_पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी व फुलपाखरे बागडावीत. पण सद्याच्या स्थितीत पाहिले तर सगळीकडे काँन्क्रीटीकरण वाढलेले आहे. त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसरच नाही व जेवढा आहे तेवढ्यात वेगवेगळी शोची झाडे लावली जातात. अस जर होत राहीले तर त्या फुलपाखरांनी बागडायचे कुठे? त्यांनी मध कुठे तयार करायचा? असा मानवाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा लेख जरूर वाचा… संपादक._
जैवविविधता ही पृथ्वीवरील जीवसृष्टीची जैविक विविधता आणि परिवर्तनशीलता आहे. जैवविविधता हे जनुकीय, प्रजाती आणि परिसंस्थेच्या पातळीवरील भिन्नतेचे मोजमाप आहे. तलाव, तळे, नदी आदी परिसंस्थेचा अभ्यास करून तेथे पाहण्यात आलेल्या जैवघटकांची माहिती घेतली जाते. त्यात सजीवांमधील विविध जाती, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवर विविधता आढळून येते. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. ती बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ- उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते. जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. त्यांत विस्ताराची विविधता आढळतेच. एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्ये सुद्धा सारखेपणा आढळून येत नाही. सजीवांमधील विविधता ही तापमान, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, समुद्र सपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचे गुणधर्म आणि सभोवती असलेले इतर सजीवांचे अस्तित्व यांवर अवलंबून असते. सजीवांच्या देशी जाती व अप्रिसंस्थेच्या वितरणाच्या अभ्यासास जैवभूगोल असे म्हणतात. विषुववृताजवळील उष्णप्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी विविधता आढळते, हे वर आलेच आहे. सन २००६मध्ये आययूसीएन या संस्थेने दुर्मीळ किंवा अस्तित्व धोक्यात आल्याचे जाहीर केलेल्या सजीवांची संख्या ४०,१७७ एवढी होती. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा जातींची संख्या दहा लाखांवर पोहोचेल. भूप्रदेशावरील विविधता महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटीनी अधिक आहे.
झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. सुमारे चौप्पन कोटी वर्षांपूर्वी फेनेरोझोइक महाकल्पामध्ये जैवविविधतेचा महाविकास कॅम्ब्रियन कल्पामधील विविधतेचा स्फ़ोट या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची निर्मिती झालेली होती. त्यांपुढील चाळीस कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. कार्बोनिफेरस युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पती आणि प्राण्यांचा नाश झाला. पर्मियन ट्रायासिक युगामध्ये पंचवीस कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला क्रिटेशियस- टर्शरी विनाश हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनॉसोर नष्ट झाले. जैवविविधतेत माणसाचा प्रवेश झाल्यानंतर ती आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास हॉलोसिन विनाश असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा आतोनात नाश होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जैवविविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले होते. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी व फुलपाखरे बागडावीत. पण सद्याच्या स्थितीत पाहिले तर सगळीकडे काँन्क्रीटीकरण वाढलेले आहे. त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसरच नाही व जेवढा आहे तेवढ्यात वेगवेगळी शोची झाडे लावली जातात. अस जर होत राहीले तर त्या फुलपाखरांनी बागडायचे कुठे? त्यांनी मध कुठे तयार करायचा?
आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली? हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले, यावर वैज्ञानिक ठाम आहेत. जैवविविधतेमुळे अनेक पर्यावरण सेवा उपलब्ध झाल्या आहेत. या सेवा प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्षपणे मानवी जीवन सुसह्य बनवतात. हवेच्या घटकांचे संतुलन, गोड्या पाण्याचे चक्र, यांचे मूल्यमापन अशक्य आहे. यामधील जैवविविधतेच्या मदतीचे रुपयात किंवा डॉलरमध्ये मूल्य केल्यास कोणत्याही प्रगत राष्ट्राला ते चुकवता येणार नाही. मृदेमधील अन्नघटक चक्र, सुपीक जमीन तयार करणे, अशी कामे मानवी प्रयत्नांनी करायची ठरवली तर ते अशक्य आहे. केवळ संतुलितपणे ज्या सेवा जैवविविधतेमुळे मिळतात त्या अमूल्य आहेत. एकच उदाहरण द्यायचे तर ते कीटकाद्वारे होणाऱ्या परागीभवनाचे द्यावे लागेल. कीटकांनी मानवास दिलेली ही देणगी पैसे खर्च करून करवून घ्यायची तर किती रक्कम द्यावी लागेल? याचा विचारच न केलेला बरा.
