्टवक्तेपणा व सत्यप्रिय व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते.असे प्रभावी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या स्व.हरिदास बाबुसा सोनवाल यांच्या आज असलेल्या तेरवी निमित्त मी त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाला विनम्र आदरांजली अर्पण करतो .
तेरवी निमित्त ।
हरिदासजींना ॥
करितो वंदना ।
कोटी कोटी ॥

महानुभाव ग्रंथोत्तेजक साहित्य अलंकार पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, रुक्मिणी नगर,अमरावती. भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here