Home लेख भगवान बुद्धाचा महिला विषयक दृष्टीकोन

भगवान बुद्धाचा महिला विषयक दृष्टीकोन

126

प्राचीन भारतीय सभ्यता आणि परंपरेचा अभ्यास केला असता असे लक्षात की ही सभ्यता गौरवशाली, प्रगत आणि संपन्न होती. तो काळ आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि दृष्ट्या प्रगत तर होताच त्याचबरोबर तेथील नगर रचनानेला एक वैज्ञानिक आधार होता. त्याची साक्ष महोंजोदोरो- हडप्पा उत्खननात सापडलेल्या वस्तू- प्रतिके देतात. थोडक्यात त्या काळात स्वातंत्र, समता बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रुजलेली होती. मातृसत्ताक व्यवस्थेचा हा परिणाम होता. या व्यवस्थेत स्त्री चे बौद्धिक, व्यावसायिक आणि सत्तेत प्राबल्य होते. याचा अर्थ पुरुष गुलाम होता असे नाही. आर्य ब्राह्मणांनी आक्रमण करून ही व्यवस्था नष्ट केली आणि आपली अमानवीय,अनैतिक व्यवस्था लादली. यासाठी त्यांनी प्रथम वर्ण व्यवस्था आणि जातीव्यवस्था निर्माण केली. आपली पकड आणि गुलामी कायम राहावी म्हणून त्याला धर्मशास्त्राची जोड दिली. ब्राह्मणांनी स्वतःला सर्व श्रेष्ट ठरवून इथल्या मूलनिवासी शूद्र – अतिशूद्र पुरुषांबरोबर महिलांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक गुलाम केले. बुद्ध काळात बुद्धाने या व्यवस्थेला तर्क आणि विज्ञानाचा आधार देऊन खुले आव्हान दिले. जन्माने कोणी श्रेष्ठ – कानिष्ठ ठरत नाही तर तो त्याच्या कर्माने ठरतो. अशी मांडणी करणारे बुद्ध पुढे संघाची निर्मिती करून समतावादी व्यवस्था स्थापित करतात व या व्यवस्थेत पुरुषांबरोबर महिलांना सन्मानाचे जीवन बहाल करतात,स्त्री जननी असल्यामुळे तिचे अस्तित्व जास्त अधोरेखित करतात.बुद्धाने स्थापित केलेल्या समतावादी व्यवस्थेमुळे ब्राह्मणी व्यवस्था हादरली.ब्राह्मणांनी बुद्ध आणि त्यांच्या तत्वज्ञानाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर हजारों नकली भिक्खू निर्माण करून चुकीची विचारधारा समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. बुद्ध स्त्री विरोधी कसे आहेत, म्हणजे ते विषमतावादी कसे आहेत,हे सांगण्याचा केविलवाना प्रयत्न केला.
बुद्धावर महिला विरोधी असल्याचा आरोप
ब्राह्मण आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जातात.विचारात भेसळ करणे,चांगले विचार आपल्याच नावाने खपवीने, महापुरुषांची हत्या करणे व त्यांना बदनाम करणे ह्या बाबी त्यांच्यासाठी अगदी सामान्य आहेत. बुद्धांवर सुद्धा त्यांनी अनेक आरोप केलेत.त्यापैकी बुद्ध हे महिला विरोधी कसे आहेत, असा एक आरोप आहे. बुद्ध काळात तर आरोप तर झालेच तसेच ते आजही सुरु आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांवरील आक्षेपांना ‘हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती याला जबाबदार कोण? आणि ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 21 जानेवारी 1950 च्या ईव्हज विकलीज या साप्ताहिकाच्या अंकात ‘निती आणि अनिती यासंबंधाची बुद्धाची सर्व शिकवण हिंदुस्थानातील स्त्रियांच्या अवनातीला प्रामुख्याने कारणीभूत आहेत’ असा आरोप कारण्यात आला होता.