जैवविविधता विलोपनामध्ये अधिवास बदल किंवा अधिवास नाहीसा होण्याचा मोठा धोका उद्भवतो. सदाहरित जंगलामध्ये होत असलेली वृक्षतोड, लोकसंख्या वाढ, जंगलाच्या जमिनीत खाणकाम, हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि जल प्रदूषण याशिवाय जागतिक हवामान वाढ या सर्वाचा अधिवास बदलाशी संबंध येतो. अधिवासाचे क्षेत्रफळ आणि त्या अधिवासामध्ये असणाऱ्या जातींची संख्या परस्परांवर अवलंबून आहेत. त्यांतल्या त्यात आकाराने मोठ्या जाती व समुद्र सपाटीलगत असणाऱ्या जंगलातील जाती-अधिवास बदलास संवेदनक्षम आहेत. दक्षिण भारतातील सलग जंगलांचे पट्टे नष्ट झाल्याने पश्चिम घाट जंगलातील हत्ती उन्हाळ्यात पीक क्षेत्रामध्ये घुसतात. ऊस हे त्याना त्यांचे नैसर्गिक खाद्य वाटल्याने ते तेथेच राहतात. त्याना हुसकून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते परत परत तेथेच येत राहतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानंतर पुनर्वनीकरणात अस्तित्वात असलेल्या सर्व वनस्पती परत कधीच लावता येत नाहीत. एकाच प्रकारच्या वृक्षांचे पट्टे लावण्याने त्या परिसरामध्ये असलेली विविधता नष्ट होते. नॅशनल सायन्स फाउंडेशन यानी केलेल्या २००७च्या अभ्यासातून असे समजले की जैवविविधता आणि जनुकीय विविधता यांचा परस्पर संबंध आहे. जातींमधील विविधतेसाठी जातींत जनुकीय विविधता असणे आवश्यक आहे. एका घटकाचा अभाव म्हणजे दोन्हीमधील संतुलन संपणे होय. अशा वेळी परिसरात एकच जाती प्रबळ ठरते. पाळीव प्राण्यांच्या बाबतील हे सहज समजून येते. पशुपालनासाठी राखीव कुरणे म्हणजे फक्त दूध किंवा मांसासाठी जनावरे पाळणे, हाच प्रकार कृषिव्यवस्थेमध्ये घडतो. उत्पादन घटण्याच्या भीतीने दुसरी वनस्पती म्हणजे तण शेतामध्ये वाढू दिले जात नाही, अगदी तसे होय.
पृथ्वीवर एका वेळी सर्वाधिक किती सजीव राहू शकतील, ही पृथ्वी ग्रहाची सजीव धारण क्षमता झाली. उदा.एका हेक्टरमध्ये अधिकतम किती गव्हाचे उत्पादन घेता येईल याची जीवशास्त्रीय मर्यादा गणिताने काढता येते. जाति-विविधता किती असू शकेल, याचा अंदाजही काढता येतो. सागरी सजीवाची विविधता वृद्धिवक्र पद्धतीने तर भूमीवरील सजीवांची विविधता घातश्रेणीने वाढते. एका वैज्ञानिकाच्या मते चतुष्पाद प्राणी आजच्या घटकेला भूप्रदेशावरील ६४ टक्के प्रदेशातसुद्धा पोहोचलेले नाहीत. मानवी हस्तक्षेपाशिवाय चतुष्पाद सजीवांची वाढ अशा पद्धतीने होण्याची शक्यता आहे, की सर्व प्रकारच्या परिसंस्थेमध्ये चतुष्पाद पोहोचतील. जेवढी पूर्वजांची संख्या अधिक तेवढी त्यापासून निर्माण होणाऱ्या पिढ्यांची संख्या अधिक असते. वृद्धीसाठी आवश्यक घटकांचा तुटवडा असल्यास सजीवांची विविधता कमी होते. मानवी हस्तक्षेपामुळे सद्या फक्त १०० वर्षामध्ये इतर सजीवांचा नाश होण्याची शक्यता आहे. मग सांगा भाऊ, मानवाचे अस्तित्व कायम तग धरून राहू शकेल का? म्हणून माणसा, तू जैवविविधता संरक्षित व संवर्धित कर, अन्यथा तुझा सत्यानाश झालाच म्हणून समज..!
!! आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन सप्ताहनिमित्त समस्त मानव जातीस प्रेरक शुभेच्छा !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८६.