या आरोपाचा आधार होता महा परिनिब्बाणसुत्ताचा. या सुत्तात बुद्ध आणि आनंद यांच्यात स्त्रिविषयक संवाद झाला.त्यामध्ये बुद्ध आनंदला स्त्री पासून कसे दूर राहावे या बाबत सल्ला देतात. लामा गोविंद यांनी मार्च 1950 ला महाबोधी मासिकाच्या अंकात या आरोपाचे खंडन करणारा लेख तर लिहलाच शिवाय हिंदू धर्म महिलांच्या पतनाचे कारण कसे आहे,हे सप्रमाण सिद्ध केले. ते लिहतात,”सीता ही रामाची पत्नी होती.मात्र तिचा दर्जा काय होता? तिच्या चारित्र्यावर रामाने संशय घेतला.तिचा छळ केला.तिला टाकून दिले.हिच अवस्था द्रोपदीची होती.” थोडक्यात महिलांच्या अधोगतीस ब्राह्मणी धर्मग्रंथ कसे जबाबदार आहेत हे लामा गोविंद यांनी उदाहरणदाखल सिद्ध केले. ही बाब जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समजली तेव्हा त्यांनी लामा गोविंदचे कौतुक तर केलेच त्याच बरोबर बुद्धाच्या विरोधात विष पेरणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर देणारा एक स्वातंत्र लेख लिहला.तो लेख ‘हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती याला जबाबदार कोण?’ पुस्तकरूपात आजही उपलब्ध आहे.
भगवान बुद्ध आणि स्त्रिया
बुद्धाचा विचार मानवी कल्याणाचा होता.त्यांनी जीवीत पशु- पक्षांवर तर प्रेम केलेच त्याच बरोबर निसर्गावर सुद्धा त्यांचा तेवढाच जीव होता.तेव्हा असा महापुरुष स्त्री विरोधी कसा असू शकतो? हा प्रश्न विचार करण्यास भाग पडतो.भगवान बुद्धाने स्त्रियांचा सन्मानच केला आहे.तत्कालीन सामाजिक स्थिती आणि तिचे महत्व लक्षात घेता त्यांनी भिक्खुनी संघाची स्थापना केली. भिक्खुनी संघात बुद्धाने घातलेल्या अटी कशा स्त्रि विरोधी आहेत,हे सांगण्याचा ही खूप प्रयत्न झाला.बुद्धाचा स्त्रियांना विरोध नव्हता.स्त्री बुद्धीमत्ता आणि नीतिमत्ता या बाबतीत श्रेष्ठ आहेत असे बुद्ध मनात होते. बुद्ध काळात संघातील कितीतरी स्त्रियांनी आपल्या बौद्धिक आधारावर आपली योग्यता सिद्ध केली आहे.
बुद्धाने वारंवार स्त्रीचे अस्तित्व,कर्तृत्व आणि श्रेष्ठत्व अधोरेखित केले आहे.तिच्या पोटी चक्रवर्ती राजा जन्म घेतो,अतकी की महान आहे,असे बुद्धा सांगतात.असच एक प्रसंग – प्रसेनजीत राजाला मुलगी झाली तेव्हा तो दुःखी झाला होता.त्याचे दुःख बघून बुद्ध म्हणतात,”मानवेंद्र! यात दुःख मानण्याचे काय कारण ? मुलगी मुलग्यापेक्षा जास्त प्रभावी अपत्य म्हणून ठरू शकेल.ती मोठी शहाणी आणि सद्गुणी होईल. ती अशा मुलग्याला जन्म देईल की,तो मोठा कर्तृत्ववान होईल,आणि विस्तीर्ण प्रदेशाचा राजा होईल”. दुसरे एके ठिकाणी स्त्री ही जगाला किती मौल्यवान देणगी आहे,याबद्दल आपल्या प्रवचनात विवेचन करताना बुद्ध उदगार काढतात,” स्त्री ही महान देणगी आहे.कारण तिची उपयुक्तता अमोल आहे.तिच्यापासून बोधिसत्व आणि चक्रवर्ती हे जन्म घेतात.” कुटुंबात मुलगी जन्मली तर त्या कुटुंबाने दुःख न मानता आनंद मनावा, ज्या कुटुंबाचा कारभार स्त्रीच्या हातात असतो ती कुटुंबे विनाशापासून मुक्त होतात.स्त्री ही सात भंडारापैकी एक अत्यंत मौल्यवान भांडार आहे.अशी ज्या बुद्धाची मते होती,ती व्यक्ती किती महान असावी!
स्त्रियांना भिक्खुनी होण्याचा हक्क देऊन बुद्धाने त्यांना स्वातंत्र्यांचा मार्ग मोकळा करून दिला.एवढेच नव्हे तर लिंग भेदाबाबत मनात कुठलीही अढी न बाळगता बुद्धाने स्त्रियांना थोर पदाला पोहचण्याचा मार्ग मोकळा करून दिला.या संबंधात मिसेस रिस डेव्हिड यांचे या विषयींचे मत अतिशय महत्वाचे आहे.त्या म्हणतात,” भिक्खू बांधवानी अरहंत पदाला गेलेल्या स्त्रियांकडे तिचे स्त्रित्व लक्षात न घेता, एक विचारशील मानव म्हणूनच तिला मानावे”.याचा अर्थ लिंग भेद न मानता एक माणूस म्हणून तिच्या कडे बघावे,असा विकसित विचार अपेक्षित आहे.
बुद्ध काळात आणि नंतर सुद्धा कितीतरी स्त्रियांनी आपल्या बौद्धिक बळावर अंधश्रद्धा – दैव आणि चमत्काराचे खंडण तर्क आणि विज्ञानाचा आधार घेऊन केले.थेरीगाथेत पूर्वा आणि ब्राह्मणांमधला संवाद अतिशय महत्वाचा आहे.ब्राह्मण कडक थंडीत गंगेच्या पाण्यात आंघोळ करीत असता पूर्वा ब्राह्माणाला म्हणते, शिक्षेच्या भीतीने मला कडक थंडीमध्ये गंगेच्या पाण्यात उतरावे लागते.पण हे ब्राह्मण,तू कुणाच्या भीतीने एवढ्या थंडीत नदी पात्रात उतरतोस? यावर ब्राह्मण उत्तर देतो,”पूर्वीके,मी पाप कर्माच्या फळांचा नाश करण्यासाठी हे पुण्य कर्म करतो.मनुष्य गंगेत स्नान शुद्धीने सर्व पाप कर्मापासून मुक्त होतो”. त्यावर पूर्वा उत्तर देते ते फार मार्मिक आहे.पूर्वा म्हणते,”स्नान शुद्धीने मुक्ती होते. हा मुर्खाने मूर्खासाठी केलेला उपदेश आहे. पाण्याने शुद्धी होत असेल तर मग बेडूक,कासव,मगर,मासे निश्चित स्वर्गात गेले असते” अशी तर्क संगत मांडणी केवळ बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांनीच केली होती.त्यामध्ये महिलासुद्धा अग्रणी होत्या.बुद्धाने स्त्रियांना पुरुषांच्या दर्जा दिला. याबाबत मिसेस रिस डेव्हिड म्हणतात,” परीव्रजा घेण्यास येणाऱ्या स्त्रियांवर ती कुमारी असली पाहिजे, असा दंडक घातलेला नव्हता. विवाहीत, अविवाहीत, विधवा आणि वेश्या अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना बुद्धाने दिक्षा दिली होती. त्यांच्यासाठी संघाचा दरवाजा खुला ठेवला होता. त्यामुळे सर्व प्रकारच्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य,समता,महत्ता आणि आत्मविश्वास,ही मानवी जीवनाची सर्व अंगे प्राप्त करून घेता येत होती.”
बुद्धाने वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला. त्याआधी ते परिवारिक जीवन जगत होते.अशावेळी घरातील, समाजातील आणि नगरातील स्त्रियांचे सुख – दुःख, त्यांची सामाजिक, आर्थिक स्थितीचे त्यांना चांगले आकलन होते,हे कोण नाकारणार? तेव्हा बुद्धाचा विचार हा मानवी कल्याणाचा असल्यामुळे तो आपसूकच स्त्रीच्या ही मुक्तिचा मार्ग होता, हे सिद्ध होते.
जीवन गावंडे, नागपूर मो. 7350442920

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here